ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
दिग्दर्शक महेश भट्टची सर्वोत्तम कलाकृती
गुरुदत्त, राज खोसला, विजय आनंद यांच्या परंपरेतील सत्तर व ऐंशीच्या दशकातील दिग्दर्शक म्हणून महेश भट्टचे नाव घेतल्यास अनेकांच्या भुवया उंचावतील. लगेचच ते महेश भट्टने चाहत, कब्जा, अंगारे, ड्युप्लिकेट अशी आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटांची संख्या कशी वारेमाप वाढवली आणि मग पंचवीस वर्षांच्या चित्रपट दिग्दर्शनानंतर कसे थांबणे पसंत केले याकडे लक्ष वेधतील. महेश भट्टचा १९७४ चा ‘मंझिले और भी है‘ ते १९९९ चा ‘काडतूस‘ असा पंचवीस वर्षांचा चित्रपट दिग्दर्शनाचा भरभराटीचा काळ होता.
महेश भट्टला चालता, बोलताना/ पाहताना/ ऐकताना/ सांगताना सतत ‘आपला चित्रपट’ दिसतोय असे त्याच्या मुलाखतीचा योग आला असता जाणवले. उगाच नाही हो, तो एकाच वेळेस दोन तीन चित्रपटांचे शूटिंग करत असे आणि सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपट बहुस्तरीय वाटचाल ( एकिकडे अमिताभचा ॲग्री यंग मॅन, दुसरीकडे ह्रषिकेश मुखर्जी, गुलजार यांचा क्लालिटी चित्रपट असे विविध प्रवाह) करत असताना त्यात महेश भट्टचं आपले एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि स्थान निर्माण झाले. हे उल्लेखनीय.
त्याचा सर्वोत्तम चित्रपट “सारांश“(Saaransh). मुंबईत रिलीज २५ मे १९८४. चाळीस वर्ष पूर्ण झाली देखील. तरी या क्लासिक चित्रपटाचा प्रभाव कायम आहे. यालाच ग्रेट कलाकृती म्हणतात. राजश्री प्राॅडक्सन्स निर्मित हा चित्रपट आहे. राजश्री प्राॅडक्सन्सचा वितरण विभाग चित्रपटाच्या प्रदर्शनात सतत काही प्रयोग करीत असे. ‘सारांश’ त्यांनी दक्षिण मुंबईतील मेट्रो चित्रपटगृहात दिवसा चार खेळ, वांद्र्यातील वांद्रा टाॅकीज (चार खेळ) आणि अंधेरीतील मायनाॅर चित्रपटगृह (चार खेळ) असा मुंबईतील मोजून तीन चित्रपटगृहातून अगदी लो प्रोफाईल प्रदर्शित केला.
चित्रपटाची मुंबईतील मराठी, इंग्लिश, हिंदी व गुजराती वृत्तपत्रातील समिक्षा आणि माऊथ पब्लिसिटी यानंतर त्यांनी हळूहळू चित्रपटगृहांची संख्या वाढवली. चित्रपटाचं व्यक्तिमत्त्व आणि त्याची त्यानुसार पब्लिसिटी आणि प्रदर्शन याकडे पूर्वी विशेष लक्ष दिले जाई. त्यात कल्पकता असे. महेश भट्टचा ‘अर्थ‘(१९८३) नंतरचा चित्रपट म्हणून ‘सारांश‘ बद्दल विशेष अपेक्षा होत्या.
आपल्या देशात १९८२ साली रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ यांचे आगमन झाल्यावर व्यावसायिक मसालेदार मनोरंजक चित्रपटाची चोरट्या मार्गाने व्हिडिओ कॅसेट येऊ लागल्याचा चित्रपट व्यवसायाला फटका बसत होता. या वातावरणात “सारांश”सारख्या (Saaransh) बौद्धिक मनोरंजनाला स्थान कितपत मिळेल अशीही शंका असली तरी अशा चित्रपटांचा आपला एक हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला होता, त्याने “सारांश”चे कौतुक केले आणि चित्रपटाने उत्तम व्यावसायिक वाटचाल केले. “सारांश” चित्रपटाला ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष फोकस टाकायचा तर, चित्रपटाची थीम अतिशय महत्वाची गोष्ट.
निवृत्त शिक्षक बी. व्ही. प्रधान (अनुपम खेर) आणि त्यांच्या पत्नी पार्वती प्रधान (रोहिणी हट्टंगडी) हे शिवाजी पार्क येथे राहणारे वृध्द दांपत्य आपल्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या सुजाता सुमन (सोनी राझदान) या युवतीची फसवणूक केलेल्या विलास चित्रे (मदन जैन) याचे वडील पाॅवरबाज राजकीय नेते गजानन चित्रे (निळू फुले) यांना सुजाताला न्याय मिळवून देण्यासाठी भेटतात. पण तेव्हा त्यांना अवहेलना सहन करावी लागते.
राजकीय दडपशाहीचाही अनुभव येतो. तसेच त्यांच्या विदेशात मृत पावलेल्या मुलाच्या अस्थी मिळवण्यासाठीही शासकीय यंत्रणेचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. अतिशय व्यथित झालेले प्रधान मुख्यमंत्री शशिकांत (आकाश खुराना) भेट घेऊन आपली व्यथा मांडतात… असे नाट्यपूर्ण कथासूत्र महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटाची त्या काळात माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली. तरुण वयातच अनुपम खेर आणि रोहिणी हट्टंगडी यांनी वृध्द व्यक्तिरेखा साकारली हे विशेषच होते.
