Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

लाख मोलाचा माणूस
लॉकडाऊन… या एका शब्दाभोवती सध्या आपण फिरत आहोत. आता काय होईल… हा प्रश्न प्रत्येकालाच पडलाय… पण या प्रश्नात काही उपप्रश्नही आहेत… आपलं काय होईल… आपल्या कुटुंबाचं काय होईल… हे प्रश्न सर्वांपुढे आहेत… मात्र काही व्यक्ती यापुढे आहेत… विचाराने… शांत, संयमी वृत्तीने… हीच त्यांची वृत्ती त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसते. समाजाला मार्गदर्शन करते. या लॅकडाऊन, कोरोना नंतर काय होईल हा प्रश्न त्यांनाही पडला आहे… पण, त्यांना हा प्रश्न त्रस्त करीत नाही, कारण त्यांच्याकडे या प्रश्नाचं साधं, सरळ आणि सोप्पं उत्तर आहे, जे सर्वांचं होणार तेच आपलं होणार… आपण काही कोणी मोठे नाही… आज ना उद्या सगळं सुरळीत होईल… हे आश्वासक असे शब्द आहेत, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे…. कलाकृती मिडीयाने कुलकर्णी यांच्याबरोबर संवाद साधला. नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्व माध्यमांमधला हा राजा माणूस… त्यांची प्रत्येक कलाकृती ही समाजाला नवीन संदेश देणारी ठरली आहे. गांधी विरुद्ध गांधी हे नाटक असो की तुकाराम सारखा चित्रपट… या दिग्दर्शकानं आपल्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांना समृद्ध केलं. याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा केली. साहजिकच सध्याचा चर्चेचा विषयही यावेळी आला, तो म्हणजे कोरोना आणि त्यानंतर काय… यावेळी चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिलेले उत्तर त्यांच्या स्वभावाचे प्रतिक होते. याच चर्चेत चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपला मराठवाड्यापासून ते मुंबई पर्यंतचा प्रवास उलगडला….
चंद्रकांत कुलकर्णी मराठवाड्यातले… शाळेत असल्यापासून त्यांना नाटकाची ओढ लागली. त्यामुळे नाटक असलं की ते पुढे असायचे. नंतर औरंगाबाद कॉलेजला गेले. तिथे वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धांचे मोठं पेव होतं. त्यामुळे सर्व राज्यपातळीवरील स्पर्धांमध्ये ते सहभागी होत असत. नाटकांनी कायम त्यांना मोहीनी घातली… कॉलेजच्या वातावरणांत त्याला अधिक साथ मिळाली, त्यामुळे नाटकाचे कामही चालू झाले. याचे सर्व श्रेय ते कॉलेजमध्ये झालेल्या ग्रुपला देतात. कॉलेजला गेल्यावर प्रशांत दळवी, प्रतीक्षा लोणकर, अभय जोशी अशी काही मित्रमंडळी त्यांना मिळाली… सर्वांची नाळ नाटकाबरोबर बांधली गेली होती. त्यामुळे या सर्वांचा चांगला ग्रुप तयार झाला. जिगीषा…. सर्व नवखे असले तरी रंगभूमीसाठी काहीतरी करायची आस प्रत्येकामध्ये होती. या जिगीषामध्ये प्रत्येकाची एक भूमिका होती. कोणी अभिनेता, कोणी अभिनेत्री, कोणी लेखक तर कोणी तंत्रज्ञ. चंद्रकांत कुलकर्णी यांना दिग्दर्शनाची आवड. यातून वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा नाटकाचं दिग्दर्शन केलं. अगदी तरुण वयात दिग्दर्शनाची जबाबदारी आली. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून त्यांचे विचार आणि पाया पक्का झाला. एकीकडे कॉलेज सुरु होते. नाटकाचे कामही सुरु होते. कॉलेजमध्ये ग्रुप तयार झाल्यावर नवीन विचार आले… एक वेगळा मतप्रवाह आला. आपलचं नाटक असावं. आपलाच लेखक असावा. काहीतरी नवीन लिहावं, म्हणजे एखादं जुनं नाटक पुन्हा नव्यानं करण्यापेक्षा नवीन नाटक लिहून ते रंगमंचावर सादर करावं. 15 ते 20 जणांचा हा जिगीषा ग्रुप होता. नाटकात स्टेजवर जेवढे सक्षम अभिनेते असावे लागतात, तेवढेच पडद्यामागेही लागतात. या ग्रुपमधून नाटकाचा प्रत्येक भाग सांभाळणारी एक नवीन पिढी तयार झाली. प्रत्येक व्यक्तीचे एक वैशिष्ट्य होतं. इथे त्यांना आकार मिळाला, अर्थात जबाबदारी आली. त्यातून लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री, टेक्नीशियन अशा प्रत्येकाचा कस लागू लागला. एकदा हा भाग नक्की झाला की नवीन नाटक हाती घेतांना माहित असायचं कोण काय करणार…. त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका चांगल्या प्रकारे करता आली. दिग्दर्शकाच्या भूमिकेत चंद्रकांत कुलकर्णी फिट बसले. या ग्रुपमधल्या सुसंवादामुळे दिग्दर्शनाची मोठी इनिंग खेळायला मिळाली, असं ते अभिमानानं सांगतात.

