डॉक्टर अभिनेत्री!
सध्या सोनी मराठी वाहिनीवर ‘श्रीमंतांघरची सून’ ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे. या मालिकेत मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री रूपल नंद. ती फिजिओथेरपिस्ट आहे, हा तिच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सांगता येईल.
अभिनय क्षेत्रात येताना तिने आधी काही बालनाट्यात कामे केली होती. पण तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली ती म्हणजे महाराष्ट्र टाईम्सची ‘श्रावण क्वीन‘ ही सौंदर्य स्पर्धा. त्यात ती टॉप पाच स्पर्धकात आली होती. तेथील तिने केलेले सादरीकरण पाहून सतीश राजवाडे यांनी तिला ‘मुंबई
पुणे मुंबई‘ मधील भूमिकेसाठी विचारले. तिने ‘मुंबई पुणे मुंबई’ च्या सिक्वल मध्ये काम केलं.
त्यानंतर ऑडिशन देता देता स्टार प्रवाह वरील ‘गोठ‘ मालिकेसाठी तिची मुख्य भूमिकेकरिता निवड झाली. त्यात तिने राधाची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेने तिला एक वेगळी ओळख मिळाली. या मालिकेचे जवळजवळ पाचशे ऐंशी भाग सादर झाले होते.
झी युवा वरील ‘फुलपाखरू‘ मध्ये तिने नकारात्मक छटा असणारी भूमिका केली होती. यशोमान आपटे या अभिनेत्याबरोबर तिची भूमिका असणारी ही पहिली मालिका. मग सोनी मराठीवरील ‘आनंदी हे जग सारे‘ मध्ये यशोमान आपटे आणि रुपल नंद हे मुख्य भूमिकेत होते.
ही मालिका संपत आली तोच सोनी मराठीनेच ‘श्रीमंताघरची सून ‘ साठी रुपलला भूमिका द्यायचे ठरवले. ‘आनंदी हे जग सारे’ मधील यशोमान आणि रुपल ही जोडी याही मालिकेत असावी,असे ठरले.
रुपल म्हणते ,” श्रीमंताघरची सून मधील माझी भूमिका ही अर्थातच वेगळी आहे. यशोमान बरोबर आधीच्या मालिकेत भूमिका केलेली असल्याने कलाकारांचे ट्युनिंग चांगले जमते.”
रुपल स्वतः फिजिओथेरपिस्ट असल्याने त्या संदर्भात ती सध्या ऑनलाईन मार्गदर्शन करत असते.
हे ही वाचा : कस्तुरबा ते आईआज्जी