‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
दिवाळीची फिल्मी चाहूल
सिनेमाच्या जगाला, विशेषतः स्टार्सना ‘दिवाळी जवळ आली’ हे सर्वप्रथम कधी लक्षात येते माहितेय? साधारण तीन चार महिने अगोदरच समजते. काही मराठी दिवाळी अंकासाठी या स्टार्सच्या दीर्घ मुलाखतीसाठी फोन (अलिकडे मेसेज) सुरु होतात तर काही ग्लॉसी पेपर्सवरील इंग्रजी मॅगझिनकडून हिंदीतील स्टार्सना फोटो सेशनच्या ‘आयडियाच्या कल्पना’ मेल केल्या जातात. पूर्वीच्या स्टारना इतक्या अगोदर मुलाखती अथवा फोटो सेशन करावे लागते याची कल्पना असे. अनुभव असे. मुलाखतीसाठी मराठी नि हिंदी असे दोन्हीचे स्टार घरीच बोलवत. तेव्हाची ती प्रथाच होती. त्यामुळे सविस्तर उत्तरे मिळत. माझ्या तर काहींशी ऑफ द रेकॉर्ड गप्पा होत (त्या अजूनही तशाच ठेवल्यात, काही कालबाह्यही झाल्यात), फोटो सेशन तर चक्क दिवसभर चालत. पण सगळे कसे ‘हे सर्व दिवाळीसाठी’ असा मूड असे. साधारण वीस वर्षांपूर्वी मराठीत हळूहळू कॉफी शॉपमध्ये मुलाखतीला भेटू हा ट्रेण्ड सुरु झाला, काही वर्षांनी एक तर मोबाईलवर अथवा सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आपण भेटू तेव्हा मुलाखत करु हे रुजले. मला याची सवय लावून घ्यावी लागली. हिंदीत ग्रुप मुलाखतीचे पेव फुटले. स्टारदेखिल एकेक मुलाखत देत किती बसणार? लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन मुलाखती ट्रेण्ड रुजला. बैठक मारुन मुलाखत घ्यावी या परंपरेपासून हे बरेच दूर. एकीकडे हा “माध्यम बदल” झाला तरी दिवाळी अंकाची परंपरा यंदाचा मोठा अडथळा/ आव्हाने असूनही सुरु आहे.
फार पूर्वीची दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर मराठी अभिनेत्री रांगोळी काढतेय, कंदिलाजवळ उभी आहे, फुलबाजाचा आनंद घेतेय, लक्ष्मीपूजन करतेय हे आजही सुरु आहे. अगदी अनेक प्रकारच्या ‘दिवाळी जाहिरातीत’ हेच ‘फोटो फिचर’ असते. परंपरावादी मराठी समाजाला हे आपलंस वाटते. पण या सगळ्याची सुरुवात आजही खूप लवकर करावी लागते. यावर्षी लॉकडाऊनच्या दिवसात मनोरंजन विश्वाची गती मंदावली तरी त्यानंतर श्रृती मराठे, सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर) यांचे दिवाळी फोटो शूट झालेच. काही जाहिरातीत काही मराठी सेलिब्रेटिज चमकले. दिवाळी अंकाची संख्या यावर्षी थोडी कमी असली तरी मुखपृष्ठावर अभिनेत्रींचे प्रमाण लक्षणीय असेल. दीपिका पादुकोन, कंगना रानावत यांच्यापेक्षा विद्या बालन, श्रध्दा कपूर यांना जास्त पसंती दिसेल. त्या दोघी का नाहीत याचे फटाके आता वेगळे फोडायला नकोत. आता तुम्ही म्हणाल, मराठी अभिनेत्रीना कव्हर गर्ल म्हणून स्थान नाही? तेही असेलच, पण दोन नावे घ्यावीत तर चार सहा राहतील. तरी एका दिवाळी अंकाचा संपादक म्हणाला, मराठी अभिनेत्रीने आपल्या स्वाक्षरीने आपल्या फोटोला मान्यता दिली तर बरे होईल…. कदाचित त्याची काही तत्वे असावीत.
यंदाच्या दिवाळी अंकात काही हुकमी विषय असणारच. एक म्हणजे, सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या (चित्रपट कलाकार आत्महत्या का करतात?), लॉकडाऊननंतरचे मनोरंजन विश्व (याचा नेमका अंदाज यायला वेळ लागेल), लॉकडाऊनचा मनोरंजन क्षेत्रावरचा परिणाम (खरं तर हा खूप मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे, तंत्रज्ञ आणि कामगारांना जास्त फटका बसला), ओटीटी हे भवितव्य आहे का? (ती एक प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचवायची नवीन पध्दत आहे, आजच्या ग्लोबल युगातील गतिमान जीवनशैलीला साजेशी), सिंगल स्क्रीन थिएटर्सचे भवितव्य (अनेक छोट्या शहरात चार पाच जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद झाली तरी एक भव्य मल्टीप्लेक्स आलेच. म्हणजे उत्तम पर्याय आलाच), तसेच ऋषि कपूर, इरफान खान यांच्यावर लेख असतीलच. आणि नेहमीचा पारंपरिक विषय म्हणजे, कलाकारांची दिवाळी. बहुतेक मनोरंजन वाहिन्यांकडूनच त्यांच्या कलाकारांचा असा ‘तयार फराळी मजकूर’ येतो आणि पाने भरणे सोपे जाते. हेही सर्व करायला खूपच अगोदर सुरुवात करावी लागते. खरं तर स्टार्सच्या लहानपणीच्या दिवाळीत फार वेगळे काही नसतेच. पण एखाद्या दूरवरच्या शहरात अथवा गावात एकादी वेगळी असलेली दिवाळी प्रथा त्याने सांगावी अशी अपेक्षा असते.