चंद्रकांत कुलकर्णी आता 36 वर्ष दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. याचं सर्व श्रेय कॉलेजच्या सुरुवातीला झालेल्या या ग्रुपला ते देतात. काहीवेळा असे ग्रुप होतात आणि थोड्याफार दिवसानं बंद होतात. उत्साह कमी होतो. पण सुदैवानं या जिगीषाच्या बाबतीत तसं झालं नाही. या ग्रुपनं नाटकासाठी प्रामाणिकपणे मेहनत घ्यायला सुरुवात केली. याचवेळी प्रत्येकाचा अभ्यास सुरु होता. सोबत नाटकाचीही कामं सुरु होती. आणखी एक सुदैवाची गोष्ट म्हणजे त्याचवेळी मराठवाडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात महाराष्ट्रातला पहिला नाट्यशास्त्र विभाग सुरु झाला. कमलाकर सोनटक्के त्याचे प्रमुख होते. हा डिप्लोमा आणि डिग्री कोर्स होता. कुलकर्णी यांनी पदवीपर्यंत नाट्यशास्त्रातला डिप्लोमा पूर्ण केला आणि पदवीनंतर नाट्यशास्त्रातील डिग्रीही मिळवली. हे सर्व सांभाळत असतांना प्रॅक्टीकलमध्ये नाटकही सुरु होतंच. एकीकडे नाटकाचा पुस्तकातला अभ्यासक्रम आणि दुसरीकडे थेट रंगभूमीवर त्याचं प्रॅक्टीकलही सुरु होतं. आधी प्रॅक्टीकल मग थेअरी असा उलटा प्रवास… या सर्वांचा चांगला परिणाम म्हणजे, नाटकात गती निर्माण झाली, नाटकाची अधिक गोडी लागली. जिगीषा या नाटकाच्या ग्रुपने 5 ते 6 वर्ष खूप मेहनत घेतली. या सर्वं गु्पमेंबरच्या मनामध्ये नाटक कोरंल गेलं, ते जिगीषामुळेच… असं चंद्रकांत कुलकर्णी सांगतात. या पाच वर्षाच्या काळात वेगवेगळ्या स्पर्धा, महोत्सवात सहभागी होता आले. याबरोबरच स्वतः वेगवेगळे प्रयोग करुन बघितले. नवीन नाटकं लिहीली गेली. प्रेक्षक सभासद योजना या मंडळींनी औरंगाबादमध्ये राबवली. त्यावेळी या जिगीषा मधील प्रशांत दळवी हे शिक्षण पूर्ण करुन नोकरीला लागले होते. बाकी सर्व मंडळी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत होती. पण पदवी पर्यंत शिक्षण झाल्यावर मोठा प्रश्न समोर आला, तो म्हणजे आता पुढे काय. औरंगाबादसारख्या शहरात पूर्णवेळ नाट्यचळवळीत झोकून द्यायचे असेल तर काही मर्यांदा होत्या. कदाचित रंगभूमीची ओढ मागे ठेऊन आयुष्य वेगळ्या वाटेवर गेले असते. स्थिरस्थावर कसे होता येईल, यावर भर दिला गेला असता. नाट्यचळवळीसाठी झोकून देऊन काम करतोय ही जाणीव कुलकर्णी यांना होती. त्यामुळे हा टप्पा आपण कोण आहोत, आपल्याला काय व्हायचे आहे, हे निश्चित करणारा आहे, याची जाणीव त्यांना होती. यासाठी मुंबईमध्ये येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुंबईची रंगभूमी मोठी… त्यामुळे संधीही चांगली मिळणार होती. त्यामुळे जिगीषामधील आठ ते दहा कलाकारांनी वर्षभरात मुंबईमध्ये जाणीवपूर्वक स्थलांतर केलं. हे सगळे मध्यमवर्गीय घरातले युवक होते. कोणाकडेही नाटकाचा आणि आर्थिकही वारसा नव्हता. पण इथे पालकांची भूमिका मोठी होती, असं चंद्रकांत कुलकर्णी अभिमानानं सांगतात. पालकांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवला. मुलांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. आपली मुलं नाटकासाठी काही करत आहेत. मेहनत घेत आहेत, त्यांना पुढेही मोठी संधी मिळाली पाहिजे. यासाठी मुंबईमध्ये स्थलांतर करणे गरजेचे आहे, याची जाणीव पालकांना होती. सुदैवानं औरंगाबादला नाट्यचळवळ हौशी स्वरुपात नव्हती. तर ती परिपूर्ण होती. त्याचा खूप मोठा अनुभव कुलकर्णी यांच्या गाठीशी होता. त्यामुळे ही सर्व नाट्यप्रेमी मंडळी अगदी सर्व तयारीनीशी मुंबईत दाखल झाली.

