ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
प्रयोगशील दिग्दर्शक दामू केंकरे
रंगभूमीवर अव्याहत न थकता काम करणारी मंडळी आणि रंगभूमीच्या विकासासाठी पदभारासह कार्यरत मंडळी असे दोन वर्ग ढोबळमानाने सांगता येतात. पण काही रंगकर्मी ह्या दोन्हींचा उचित समतोल साधतात. दामू केंकरे हे असंच एक रंगकर्मी व्यक्तीमत्व. मराठी रंगभूमीसाठी वयाची ६० वर्षे देऊ करणा-या दामू केंकरे यांचा आज स्मृतीदिन.त्यानिमित्ताने देऊया त्यांच्या स्मृतींना उजाळा!
दामू केंकरे तथा दामोदर काशीनाथ केंकरे यांचा जन्म ५ मे १९२८ रोजी मडगाव येथे झाला. १९५७-१९७८ या वर्षांत जे.जे.स्कुल ऑफ आर्टमध्ये त्यांची कारकीर्द बहरली. त्यादरम्यान नाट्यसृष्टीशीही त्यांचा निकटचा संबंध होता. दि गोवा हिंदू असोसिएशनच्या संपर्कात आल्यानंतर अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या तसेच दिग्दर्शनही केले.
हॅम्लेट, कालचक्र,उद्याचा संसार,आपलं बुवा असं आहे, वाजता अपुले पाऊल,सूर्याची पिल्ले,अखेरचा सवाल,कार्टी प्रेमात पडली, घेतलं शिंगावर,बि-हाड वाजलं अशा अनेक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यांना जागतिक रंगभूमीवर गाजलेलं नाटक ‘हॅम्लेट’ करुन बघायचे होते. पु.लं.देशपांडे यांना त्याविषयी केंकरे यांनी सांगितलं. त्यावर पुलंनी नागपूरच्या नाना जोग यांनी लिहिलेल्या हॅम्लेट विषयी माहिती दिली आणि आपण स्वत: त्यांना याविषयी पत्रानं कळवू असं आश्वस्तही केलं. नानांनी ती मागणी मान्य केली पण त्यांची एकच अट होती; हॅम्लेटची भूमिका करणारा नट आपण स्वत: निवडणार. १२ लोकांची या भूमिकेसाठी ऑडिशन झाल्यावर नाना जोग यांनी फायनल केलेला नट होता स्वत: दामू केंकरे. त्यांची ती भूमिका दीर्घकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहीली. त्याशिवाय पुलंच्याच ‘तुज आहे तुजपाशी’ मधील शामभैया आणि ‘सुंदर मी होणार’ मधील संजय कवीची भूमिकाही त्यांनी उत्तम वठवली.
जे.जे.स्कुल ऑफ आर्टमधील अनुभवामुळे दामू केंकरे यांच्याकडे ती कलात्मक दृष्टी होती. त्यांनी केलेले काही नाटकांचे नेपथ्यही असेच नाट्यरसिकांच्या मनात घर करुन गेले. विजय तेंडुलकर लिखीत ‘तुघलक’ नाटकांचे दामू केंकरे यांनी केलेले नेपथ्य त्यापैकीच एक. ‘स्पर्श’ या जयवंत दळवी लिखीत नाटकासाठी केंकरे यांनी केलेले नेपथ्य पाहून ज्येष्ठ लेखक, नेपथ्य जाणकार द.ग.गोडसे यांनी दामू केंकरे यांना चक्क साष्टांग नमस्कार घातला होता.
‘तुझ्याविना करमेना’ सारख्या चित्रपटातून दामू केंकरे यांनी चित्रपट दिग्दर्शनही केले.
अभिनेता, दिग्दर्शक,नेपथ्यकार अशी बहुपैलू भूमिका पार पाडल्यानंतर कलाकार मंडळींसाठी दामू केंकरे यांनी केलेली महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गोरेगाव मुंबई येथील चित्रनगरीची निर्मिती. राज्याचे सांस्कृतिक संचालक म्हणूनही दामू केंकरे यांनी पदभार सांभाळला होता.त्याकाळातच ‘चित्रनगरी’ प्रकल्प नेटाने पार पडला. त्यांचे चिरंजीव विजय केंकरे यांनी आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत दर्जेदार नाटकांची नाट्यदिग्दर्शन परंपरा अबाधित ठेवली आहे.
कलाकार म्हणून रंगभूमीची सेवा आणि सांस्कृतिक खात्यातील पदभाराद्वारे कलाकारांचा विकास या दोन्ही गोष्टी दामू केंकरे यांनी अतिशय यथार्थपणे सांभाळल्या. त्यांच्या स्मृतीदिनी हा आठव करणे औचित्याचे ठरावे.