दिवाळी पहाट वगैरे सांस्कृतिक कार्यक्रमात सेलिब्रेटिजना स्थान असतेच. ऑनलाईन की प्रत्यक्षात हा यावर्षीचा महत्वाचा प्रश्न असला तरी त्यासाठी खूप अगोदरपासूनच तारीख द्यावी घ्यावी लागते.
दिवाळी म्हणजे फेस्टीवल तसेच दिवाळी म्हणजे अशी अनेक स्तरांवर मनोरंजन क्षेत्राशी कनेक्टीव्हीदेखिल आहे. आणि आजच्या ग्लोबल युगातील एकाद्या स्टारला श्रावण महिन्यातच एकाद्या दिवाळी अंक मुलाखतीसाठी फोन आला तर त्याने आश्चर्यचकित होऊ नये. किंबहुना, शूटिंगपासून सुपारीपर्यंत आणि स्टोरी सिटींगपासून इव्हेन्टसपर्यंत आपण कितीही बिझी असलो, मोबाईल ऑन करायला वेळ नसला तरी एक दीर्घ मुलाखत द्यावीच. याचे कारण म्हणजे अनेक दिवाळी अंक जवळपास आठ ते नऊ महिने कुठे ना कुठे वाचले जात असतात, तेवढ्या प्रमाणात तुम्हीही पोहचत असता. सिनेमाच्या प्रमोशनच्या मुलाखतीची जत्रा इकडेतिकडे भरपूर ‘कव्हरेज’ देईल, पण त्याचा खरंच प्रत्येक चित्रपटाला फायदा होतो काय? काही मराठी चित्रपट तर त्याची पुरेशी पब्लिसिटी होण्यापूर्वीच थिएटरमधून जातात. हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये बघा असा डंका पिटून उपयोग काय?
मी अनेक वर्षे दिवाळी अंकात लिहितोय. त्यात माझ्या आठवणीत राहिलेली मुलाखत राखी गुलजारची! २०१२ साली लोकसत्ता दिवाळी अंकासाठी ती केली. तेव्हा, आज ‘आऊटफोकस’ असलेली पूर्वीचे स्टार असा फोकस होता आणि चर्चेत दोन तीन नावे आली. त्यात राखी गुलजारची मुलाखत मला करावीशी वाटली, तरी ते आव्हानात्मक आहे याची कल्पना होती. फार पूर्वी दिग्दर्शक राज एन. सिप्पीच्या ‘सौगंध’ आणि राहुल रवैल दिग्दर्शित ‘जीवन एक संघर्ष’च्या सेटवर तिची मुलाखत घेतली होती. पण तेव्हा हिंदी चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टीगसाठी आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून बोलावले जाई, त्यात बड्या स्टार्सच्या लहान मोठ्या भेटी होत. पण दिवाळी अंकासाठी मुलाखत म्हणजे जणू सत्तर एमएमचा चित्रपट! राखीने राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन’ वगैरे चित्रपटात भूमिका साकारल्याचे माहित होते. त्यामुळे त्याच्याच फिल्म क्राफ्टच्या माध्यमातून राखीची भेट झाली. तेव्हा राखी पनवेलकडून आपण पेणकडे जाताना तारा नावाचे गाव आहे, तेथून पुढे गेल्यावर ब्रीज चढण्यापूर्वीचा लेफ्ट घेऊन खूप खूप आत गेल्यावर एका फार्म हाऊस आहे, तेथे राखी राह्यची. मुलाखत अतिशय मनमोकळी झाली. ‘मी एकटी आहे, एकाकी नाही’ असे शीर्षक दिले होते. आश्चर्य वाटले, तेव्हा तर झालेच पण आणखी दोन वर्षे या मुलाखतीवर रिस्पॉन्स मिळत होता. मला ऐशीच्या दशकातील दिवाळी अंकाचे दिवस आठवले. तेव्हा असे बराच काळ वाचक भेटत. आजही वाचक आहेत आणि ऑनलाईन दिवाळी अंकालाही भरपूर लाईक्स मिळताहेत. पण अशा सखोल आणि विविध अंगाने जाणारी मुलाखत मिळायला हवी. ते म्हणजे, एखाद्या ताज्या घटनेवरचा वृत्त वाहिनीसाठीचा फोनो नाही. तीन चार मिनिटात बरेच काही ना काही सांगून झाले.
असो. बदल होतच असतो आणि होणारच असतो. सिनेमाचे जग आणि मिडिया यांच्या दिवाळीतील नातेसंबंधाची सुरुवात एक खूप मोठी परंपरा आहे आणि विशेष म्हणजे, थोड्या मागील पिढीतील अनेक कलाकारांनी आपले मुखपृष्ठ असलेले अथवा मुलाखत असलेले दिवाळी अंक अगदी आजही जपून ठेवलेत. त्यांच्यासाठी ती एक छान आठवण नक्कीच आहे. दिवाळी अंक हा आठवणीत रहाणारा असाच सण आहे. त्यातील एक रंग सिनेमाचा असतोच, तो हा असा. या जोडीला दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक सेलिब्रेटिजचे नवीन प्रशस्त घर, स्मार्ट टीव्हीची खरेदी, परदेशी फिरायला जाण्याचे प्लॅनिंग (यंदा थोडे उशिरा), नवीन मॉडेलची गाणी घेणे हे असतेच असते. वर्षभर आपण या चित्रपटापासून त्या वेबसिरिजपर्यंत धावपळ करतोय, त्यातून हे घ्यायलाच हवे आणि त्यासाठी दिवाळीचा मुहूर्त अगदी उत्तम.