औरंगाबादमध्ये असतांना त्यांनी कॉलेजची पदवी, नाट्यशास्त्रातील पदवी यासोबत पत्रकारितेचा डिप्लोमाही केला होता. त्यामुळे मुंबईला आल्यावर त्याचा पहिला उपयोग झाला. मुंबई आल्यावर सकाळमध्ये उपसंपादक म्हणून काम केलं. एकीकडे मुंबईत नाटकही सुरु केलं. चंद्रकांत कुलकर्णी मुंबईतील आपल्या पहिल्या अनुभवाबाबत सांगतात की, पहिल्यांदा या भल्या मोठ्या शहरात आपल्याला संधी मिळेल की नाही याची धाकधूक असायची. सहा महिने त्रास झाला. पण मेहनतीवर विश्वास होता. संधी मिळत गेली. 1990 पासून मग पूर्णवेळ नाटक करण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडली. कारकिर्दीचं पहिलं दशक हे वेगवान झालं. दहा वर्ष त्यांनी फक्त नाटक केलं. चारचौघी, गांधी विरुद्ध गांधी, ध्यानीमनी, वाडा चिरेबंदी, शांतता कोर्ट चालू आहे, हमीदाबाईची कोठी (पुनरुज्जीवित नाटक) या प्रत्येक नाटकात चंद्रकांत कुलकर्णी टच होता…. काहीतरी वेगळं… पण समाजप्रबोधक… सगळे विषय वेगळे… दिग्दर्शक म्हणून ही वर्ष यशस्वी ठरली. ज्या कारणासाठी मूळ गाव सोडून या शहरात येण्याचं धाडस केलं होतं, ते धाडस यशात रुपांतरीत झालं होतं…
या दहा वर्षात मेहनतही भरपूर घेतली. नाटकाला झोकून दिलं. या दशकाच्या शेवटच्या वर्षात बिनधास्तच्या रुपात चित्रपट करण्याची संधी मिळाली. मेहनती स्वभावाच्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी हा ‘बिंनधास्त’ असा केला की त्याचा ठसा कायम मराठी चित्रपट सृष्टीवर राहील. 1998 च्या डिसेंबरमध्ये या चित्रपटाचं शुटींग सुरु झालं आणि 1999 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. बिनधास्त हा बिनधास्तच होता. त्यात रिमा लागू या फक्त अनुभवी कलाकार म्हणून होत्या. बाकी सर्वांचा, अगदी दिग्दर्शकासह सर्वांचाच हा पहिलाच चित्रपट होता.

शर्वरी जमेनीस, गौतमी या नवीन मुली होत्या. मुंबई आणि पुणे मिळून 135 मुलींची स्क्रीन टेस्ट घेतली होती. त्यामुळे या बिनधास्तमध्ये अगदी छोट्या छोट्या भूमिकेसाठीही चपखल बसतील असेच कलाकार होते. यात आलेल्या अभिनेत्री पुढे यशस्वी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत वावरल्या. चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेली सर्व नाटकं काहीशी गंभीर होती. त्याला सामाजीक आशय होता. सिनेमा करतांना मात्र काहीतरी वेगळं करण्याचा विचार होता. त्यातून सिनेमा म्हणजे करमणूक… अशी माफक अपेक्षा होती. मग करमणूक करायचीच आहे ना, मग ती हुशारीनं का नको, असा विचार मनात आला. स्वतः चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, अजित दळवी हे तिघं दोन ते अडीच वर्ष या बिनधास्तच्या कथेचा अभ्यास करत होते. नेहमी दोन मित्रांची गोष्ट असते. मुलींमध्ये काही प्रमाणात कॉलेज जीवनापर्यंत एकत्र मैत्रीचा प्रवास असतो. मग पुढच्या आयुष्यात लग्न, संसार, करिअर यात त्या मैत्रीणींना फार वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे बिनधास्तची कथा हातात आल्यावर त्याचे बरेच टप्पे बघायला मिळाले. फक्त दोन मैत्रिणींची गोष्ट अशा टप्प्यावर कथा आल्यावर त्यात अनेक बदल करण्यात आले. त्यातला मुख्य आणि धाडसी म्हणता येईल असा बदल म्हणजे यात एकही प्रमुख पुरुष पात्र घ्यायचं नाही, अस ठरलं. सर्व गोष्ट महिलांचीच करायची. चित्रपटातील सर्व प्रमुख पात्र ही महिलांची असावी हे नक्की झाल्यावर त्यानुसार कथेचं काम सुरु करण्यात आलं. चित्रपटात महिलाराज होतं. असा प्रयोग यापूर्वी झाला नव्हता. त्यामुळे अधिक उत्सुकता वाढली. वास्तविक बिनधास्त हा कुलकर्णी यांचा पहिला चित्रपट. त्यात असं काही धाडस करणं म्हणजेच बिनधास्तपणाच होता. पण हा बिनधास्तपणा नव्हता… तर एक व्यक्ती दिग्दर्शक म्हणून किती परफेक्ट विचार करु शकते याचं ते प्रमाण होतं. शिवाय चित्रपटाचे निर्माते मच्छिंद्र चाटे यांचा कुलकर्णी यांच्यावर खूप विश्वास. मच्छिंद्र चाटे हे कॉलेजपासूनचे मित्र. कुलकर्णी यांना दोन वर्ष ज्युनिअर… अगदी हुश्शार वि्द्यार्थी. इंजिनीअरींग करतांना त्यांनी स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरु केले. औरंगाबादमध्ये ते यशस्वी झाले… आणि अवघ्या महाराष्ट्रभर त्याचं जाळं विणलं गेलं. त्यांना चंद्रकांत कुलकर्णी या माणसांमधील दिग्दर्शकाची ताकद माहीत होती. त्यांच्या प्रत्येक नाटकांचे प्रयोग चाटे यांनी पाहिलेले. त्यांनी खूप मोठा पाठिंबा दिला. कुलकर्णी यांचं पहिलं चित्रपट दिग्दर्शन. चित्रपटात एकही पुरुष कलाकार नाही, चित्रपटात हिरो नको, हे सुचवणंही मोठं धाडस होतं. पण चाटे हे उत्तम प्रेक्षक होते. त्यामुळे काय वाईट, काय चांगलं हे त्यांना पटकन कळायचं. त्यांनी जेव्हा बिनधास्तची कथा ऐकली तेव्हाच त्यांना चित्रपटाच्या यशाची खात्री होती. जवळपास 1 कोटीच्या वर प्रोडोक्शन कॉस्ट होती. या कथेला कुलकर्णी आणि प्रशांत दळवीच्या मैत्रीचीही पार्श्वभूमी होती. त्या दोघी मैत्रिणींच्या मैत्रीमध्ये त्यांना त्यांची मैत्री दिसली होती. पुढे या चित्रपटाचे सिल्वर ज्युबली शो झाले. प्रियदर्शन या दिग्दर्शकाने त्याचे चार भाषांमध्ये रिमेक केले. या चित्रपटामुळे मोठ्या पडद्यावर चंद्रकांत कुलकर्णी यांची दमदार एन्ट्री झाली. नात्यापलीकडची मैत्री…. ही टॅगलाईनच झाली जणू…. या चित्रपटातील यशाचा खूप मोठा उपयोग झाला. याचं श्रेय प्रत्येकालाच जातं. मच्छिद्र चाटे यांना वितरण क्षेत्रातला जबरदस्त अनुभव होता. त्यांना पहिल्यांदा हिरो कोण आहे, याची विचारणा झाली होती. मग त्यांनी हिरो नाही, दिग्दर्शकचा पहिलाच अनुभव, चित्रपटात सर्व मुलीच… त्याही नवीन… असं जेव्हा वर्णन केलं होतं, तेव्हा या चित्रपटाला यश मिळणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. पण चाटे यांना चित्रपट सुपरहिट होणार याची खात्री होती… त्यांचा हा विश्वास खरा ठरला… आजही बिनधास्त ला चॅलेंज देऊ शकेल असा चित्रपट झालेला नाही.
