‘दोस्ती’ची साठी, गाणी आजही लोकप्रिय!
माणसाच्या आयुष्यातील महत्वाच्या नात्यापैकी एक म्हणजे, अतिशय चांगला विश्वासाचा मित्र! आयुष्यातील चढउतारातील त्याची साथ मानसोपचारतज्ज्ञाची अजिबात गरज भासू न देणारी. मैत्री/ दोस्ती/ फ्रेन्डशीप/ याराना आपल्या देशातील फिल्मवाल्यांचा आवडता रिश्ता. चित्रपटाच्या नावातच “दोस्ताना”, थीमनुसार मैत्री, गाण्यातील मैत्री (शोलेतील ‘ये दोस्ती हम नहीं’ सर्वकालीन लोकप्रिय) हे रुपेरी पडद्यावरचे जग, चित्रपटसृष्टीतील मैत्री ही एक वेगळीच स्टोरी. (Dosti)
दोस्त, दोस्ती, दोस्ताना, दोस्त दुश्मन, दो यार, याराना, यार मेरा, यारों का यार, दुश्मन दुनिया का अशी चित्रपटाच्या नावातून मैत्री येत असतेच, कधी प्रेम त्रिकोणाच्या गोष्टीत मैत्री ( संगम, सागर, साजन), तर कधी थीमनुसार मैत्री “नमक हराम” ( राजेश खन्ना-अमिताभ बच्चन) “आदमी सडक का” ( शत्रुघ्न सिन्हा-विक्रम) “सौदागर” (दिलीपकुमार व राज कपूर) अशी अनेक उदाहरणे. त्यात माईलस्टोन चित्रपट राजश्री प्राॅडक्सन्स निर्मित आणि सत्येन बोस दिग्दर्शित “दोस्ती”(Dosti).
मुंबईत रिलीज ६ नोव्हेंबर १९६४. म्हणजेच या चित्रपटाला साठ वर्ष पूर्ण झालीसुद्धा! या काळात या चित्रपटाने सिंगल स्क्रीन थिएटर्स ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा बराच मोठा प्रवासही केलाय. राजश्री प्राॅडक्सन्सच्या चित्रपटाची आपली एक स्वच्छ, मनोरंजक चित्रपट अशी संस्कृती. सहकुटुंब सहपरिवार चित्रपटगृहात जाऊन पारंपरिक, कौटुंबिक चित्रपटाचा आनंद घ्यावा आणि त्या चित्रपटातील नातेसंबंध, विश्वास, त्याग, हसतं खेळते पण यासारख्या गुणांनी आपण जगण्याचा प्रयत्न करावा. “दोस्ती”(Dosti) ची वैशिष्ट्ये अनेक. त्यातील एक म्हणजे गीत-संगीत.
राही मनवा दुख की चिंता, मेरा तो जो भी कदम है, चाहूंगा मै तुझे सांज सवेरे, कोई जब राह न पाये, जानेवालो जरा मुडकर, गुडिया हमसे रुठी रहोगी अशा लोकप्रिय गीत संगीताचा समावेश. त्या काळात घरातील ग्रामोफोन, रेडिओ ( या गोष्टी तोपर्यंत घरोघरी आलेल्या नव्हत्या. चक्क शेजारच्या घरातील रेडिओवरचीही गाणी कानावर पडत आणि त्याचाही विशेष आनंद होई.), इराणी हाॅटेलमधील जुक्स बाॅक्स ( त्यात चार आण्याचे नाणे टाकून आपल्या आवडते गाणे ऐकायला मिळे. सत्तरच्या दशकात त्याचे आठ आणे झाले), सणासुदीला गल्लीत वा गावात लागणारा लाऊडस्पीकर, लहान मोठे वाद्यवृंद हीच फक्त गाणी “ऐकण्या” साठीची माध्यमे होती. गाणे “पहावेसे” वाटे तेव्हा फक्त आणि फक्त चित्रपटगृहात जावे लागे. (आणि आज नवीन असलेला चित्रपट काही वर्षांनी मॅटीनी शो व रिपीट रनला कधी येतोय आणि त्या आवडत्या गाण्यांसाठी पाहतोय असे व्हायचे. याच प्रेमाने माझ्या पिढीने अनेक चित्रपट पाहिले. ते दिवसच वेगळे होते. आठवावेत असेच आहेत. ) (Dosti)