========
हे देखील वाचा : प्रेमा नारायण सत्तरीत
========
“सारांश”चे (Saaransh) लेखन खुद्द महेश भट्टचे. साठी ओलांडलेल्या निवृत्त शिक्षक बी. व्ही. प्रधान आणि पार्वती प्रधान या शिवाजी पार्क येथे राहत असलेल्या या वृध्द दाम्पत्याच्या मुलाची अमेरिकेत दुर्दैवाने हत्या होते, या अनपेक्षित धक्क्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच अमेरिकेतून आलेल्या मुलाच्या अस्थी मिळवताना कस्टम अधिकाऱ्याकडून झालेल्या अपमानाच्या वेळी प्रधान यांचा होणारा उद्रेक अशा मार्गाने ही कथा काही वळणे घेत घेत पुढे सरकते. क्लायमॅक्सपर्यंतचा या चित्रपटाचा प्रवास खूपच नाट्यमय व भावनिक आहे.एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय वृध्द दाम्पत्याला एकमेकांना भावनिक आधार देत देत परिस्थितीशी करावा लागणारा सामना म्हणजेच हा “सारांश” चित्रपट.
या चित्रपटाची वैशिष्ट्ये अनेक. अनुपम खेरने ही भूमिका साकारली तेव्हाचे त्याचे प्रत्यक्षातील वय अवघे २८/२९ होते. तर रोहिणी हट्टंगडी यांचेही तेवढेच. दोघांचाही जन्म १९५५ चा. म्हणजेच मूळ वयापेक्षाही खूप वाढत्या वयाच्या व्यक्तीरेखा साकारण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते आणि ते त्यांनी पेलले. अनुपम खेरने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकताना आपला मित्र सुहास खांडके याच्या “दोजख“मधील भूमिका स्वीकारली होती तरी “सारांश” त्याचा पहिला चित्रपट.
खरं तर राजश्री प्राॅडक्सन्सच्या वतीने संजीवकुमारचे या भूमिकेसाठी नाव निश्चित होत होते. काही गोष्टी घडल्या आणि अनुपम खेर यात आलाच पण त्याचं अख्खं करियर त्यामुळेच घडले. मध्यंतरी एका मुलाखतीत अनुपम खेरने म्हटले, अनेक जण त्याला सांगतात की, अनेक वर्ष तू चित्रपटातून भूमिका साकारत आहेस पण ‘सारांश’सारखी (Saaransh) भूमिका तू केली नाहीस. अनुपम खेरला हे म्हणणे पटते आणि कस्टम अधिकाऱ्याबरोबरचा प्रसंग साकारताना आपण कसा विचार केला आणि थोडी कल्पनाशक्ती आणि थोडा अभिनयातील कसब यावर तो प्रसंग साकारला असे तो सांगतो. रोहिणी हट्टंगडी या रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित ‘गांधी‘ (१९८२) मधील कस्तुरबा गांधी या भूमिकेमुळे चर्चेत होत्या. महेश भट्ट दिग्दर्शित ‘अर्थ‘ (१९८३) मध्ये भूमिका साकारल्यावर महेश भट्टने “सारांश“मधील भूमिकेसाठी त्यांना आग्रहाने विचारले.
========
हे देखील वाचा : हिंदी चित्रपटसृष्टीतील हा पहिला युध्दपट
========
‘सारांश’मध्ये (Saaransh) लहान मोठ्या व्यक्तीरेखा अनेक आहेत. सोनी राजदान, मदन जैन, सुहास पळशीकर, सलिम घौष, अरुण बक्षी, हैदर अली आणि निळू फुले वगैरे. चित्रपटाचे संवाद अमित खन्नाचे, गीते वसंत देव यांची तर संगीत अजित वर्मन यांचे आहे. कला दिग्दर्शन मधुकर शिंदे यांचे असून वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओत याचा सेट लागला होता. आणखीन एक विशेष, प्रभादेवी येथील राजश्री प्राॅडक्सन्स कार्यालयातील मिनी थिएटरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात आला होता. त्यांनी या चित्रपटाचे विशेष कौतुक केले. (या मिनी थिएटरमध्ये फक्त सतरा सीटस होत्या.) हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी या चित्रपटाचे बरेच असे विशेष खेळ आयोजित करण्यात आले होते. या चित्रपटाचे संकलन डेव्हिड धवनचे होते हे विशेष.
“सारांश” (Saaransh) प्रदर्शित झाला त्याच एक दोन वर्षात महेश भट्ट दिग्दर्शित ‘अर्थ’, मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘आगमन’ आणि ‘गमन’, सागर सरहादी दिग्दर्शित ‘बाजार’, कांतीलाल राठोड दिग्दर्शित ‘रामनगरी’, शेखर कपूर दिग्दर्शित ‘मासूम’, गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘अर्ध सत्य’, श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘आरोहण’, शंकर नाग दिग्दर्शित ‘ग्रीड’, बालू महेन्द्रू दिग्दर्शित ‘सदमा’, एम. एस. सथ्यू दिग्दर्शित ‘सुखा’ असे वेगळ्या प्रवाहातील चित्रपट रसिकांसमोर आले. त्यातील ‘अर्ध सत्य’, ‘सदमा’ आणि ‘सारांश‘ यांची चाळीस वर्षांनंतरही सकारात्मक चर्चा होतेय हे विशेष.
‘सारांश’ला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विशेष उल्लेखनीय. त्याच वेळेस ‘सारांश’ हा भारताचा ऑस्करसाठीची अधिकृत प्रवेशिका चित्रपट होता. एनडीटीव्ही या उपग्रह वाहिनीच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सत्तर भारतीय चित्रपटात ‘सारांश’ होता. ‘सारांश’ (Saaransh) फक्त चित्रपट नाही, तर सामाजिक व्यवस्थेचे चित्रणही आहे. महेश भट्टचा सर्वोत्तम चित्रपट आहे.