चंद्रकांत कुलकर्णी मुंबईत आल्यावर त्यांची पहिली दहा वर्ष नाटकाची. मग नाटक आणि सिनेमा या दोघांची. त्यात काही काळ दूरदर्शनच्या मालिकांचाही समावेश झाला. मग मात्र सातत्यानं नाटक – सिनेमा – नाटक – सिनेमा असं चक्र सुरु झालं. या चक्रात त्यांना स्वतःला बघता आलं… या सर्व चक्रात नेहमी पहिला क्रम होता तो रंगभूमीचाच… कुलकर्णी यांचे चित्रपटही अनेक आलेत…. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा वेगळा… कधी गंभीर तर कधी हलका फुलका… तर कधी समाजाच्या वर्मावर मार्मिकपणे बोट ठेवणारा… तर कधी पारंपारिक परंपरांचा आरसा अलगदपणे दूर सारणारा… आजचा दिवस माझा, कदाचित, कायद्याचं बोला, तुकाराम, दुसरी गोष्ट, फॅमिली कट्टा, बिनधास्त, भेट… अशा त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून नवीन चंद्रकांत कुलकर्णी प्रेक्षकांना भेटत गेले. एक मात्र नक्की झालं की चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक आहेत म्हणजे सहकुटुंब सहपरिवार चित्रपट सिनेमागृहात बघायला प्रेक्षक जाऊ लागले. प्रेक्षकांचा हा विश्वास म्हणजे कुलकर्णी यांच्या यशावर सोनेरी मोहोर ठरलाय.
या व्यासंगी दिग्दर्शकाला अनेक पुरस्कारही मिळाले. 2013 साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हे सर्व होत असतांना, चित्रपटात यश मिळत असतांना त्यांनी नाटकाचा हात सोडला नाही. त्याचं कारण सांगताना कुलकर्णी सांगतात, नाटकाला एक शिस्त असते… नाटक म्हणजे एक मोठा समुह असतो. पण त्याला नियम असतात… ते नियम त्यातील प्रमुख कलाकार ते अगदी रंगमंचाची साफसफाई करणारा कामगार असे सर्व पाळतात. त्यामुळे नाटकाची साथ ही कायम राहील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

‘तुकाराम’ हा चित्रपट म्हणजे वास्तववादी चंद्रकांत कुलकर्णी यांच्या कलाकृतीमधील आणखी एक अविष्कार…. कुलकर्णी सांगतात, तुकारामांचा संतपणा महत्त्वाचा आहे. पण त्यांच्यात बंडखोर कवी होता. तो समाज प्रबोधन करु इच्छित होता. अंधश्रद्धेविरुद्ध तो जागरुकाता निर्माण करत होता. त्यांची रचना, अभंग जास्त महत्त्वाचं वाटत होतं. आपल्याकडे तुकाराम पडद्यावर दाखवतांना त्याचा भाबडेपणा अधिक दाखवला जातो. त्यांच्या गाथा म्हणजे समाजाला सुशिक्षित करण्याचे साहित्य होते. या गाथा गेल्या कुठे हा प्रश्न कायम होता. कच्च्या कागदावर लिहिलेल्या गाथा नदीमध्ये बुडवल्यावर पुन्हा कशा वर येतील, हा प्रश्न मनात कायम होता. मी विज्ञानाचा विद्यार्थी… त्यामुळे गाथा पुन्हा पाण्याच्या वर आल्या…. तरंगू लागल्या हे पटत नव्हते. मग नेमकं काय झालं असलं पाहिजे याचा विचार केला. उघड आहे, वारकरी संपूर्ण वारीमध्ये तुकारामांचे अभंग म्हणत असत. गावातील शेतकरी, कष्टकरी आपले नित्य व्यवहार करतांना तुकारामांचे अभंग गात असत. याचा अर्थ त्यांना ते मुखद्गत झाले होते. त्यांच्या कायम मुखात होते…. मनात होते… असे असतांना अभंग लिहिलेली वही बुडवून काय मिळणर होतं. तुकाराम महाराजांनाही हे माहीत होते. माझे अभंग लोकांच्या ह्दयात आहेत. ते त्यांच्या मुखात आहेत. त्यामुळे लिखित अभंग पाण्यात बुडवून काहीही होणार नाही, हे ते जाणून होते. तुकाराम महारांजांचा हा मोठेपणा, ही समज कुलकर्णी यांना समाजापुढे आणायची होती. तुकाराम महाराज हे तुमच्या आमच्या सारखेच एक माणूस होते. त्यांनी