ताराचंद बडजात्या निर्मित आणि सत्येन बोस दिग्दर्शित या चित्रपटातील गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली होती. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं सुमधुर संगीत त्या गाण्यांना लाभलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कारकीर्दीचा हा सुरुवातीचा काळ. बाबुभाई मिस्री दिग्दर्शित “पारसमणी”( १९६३) पासून त्यांची संगीतकार जोडी म्हणून वाटचाल सुरु झालेली. गुणवत्ता व सातत्य अफाट. म्हणूनच दीर्घकाळ ते चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यात यशस्वी ठरले. (Dosti)
अनेकांना जुने चित्रपट पोस्टरपासून आठवतात. “दोस्ती” (Dosti) देखिल तसाच. पोस्टर ही चित्रपटाची महत्वाची ओळख. “दोस्ती” चे मध्यवर्ती कथासूत्र असे, अपघातात पाय गमावलेला रामू ( सुशीलकुमार) आणि बालपणीच दृष्टी गमावलेला मोहन ( सुधीरकुमार) यांच्या अनोख्या दोस्तीची कहाणी या चित्रपटात दाखवली आहे. अनेक छोट्या छोट्या भावनिक प्रसंगातून हा चित्रपट आकार घेतो. तोपर्यंत हिंदीत रंगीत चित्रपटांचे प्रमाण हळूहळू वाढत होते. ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्णधवल चित्रपटांचेच युग होते. “दोस्ती”(Dosti) देखिल ब्लॅक अँड व्हाईट. या चित्रपटाला फिल्मफेअरचे- उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट कथा(बाणभट), उत्कृष्ट संवाद लेखन (गोविंद मुनीस), उत्कृष्ट संगीतकार(लक्ष्मीकांत प्यारेलाल), उत्कृष्ट पार्श्वगायक (मंहमद रफी), उत्कृष्ट गीतकार(मजरूह सुलतानपूरी) असे सहा पुरस्कार मिळाले.
राज कपूर अभिनित व दिग्दर्शित “संगम” ( १९६४) साठी शंकर जयकिशन यांच्याऐवजी “दोस्ती” (Dosti) साठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाल्यावरुनचे वादळ रसिकांच्या तेव्हाच्या पिढीत फार मोठ्या चर्चेचे ठरले. चित्रपटात सुधीरकुमार सावंत, सुशीलकुमार शर्मा, संजय खान, लीला मिश्रा, नाना पळशीकर, लीला चिटणीस, अभी भट्टाचार्य, बेबी फरीदा, उमा आणि जोनी व्हिस्की यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातून संजय खान आणि मराठी अभिनेत्री उमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. “गुडिया हमसे रुठी रहोगी” हे गाणं त्यांनी पडद्यावर साकारलयं. (Dosti)
मैत्रीवरचा अतिशय आदर्श चित्रपट म्हणून कायमच या चित्रपटाचा उल्लेख होतो आणि लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतील हा चित्रपट रसिकांच्या किमान चार पिढ्या ओलांडूनही आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. अनेक चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची अनेक गाण्यांचा रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमाला ते यू ट्यूब चॅनेल असा यशस्वी प्रवास सुरु आहे.
==============
हे देखील वाचा : ‘रोटी कपडा और मकान’ला ५० वर्ष पूर्ण!
==============
जुन्या पिढीतील चित्रपट रसिक ती गाणी आठवली तरी फ्लॅशबॅकमध्ये जातात. “दोस्ती” (Dosti)चित्रपटाची ओळख म्हणा, आठवण म्हणा, ती त्याची गोष्ट, त्यातील अभिनय म्हणा वा त्याचे गीत संगीत म्हणा! काळ पुढे सरकत असतो, पण “दोस्ती” सारख्या कलाकृती त्यासह पुढे सरकत राहतात. त्या सहजी जुन्या होत नाहीत…