करिश्मा कपूरच्या पहिल्या चित्रपटाचा नायक हरीश आठवतो कां?
यशस्वी आयुष्याची घोडदौड चालत असताना अचानक ब्रेक लागतो आणि आयुष्याला वेगळ्याच दिशेला वळायला लागते. अकल्पित असे जीवन वाट्याला येतं आणि मग कळत नाही नेमकं चुकलं कुठे? अभिनयाची कारकीर्द यशोशिखरावर असतानाच एका अभिनेत्याला अनपेक्षित पणे एका आजाराला सामोरे जावं लागलं आणि त्याचं करियरच संपुष्टात आलं. यशाचा मोठा आलेख उंचावायला निघालेला हा कलाकार आज अचानकपणे काळाच्या उदरात लुप्त होऊन जातो. कोण होता हा कलाकार? नेमकं काय घडलं त्याच्या आयुष्यात? १९९१ साली कपूर खानदानातील पहिली मुलगी जिने सिनेमाच्या क्षेत्रात नुसता पाऊल टाकलं नाही तर मोठी यशस्वी इनिंगच खेळली त्या करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor)पहिला चित्रपट आठवतो का? आणि त्यातील तिचा नायक? करिष्मा कपूर (Karisma Kapoor) हिने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून हिंदी सिनेमाच्या पडद्यावर पहिले पाऊल ठेवले. तिचा नायक होता दक्षिणेकडील अभिनेता हरीश. या हरीशचीच ही स्टोरी आहे. आज या अभिनेत्याची आठवण किती जणांना आहे ठाऊक नाही. पण नव्वदच्या दशकावर प्रेम करणाऱ्या रसिकांना हरीश नक्कीच आठवत असणार.
१ ऑगस्ट १९७५ या दिवशी हरीश या अभिनेत्याचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी १९७९ साली त्याने बालकलाकार म्हणून एका तेलगू चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्याच्या आईची भूमिका अभिनेत्री श्रीदेवीने केली होती. त्याच्या या पहिल्याच भूमिकेला रसिकांची मोठी पसंती मिळाली. मग तिथून तो तेलगू, तमिळ चित्रपटातून कायम चमकू लागला. १९८३ साली ‘आंध्रकेसरी’ या सिनेमातील भूमिकेसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अभिनेते एनटी रामाराव यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक मिळाले. हरीशच्या अभिनयाचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारात होते त्याचप्रमाणे तिची लोकप्रियता सर्वत्र वाढत होती. आता तो तमिळ,मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटात देखील चमकू लागला. हिंदी सिनेमा त्याने पहिल्यांदा बालकलाकार म्हणून १९८३ साली ‘जीवनधारा’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात रेखा, अमोल पालेकर आणि राज बब्बर यांच्या प्रमुख भूमिका यानंतर 1987 साली आलेल्या ‘संसार’ या चित्रपटात त्याची भूमिका होती.