सुद्धा प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला आहे. त्यांचे वडील गावंचे बडे सावकार. घरी धनधान्य भरपूर… पण त्यांनाही आयुष्याचे चटके सहन करावे लागले. त्यांना जे आयुष्यानं शिकवलं, जे तत्वज्ञान दिलं त्यातून त्यांची जडण घडण झाली. त्याकाळी भीषण दुष्काळ पडला होता. साधारण अडीच ते तीन वर्षाच्या काळात तुकाराम महाराजांच्या घरात पाच मृत्यू झाले. या दुःखाने त्यांना घडवलं. कुलकर्णी पुढे सांगतात, साधं आपण या लॉकडाऊन मध्ये घरात आहोत, तर नाही नाही ते विचार मनात येतात. आपल्या अस्तित्वाचे विचार मनात येत आहेत. आपलं पुढे काय होणार याची काळजी अनेकांना पडली आहे. या वेळी तुकाराम महाराजांच्या काळातल्या परिस्थितीचा विचार केला तर महाराजांच्या अवस्थेची कल्पना येते. लागोपाठ झालेले मृत्यू… दुष्काळाची दाहकता… यातून माणसंच माणसाला फसवतं होती.. लूटमार चालू होती. या सगळ्यातून त्यांची समाजाकडे बघण्याची दृष्टी किती बदलली असेल. यातूनच तुकाराम ते तुकाराम महाराज असा प्रवास झाला. हा संतपणाचा प्रवास कुलकर्णी ह्यांना तुकाराममध्ये मांडायचा होता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना चंद्रकांत कुलकर्णी यांनी तुकाराम महाराजांच्या विचारांचा अभ्यास केला. महाराज फार मोठं तत्वज्ञान आपल्या समाजाला देतात… हा समाज अशिक्षीत होता… त्यामुळे त्यांना काही देतांना महाराजांनी सर्वसाधारण समाजाची भाषा निवडली… बहुजनांच्या भाषेत अभंगाच्या रुपात त्यांनी तत्वज्ञान दिलं. कुलकर्णी सांगतात, तुकाराम महाराज हे फार मोठे तत्ववेत्ते होते. मोठे सामाजिक कार्यकर्ते होते. अंधश्रद्धेच्या, रुढीपरंपरेच्या विरुद्ध लढणारे होते. यासाठी अंगी हवा असणारी बंडखोर वृत्तीही त्यांच्याकडे होती. देवाबरोबर त्यांचे नाते हे पारदर्शी होते. एवढे की माझ्याकडे पेरणी असेल तर मी तुला भेटायला येणार नाही. थेट आपल्या विठ्ठलालाही त्यांनी अभंगातून सुनावले आहे. म्हणजेच त्यांच्या भक्तीला, श्रद्धेला माणूसपणाची किनार होती. म्हणूनच कुलकर्णी यांनी चित्रपटाचं नाव तुकाराम ठेवलं… संत तुकाराम नव्हे….
गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि तुकाराम महाराज या तिघांच्याही विचारात कुलकर्णी यांना खूप साम्य वाटलं. त्यांना जीवनात जे अनुभव आले, त्यांनी त्यांचे जीवन समृद्ध केले आणि इतरांनाही योग्य संदेश दिला. तुकारामाच्या अभंगाच्या गाथा नदीत बुडवल्या गेल्या… पण स्वतः तुकाराम महाराजांनी आपल्याकडील लोकांच्या हिशोबाच्या वह्याही नदीत बुडवल्या होत्या, हे महत्त्वाचे आहे. माझ्याकडे ज्यांचं कर्ज आहे, ते हिशोब मी बुडवून टाकतो. ते कर्ज त्यांनी माफ केलं. आपल्या घरातील भरलेली धान्य कोठारं त्यांनी जनतेसाठी खुली केली. तुकाराम चित्रपटाच्या वेळी सदानंद मोरे यांची खूप मदत कुलकर्णी आणि त्यांच्या सहका-यांना झाली. मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज. त्यांनी या चित्रपटाच्या कथेसाठी खूप मदत केल्याचं कुलकर्णी सांगतात. या चित्रपटाचे शुटींग साधारण 50 ते 55 दिवस चालू होते. कुलकर्णी मूळ मराठवाड्यातले. ग्रामिण भाग त्यांनी जसा बघितला तसाच शहरी भागही त्यांनी पाहिलेला. या दोघांमधील आर्थिक, सामाजिक फरक त्यांनी जवळून पाहिला आहे. या सर्वांचा तुकाराम चित्रपटाच्यावेळी फायदा झाल्याचे ते सांगतात.
