
Do Bigha Zamin निमित्त व्हेनिस चित्रपट महोत्सवात
दर्जेदार चित्रपट कलाकृतीला काळाचे बंधन नसते. काळ कितीही पुढे सरकला, त्यासह सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रात फरक पडला तरी त्या महान कलाकृतीचे महत्व कायम असते. अशीच एक कसदार कलाकृती बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो बिघा जमीन’ (१९५३). व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या कलाकृतीचा खास खेळ आयोजित करण्यात आला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत व्हेनिस चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट काळातील एक भारतीय चित्रपट त्यात दाखवला जाणार आहे ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. सगळेच चित्रपट पडद्यावरुन उतरल्यावर संपत नाहीत अथवा इतिहास जमीन होत नाहीत. काही चित्रपट आपले अस्तित्व त्यानंतरही अनेक वर्ष अधोरेखित करीत असतात. चित्रपट इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. तब्बल बाहत्तर वर्षांपूर्वीचा चित्रपट अशा पध्दतीने गौरविण्यात येणार आहे, ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमान वाटावी अशीच गोष्ट.

चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, बिमल रॉय, मेहबूब खान, के. असिफ, अमिया चक्रवर्ती, चेतन आनंद, कमाल अमरोही, बी. आर. चोप्रा विजय आनंद, गुरुदत्त, राज खोसला या दिग्दर्शकांच्या चित्रपटांची नावे याबाबत आवर्जून नावे घेता येतील. तसेच बंगाली चित्रपटसृष्टीत सत्यजित रे, ऋतित्क घटक, मृणाल सेन, अदूर गोपालकृष्ण यांनी प्रादेशिक चित्रपटातून जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. जगभरातील चित्रपट महोत्सवात आपल्या देशातील चित्रपटांचा सन्मान ही अभिमानास्पद गोष्ट.

बिमल रॉय यांच्या १२ जुलै रोजी या जन्म दिवसाच्याच दिवशी व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘दो बिघा जमीन’ दाखवण्यात येणार आहे हे वृत्त आले हे विशेषच. बिमल रॉय यांनी चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी कोलकत्ता येथे आपली कारकिर्द सुरु केली. ‘उदयेर पथे ‘ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला बंगाली चित्रपट होय. त्यात बिमला बोस आणि अजय चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तेथे न्यू थिएटर्स या प्रतिष्ठित बॅनरसाठी त्यांनी ‘हमराही’ आणि ‘पहला आदमी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि त्यानंतर ते आपण अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करायला हवा म्हणून ते मुंबईत आले.
================================
हे देखील वाचा : आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले ‘रामराम गंगाराम’
=================================
(तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘बॉलिवूड’ असे अंधानुकरण झाले नव्हते. आणि आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळावा म्हणून आपण मुंबईत जायला हवे ही तेव्हापासूनची मानसिकता). आणि तसे करताना त्यांनी बंगाली चित्रपट सोडून सगळे लक्ष हिंदी चित्रपटावर केंद्रित केले. पण अनेक विषय मात्र बंगाली संस्कृतीचे आणले, त्याचे हिंदी रुपडे त्यांनी उत्तम केले. काही चित्रपट बंगाली साहित्यकृतीवर आधारित केले. येथे आल्यावर त्यांनी बॉम्बे टॉकिजसाठी ‘मां’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि आपल्या “बिमल रॉय प्राॅडक्सन्स” चा पहिला हिंदी चित्रपट निर्माण केला, ‘दो बिघा जमीन ‘