वयाच्या १४ व्या वर्षी अभिनेता कमल हसन सोबत त्याने ‘डेजी’ या चित्रपटात काम केले आणि हे काम सर्वत्र लोकप्रिय ठरले. वयाच्या पंधराव्या वर्षी हरीश ने रजनीकांत, कमल हसन, धर्मेंद्र, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत पडद्यावर काम केले होते. १९९० साली इ व्ही व्ही सत्यनारायण यांनी हरीशला घेऊन पहिल्यांदा एका प्रेमपटात चमकवले.चित्रपट होता ‘प्रेम कैदी’ त्यावेळी तो अवघा पंधरा वर्षाचा होता. कोवळ्या वयातील ही प्रेम कथा प्रचंड लोकप्रिय ठरली. यात त्याची नायिका मालाश्री होती. साऊथ कडे सुपर हिट ठरलेल्या या कथेला निर्मात्यांनी हिंदीमध्ये आणायचे ठरवले. यासाठी अभिनेत्रीचा शोध घेऊ लागले. हरीशच्या वयाला आणि उंचीला साजेशी अभिनेत्री च्या शोधात होते. त्याचवेळी कपूर खानदानातील रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी करिष्मा कपूर हिंदी सिनेमांमध्ये काम करण्यासाठी उत्सुक होती. साहजिकच निर्माते कपूर कुटुंबाकडे अप्रोच झाले आणि अशा प्रकारे हरीश आणि करिष्मा कपूर यांचा पहिला चित्रपट प्रेम कैदी १९९१ साली प्रदर्शित झाला आणि सर्वत्र लोकप्रिय ठरला. या सिनेमाच्या वेळी हरीश १५ वर्षाचा होता तर करिश्मा १६ वर्षाची होती! यातील हरीश सर्वांना आवडला. एक प्रॉमिसिंग अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ आले. यानंतर तो बॉलिवूडमध्ये चांगला रमला. १९९२ साली नाना पाटेकर सोबत त्याने ‘तिरंगा’ हा चित्रपट केला. त्यानंतर सुपरहिट गोविंदा सोबत हरीशची चांगली जोडी जमली. हरीश ने कधीही आपल्या stardam चा विचार केला नाही. सह अभिनेता, सहनायकाच्या भूमिका देखील तो सहजपणे स्वीकारू लागला. आंटी नंबर वन, कुली नंबर वन , बीवी नंबर वन या सर्व नंबर वन च्या सिनेमांमध्ये गोविंदा नंबर वन होता आणि नंबर टू हरीश होता.
त्याची कारकीर्द व्यवस्थित चालू होती.परंतु अचानक त्याच्या कारकीर्दीला ब्रेक लागला. त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्याच्या स्पायनल कॉर्ड मध्ये दुखापत झाली होती आणि ही दुखापत नंतर गंभीर झाली. तिचे स्वरूप इतके गंभीर होते की बेड वरून उठणे देखील त्याला मुश्किल होऊ लागले. डॉक्टरांनी त्याला काम करायला मनाई घातली. स्पायनल कोर्ट मधील एल फिफ्टीन आणि एल 12 या मज्जा रज्जू ला मोठी इजा झाली होती. लहानपणापासून चित्रपटात काम करत असल्यामुळे नेमकी ही दुखापत कधी झाली हे त्याला देखील आठवत नव्हतं. या आजारातून जेव्हा तो थोडाफार बरा झाला त्यावेळेला त्याचे त्याचा देह ओळखू येणार नाही इतका लठ्ठ झाला होता. या रूपामध्ये त्याला चित्रपटात पुन्हा भूमिका मिळणे शक्यच नव्हतं.
======
हे देखील वाचा : अशोक कुमारच चोवीस तासाच्या आत झालेलं झटपट लग्न!
======
आज हरीश आपल्या कुटुंबीयांसोबत मुंबईमध्येच आहे. २००५ साली त्याने संगीता चूग सोबत लग्न केले त्याला दोन मुले आहेत. विशेष म्हणजे संकटाच्या या काळात सारे कुटुंब एकत्र आहे. सध्या हरीश एका स्क्रिप्ट वर काम करत असून लवकरच तो एक चित्रपट दिग्दर्शित करणार आहे असे त्याने एका चॅनलला सांगितले. आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. त्या मुलाखतीत हरीश म्हणाला ,”कदाचित सुरुवातीला मी आयुष्य खूप फास्ट जगायला सुरुवात केल्यामुळे हे स्लो आयुष्य माझ्या वाट्याला आलं आहे!” त्याच्या बोलण्यातील विषाद मनाला स्पर्श करून जातो. अभिनेता हरीश आजच्या पिढीला ठाऊक असण्याची सुतराम शक्यता नाही. तरी आज पन्नाशीला पोहोचलेल्या पिढीला कदाचित त्याचे सिनेमे आठवत असतील!