कुलकर्णी यांच्या नजरेतून साकारलेला ‘आजचा दिवस माझा’ हा चित्रपट समाजाचा आरसा दाखवणारा… यात चंद्रकांत कुलकर्णी यांच्यातला पत्रकार डोकावला आहे. एका सामान्य माणसासाठी मंत्रालय रात्री उघडण्यात येतं, त्याची ही कथा आहे. स्वतः कुलकर्णी यांनी जवळपास दोन ते तीन मुख्यमत्र्यांना जवळून बघितलं आहे. त्यांची कार्यपद्धती बघितली. अंतुले जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या काळातील ही सत्यघटना होती. त्यांनी एका रात्रीत एका अंध गायकाला घर दिलं होतं. आजचा दिवस चित्रपट करतांना कुलकर्णी एका वेगळ्या कथेवर काम करत होते. त्यानिमित्त वेगवेगळ्या लोकांना भेटत होते. याचवेळी मंत्रालयात 20 वर्ष काम केलेले एक गृहस्थ त्यांना भेटले. त्यांनी चार मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल जवळून पाहिला होता. अंध गायकाची गोष्ट त्यांच्याबरोबर बोलल्यावर पुढे आली. ही सत्यघटना कुलकर्णी यांना एवढी भावली की, ज्या कथेवर ते काम करत होते, ती मागे पडली आणि आजचा दिवस चित्रपट झाला.

चंद्रकांत कुलकर्णी… अजित दळवी… प्रशांत दळवी हे पक्कं त्रिकुट आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या यशात या दळवी बंधूंचा वाटा मोठा असल्याचं कुलकर्णी अभिमानानं सांगतात. चित्रपटाची कथा हाती आली की, या तिघांच्या विचार विनयातून तिच्यावर संस्कार होतात. या कथेतील टर्निंग पॉईंट समोर येतात. ही कथा फुलत जाते… प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. हा अनुभव जेव्हा एक होतो, त्यातूनच मग प्रत्येक कलाकृतीमध्ये काहीतरी वेगळं साकार होतं. नाविन्य जपण्याचा प्रयत्न होतो. कॉपी हा विषयच नाही. एका विषयाला, कल्पनेला यश मिळालं की पुन्हा त्याची कॉपी नाही. या सर्वांतून नकार द्यायला शिकता आलं, असं कुलकर्णी सांगतात. आपल्याकडे एकदा यश मिळालं की, अनेक प्रोजेक्टबाबत विचारणा होते. मग मिळेल ते काम केलं जातं. पण कुलकर्णी यांचा पिंडच वेगळा… आपल्याला कथा भावली तरच ती हाती घेणार… अन्यथा घरी बसण्याचीही तयारी… आपल्याला पटलं पाहिजे, आवडलं पाहिजे. इथे विचारही लक्षात घेतले जातात. त्यामुळे नाटकात असो वा चित्रपटात तोच तोच पणा कधी आला नाही. आपण त्या विषयाकडे बघतांना आधीच्या अनुभवावर पडदा टाकायचा असतो. तसंच यशही विसरुन जायचं असतं. हाती आलेल्या कथेवर नवीन नजरेतून काम करायला लागतं… तेव्हाच प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतात असे कुलकर्णी सांगतात….
दिग्दर्शक म्हणून यशस्वी असलेले चंद्रकांत कुलकर्णी हे अभिनेते म्हणूनही काही चित्रपटात झळकले आहेत. बनगरवाडी या चित्रपटात त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याबद्द्ल बोलतांना कुलकर्णी सांगतात की बनगरवाडी हे सरप्राईज होतं. अमोल पालेकर हे उत्तम मित्र. मुंबईत आल्यापासून त्यांनी सर्व नाटकं बघितली होती. त्यांना दिग्दर्शक म्हणून कुलकर्णी खूप आवडायचे. अनेकदा नाटकानंतर हे दोघे चर्चा करत असत. पालेकरांच्या नाटकाचा एकदा जिथे प्रयोग होता त्याच ठिकाणी दुस-या हॉलमध्ये एका चर्चेत कुलकर्णी यांनी भाग घेतला होता. कुलकर्णी यांनी अगदी आक्रमकपणे त्यांची मते व्यक्त केली होती. या चर्चेला पालेकर येऊन बसले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी कुलकर्णी यांना फोन करुन भेटायला बोलावले, तसंच बनगरवाडी करतोय, तुला काम करायला आवडेल का असं विचारलं. अमोल पालेकर यांच्यासोबत काम करायचं… अर्थातच कुलकर्णी यांनी हो म्हटलं. पालेकरांना भेटल्यावर त्यांना कळलं की चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. या भूमिकेसाठी आपली शारीरिक चणही उपयोगी पडल्याचे कुलकर्णी सांगतात. या चित्रपटात खूप मान्यवर कलाकारांसोबत काम करता आलं. चंद्रकांत मांढरे यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराचा सहवास त्यांना लाभला. सुषमा देशपांडे, उपेंद्र लिमये, नंदू माधव ही सर्व उत्कृष्ट काम करणारी मंडळी यात होती. या चित्रपटात कुलकर्णी यांची मुख्य भूमिका होती. मास्तरांच्या कथानकावर हा संपूर्ण चित्रपट आधारीत आहे. त्यामुळे प्रत्येक सीनमध्ये कुलकर्णी असायचे. अशावेळी इतर कलाकार मोकळे असत. मग ते कुलकर्णी यांना अभिनेता की दिग्दर्शक असा मजेत प्रश्न करायचे. पण तेव्हाही ते ठाम होते. अभिनेता म्हणून त्यांनी स्वतःला कधी बघितले नाही. दिग्दर्शक हेच आपलं खरं करीयर होतं याची जाणीव त्यांना होती. अमोल पालेकरांसोबत चित्रपट करतांना खूप शिकता आलं असं ते सांगतात. दिग्दर्शक, कॅमेरामन यांचं कसं नातं असतं हे त्यांना बनगरवाडीच्या शुटींगमध्ये शिकता आलं. या सर्वांचा त्यांना भावी आयुष्यात उपयोग झाला. बनगरवाडीनंतर त्यांनी गजेंद्र अहिरे यांच्या पिपाणी या चित्रपटात आणि मोगरा फुलला मध्ये भूमिका केली आहे.