त्या काळात देशाच्या विविध भागातून मुंबईत आलेल्या चित्रपट लेखक आणि दिग्दर्शकांनी आपल्या राज्याची संस्कृती, जीवन, गोष्टी, संगीत, लोककला यांनाही शक्य त्या प्रमाणात हिंदी चित्रपटात आणले. आपली मूळ ओळख आणि मूल्ये ते विसरले नाहीत. बंगालवरुन हिंदी चित्रपटसृष्टीत येताना बिमल रॉय कोलकत्ता अथवा बंगालच्या मातीतील कथा हिंदी चित्रपटात आणणार हे स्वाभाविक होतेच. ‘दो बिघा जमीन ‘मध्ये त्यांनी बंगालच्या एका खेड्यात राहिलेला कर्जबाजारी शेतकरी (बलराज साहनी) सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कोलकत्ता शहरात येतो आणि रिक्षा चालवतो याचे भेदक वास्तव दर्शन मांडले. ही रिक्षा त्या काळातील माणूस खूप कष्टाने खेचून चालवतो आणि एक एक पैसा मिळवतो. यातील त्याचा जीवन संघर्ष आणि अनेक प्रकारचे बरे वाईट अनुभव म्हणजे हा चित्रपट आहे. हा चित्रपट आजही पाहताना आपल्याला अस्वस्थ करतो अशी ताकत त्यात आहे. काळ कितीही पुढे सरकला तरी चित्रपटाचा प्रभाव तसाच कायम राहणे हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे वैशिष्ट्य आहे.
या चित्रपटात अत्यंत सरळ, साधेपणाने आणि वास्तवाला धरुन पटकथेचे रुपेरी सादरीकरण झाल्याने टीकाकारांसह सर्वांनीच या चित्रपटाचे त्या काळात अफाट कौतुक केले. हा चित्रपट ख्यातनाम दिग्दर्शक डी सिका यांच्या ‘बायसिकल थीफ ‘पासून प्रेरणा घेऊन बनवला होता, पण मूळ थीम कायम ठेवून त्याला ‘भारतीय चित्रपटाचे रुपडं’ अतिशय उत्तमरितीने दिले होते. तेच तर महत्वाचे असते. या चित्रपटाचे कान्स, कार्लोव्ही व्हेरी अशा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार प्राप्त झाले. सामाजिक बांधिलकीचे विषय अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे मांडणारे दिग्दर्शक अशी या चित्रपटाने बिमल रॉय यांची प्रतिमा तयार झाली. बिमल रॉय यांनी त्यानंतर ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘परख’, ‘बंदिनी’ आदी चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरु ठेवली.

चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे.. बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना बिमल रॉय यांनी त्यांच्या ‘बंदिनी’ या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले ‘मोरा गोरा अंग लै ले..’ हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही लोकप्रिय आहे आणि गुलजार यांची संवेदनशील गीतकार म्हणून वाटचाल सुरु झाली. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्या काळातील चित्रपट दिग्दर्शकांचे ते एक विशेष वैशिष्ट्य आहे. यासाठीही जुने चित्रपट आवर्जून पहावेत.
‘दो बिघा जमीन’मध्ये अतिशय वास्तववादी भूमिका साकारलेले अभिनेते बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. आणि ते त्यांना अभिनय क्षेत्रात उपयुक्त ठरले. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं.बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यांनी आत्मपरीक्षण केले.

त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. खूप मेहनत घेतली. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. ही आठवण आवर्जून सांगितली जाते. त्या काळातील चित्रपटसृष्टीतील किस्से, गोष्टी, आठवणी या चित्रपट या माध्यम व व्यवसाय यांच्याशी बांधिलकी असणाऱ्या असत.
बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे ‘देवदास’ ( १९५६) हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. शरदचंद्र चटर्जी यांच्या ‘देवदास ‘ या बंगाली साहित्यकृतीवर आधारित हा चित्रपट आहे. आजही याच ‘देवदास’ चित्रपटाचे महत्व अधोरेखित केले जाते. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘देवदास’ (२००२) म्हणजे केवळ लखलखाट लखलखाट लखलखाट होता असेच मानले जाते.
================================
हे देखील वाचा: Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण
=================================
बिमल रॉय यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली, हिंदी चित्रपट बदलला, प्रेक्षकांच्या पिढ्या ओलांडूनही त्यांच्या चित्रपटातील आशय, सामाजिक बांधिलकी, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. सत्तरच्या दशकात मुंबई दूरदर्शनवर एका महिन्यात प्रत्येक रविवारी असे एकूण चार रविवार त्यांचे चित्रपट प्रक्षेपित झाले तेव्हा माझ्या पिढीला त्यांच्या चित्रपटाचा आस्वाद घेता आला आणि ते आवश्यकही होतेच. त्यांच्या चित्रपटातील कथाआशय, त्याचे रुपेरी सादरीकरण, अभिनय आणि संगीत कायमच वैशिष्ट्यपूर्ण असेच राहिले आहे.
चित्रपट माध्यम व व्यवसाय यातून आपण समाजाला काही देणे लागतो अशा जणू भावनेने त्यांनी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्या पिढीचे हे वैशिष्ट्य होते. आशयघन चित्रपटांच्या माध्यमातून आपले अगदी वेगळे स्थान निर्माण केलेल्या दिग्दर्शक बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले. व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘दो बिघा जमीन’ चा खास खेळ आयोजित करण्यात आल्याच्या निमित्ताने दिग्दर्शक बिमल रॉय यांच्यावर हा ‘फोकस’.