कुलकर्णी स्वतःला अभिनेत्या पेक्षा दिग्दर्शकाच्या भूमिकेत अधिक बघतात. पण मग अभिनयाचे काय…. याबाबत ते सांगतात, दिग्दर्शक हा आपल्या कथेतील प्रत्येक भूमिका ही योग्य माणसालाच मिळावी यासाठी प्रयत्नशील असतो. ते स्वतः छोट्यातल्या छोट्या भूमिकेसाठी सुद्धा योग्य अभिनेत्याची निवड करण्यासाठी आग्रही असतात. दिग्दर्शकाला जे कास्टींग वाटतं त्याचा त्यांना आदर आहे. त्यामुळे कुठल्याही दिग्दर्शकांनं आपल्याला स्वतःहून एखाद्या भूमिकेसाठी विचारलं तर ते ती भूमिका स्विकारतात आणि करतातही. पण यासाठी काहीही तडजोडी मात्र करत नाही. स्क्रीन टेस्ट वगैरे द्यायच्या भानगडीत पडत नाहीत.
हॅम्लेट हे नाटक चंद्रकांत कुलकर्णींनी यांनी रंगभूमीवर नव्यानं आणलं… आणि पुन्हा एकदा मराठी रंगभूमीची ताकद दाखवून दिली. लार्जर दॅन लाईफ या विचारामुळेच हे शक्य झाल्याचं कुलकर्णी सांगतात. हॅम्लेट हे नाटक चालेल का यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं करुन दाखवायचं आहे, हा पहिला विचार त्यांनी केला. एका लंडन दौ-यात त्यांनी तिथल्या रंगभूमीचा अभ्यास केला. काही नाटकं बघितली. त्यांच्या लक्षात आलं की, तिथे एक नाटक एकाच नाट्यगृहात अनेक वर्ष चालू असतं. यावेळी ते महाराष्ट्राच्या रंगभूमीबरोबर तुलना करायचे. आपली नाट्यचळवळ प्रगल्भ आहे. आपल्याकडे टेक्निक जाणणारीही चांगली माणसं आहेत. रंगभूमीला अनेक वर्षांचा वारसा आहे. त्यामुळे लोकांना काहीतरी वेगळं देऊया, असा विचार करुन त्यांनी हॅम्लेट चा प्रोजेक्ट हाती घेतला. या नाटकाची तयारी खूप मोठी होती. नेपथ्य, प्रकाश, वेशभूषा, संगीत अशा प्रत्येकावर खूप काम करण्यात आलं. हॅम्लेट एकाच थेअटरमध्ये करण्यासारखं नाटक होतं. सकाळ, दुपार, सायंकाळ अशा प्रत्येकवेळी नाटकाचे सेट हलवता येणार नव्हते. त्यामुळे कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी सलग तीन दिवस नटकाचे बुकींग मिळतील असे थेअटर घ्यायचे. त्याचे नऊ खेळ मिळवायला लागायचे. मग या तीन दिवसात हॅम्लेटचे चार प्रयोग व्हायचे. अर्थात भाडं नऊ खेळाचं द्यायला लागायचं. त्यामुळे हे सर्व खर्चीक प्रकरण होतं. पण आव्हानं घेण, हा कुलकर्णी यांचा स्वभाव. त्यांना या आव्हानात दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर या दोन निर्मात्यांनी खूप साथ दिली. गेली दहा वर्ष ही मंडळी एकत्र काम करीत आहेत. हे नाटक म्हणजे इतिहासात नोंद होईल असं काम होतं. या नाटकाचा तिकीट दरही खूप होता. या नाटकाचे शंभर प्रयोग होणं हेही खूप मोठी गोष्ट होती. 800 आणि 900 तिकीट दर असतांना एकाही प्रेक्षकांनं तक्रार केली नाही. उलट नाटक बघितल्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रीयाही सकारात्मक होत्या. ही मराठी रंगभूमीची ताकद होती. प्रेक्षकांना नाटकाचा सेट भावला. हॅम्लेटचं संगीत, वेशभूषा हे सगळं खास होतं. या नाटकाची टीमही मोठी होती. जवळपास 73 माणसं होती. रंगभूषाकार, वेशभूषाकार, प्रॉपर्टी, संगीत, लाईट यांची मोठी टीम होती. नाटकात 22 अभिनेते. त्यांचे मेकअप करणारे, मॅनेजर, अगदी नाटकाची पहिली बेल कधी द्यायची, दुसरी बेल कधी द्यायची यासाठी माणसं होती. सुमीत राघवननं कमाल केली. रंगभूमीवर हॅम्लेटच्या रुपात मोठ्ं काम केलं याचा खूप आनंद मिळाल्याचं कुलकर्णी सांगतात. पण इथेच फार मोठी जबाबदारी असते. नाटकांसाठी प्रेक्षक नाट्यगृहात येणं ही जबाबदारी असते. ही जबाबदारी जपण्याची जाणीव कायम ठेवतो, असं ते विनम्रपणे सांगतात.

नाटक, चित्रपट, मालिका अशा तीनही माध्यमांमध्ये मुशाफिरी करणारा हा माणूस. त्यांना प्रत्येक माध्यमांचं महत्त्व माहीत आहे. नाटकात चित्रपट मिसळायचा नाही… आणि चित्रपटाचं नाटक करायचं नाही हे त्यांचं सूत्र. दोन्ही माध्यमांचं आपापलं सामर्थ्य, आपापली वैशिष्टं आहेत. कुलकर्णी यांनी त्यांच्या काही नाटकावरुनही चित्रपट केले आहेत. पण प्रत्येक नाटकावर चित्रपट होऊ शकत नाही हे ते जाणतात. काही कथा या चित्रपटासाठी असतात… तर काही नाटकासाठी… त्याचा नेमका वेध घ्यायला लागतो. ‘भेट’ नावाच्या त्यांनी केलेल्या चित्रपटाची कथाही अशीच… रोहीणी कुलकर्णीं यांची ही कादंबरी… त्यांच्याकडे ही कादंबरी समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी पाठवली. टिव्ही मालिकेसाठी. ही कांदबरी कुलकर्णी यांनी एका दमात वाचून काढली. तेव्हाच त्यांना समजले की ही कादंबरी भागांमध्ये सादर करता येणार नाही… तर ती सलगच बघावी लागेल. अर्थात त्यावर चित्रपट काढता येईल हे त्यांनी कादंबरी वाचल्यावर लगेच नक्की केलं होतं.
चंद्रकांत कुलकर्णी हे यासाठी मार्मिक उदाहरण देतात. दिग्दर्शक हा घ़ड्याळ दुरुस्त करणाऱ्यासारखा असतो. तो हातावरील घड्याळही दुरुस्त करु शकतो तर भींतीवरील घड्याळही दुरुस्त करतो. इथे घड्याळीची बनावट फक्त वेगवेगळी असते… आणि ती समजून घेतली की काम सहज होतं. त्यामुळे तीस सेकंदाची जाहीरात असो की तीन तासांचा चित्रपट असो, प्रत्येकाचे काही नियम असतात, ते लक्षात घ्यायला लागतात. पण या सर्वांमधूनही प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न मात्र कायम करावा, असंही ते सांगतात.
आता या लॉकडाऊनच्या काळात कुलकर्णी काही नवीन कथांवर काम करत आहेत. लॉकडाऊनला ते सकारात्मक दृष्टीने घेत आहेत. 14 डिसेंबरला त्यांचं रंगभूमीवर हरवलेल्या पत्यांचा बंगला हे नाटक आलं. त्याचे 50 प्रयोग झाले. वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर, दिप्ती लेले यांचा त्यात सहभाग आहे. स्वरा मोकाशी या नवीन लेखिकेचे हे नाटक आहे. नाटक जोरदार सुरु झालं आणि लॉकडाऊन लागलं. त्यामुळे थांबावं लागलं. पण काम थांबत नाही. आता आणखी नवीन कथांवर नाटकांच्या दृष्टीकोनातून काम चालू आहे. बाकी लॉकडाऊनमध्ये ते सुद्धा इतरांसारखे काम करत आहेत. कधी थोडी स्वयंपाकघरात मदत, थोडा व्यायाम हे ठरलेलं. रोज एक चित्रपट बघितला जातो. याशिवाय वाचन आहेच. खरतर या अशा जीवनशैलीची कुणालाच सवय नाही. ज्या घरासाठी सर्व करतो, त्याच घरात साधं महिनाभर बसता येत नाही. यातून आलेली अस्वस्थता चिंतेत टाकणारी आहे. याबाबत चंद्रकांत कुलकर्णी यांचा दृष्टीकोण सकारात्मक आहे. आणि बरचं काही शिकवणारा आहे. ते सांगतात, आपण सामान्य माणसं आहोत. कुणी संत नाही. प्रत्येकाला रोजचा प्रश्न आहे. थोडीशी भीती, चिंता, काळजी वाटणार. आपलं कसं होणार ही काळजी लागणार. पण अशावेळी एक व्यापक विचार करावा, जे सर्वांचं होणार तेच माझं होणार. बस्स.. हे सगळं पूर्वपदावर यायला वेळ जाईल. पण नक्की सगळं सुरळीत होणार. असा विश्वासही व्यक्त करतात.
रंगभूमीसाठी ते सदैव आशावादी आहेत. नाटक कधीही संपू शकत नाही. प्रेक्षक नाटक बघायला येतात कारण या नाटकातून आपल्याला काहीतरी मिळणार हे त्यांना माहीत असतं. म्हणून ते स्वतःचा वेळ आणि पैसा देऊन नाटक बघतात. हे प्रेक्षक स्वतः अंधारात बसतात. यावेळी नाट्यगृहात वेगवेगळी माणसं असतात त्यांचे विचार वेगळे असतात. जात-धर्म वेगळा असतो. पण ती एका विचारानं बाधली जातात. नाटक बघतांना ती सर्व काही विसरुन जातात. ती एकरुप होतात… ही माणसं एकाचवेळी हसतात… रडतात… ही सर्व रंगभूमीची ताकद आहे. या कोरोनाच्या वादळानंतर होणा-या मानसिक अवस्थेला सांभाळण्यासाठी रंगभूमीची हीच ताकद उपयोगी येईल असा विश्वासही या अनुभवी दिग्दर्शकांनं व्यक्त केला आहे.