ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘या’ चित्रपटात जितेंद्र व मुमताजचे डबल रोल
मिडियात असल्यानेच ‘ध्यानीमनी’ नसतानाच कधी, कोणती, चांगल्या संधीपर्यंत चालून जाता येईल काहीच सांगता येत नाही हो…संसारात छान रमलेल्या मुमताजने अनपेक्षितपणे चित्रपटसृष्टीत कमबॅक केले हे आठवावं असा तो पहलाज निहलानी निर्मित व शिबू मिश्रा दिग्दर्शित ‘आंधीया’ (१९९०) चित्रपट अजिबात नव्हता. या चित्रपटाच्या घोषणेच्या जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीतील मुमताजला पाहूनच वाटलं, ‘नकट्या नाकाचा तो तडका’ एव्हाना लक्षवेधक ठरत नसताना कशाला ती पुन्हा पडद्यावर येतेय ? पिक्चर पाहिल्यावर नि तो फ्लाॅप झाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब झालेच. (Double roll)
पण याच पिक्चरच्या निमित्ताने पहलाज निहलानीच्या कृपेने मुमताजच्या स्वतंत्र मुलाखतीचा छान योग मात्र आला. कालची मुमताज मी आजच्या मुमताजकडून जाणून घेताना एक भारी धक्का बसला. मुमताज सांगत होती, मी ज्युनियर डान्सर, स्टंटपटाची नायिका, मेन स्ट्रीममधील चित्रपटातील सहनायिका अशी वाटचाल करीत करीत नायिका म्हणून पुढचं पाऊल टाकत असतानाच शशी कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र यांनी सुरुवातीला मला नायिका म्हणून स्वीकारण्यास चक्क नकार दिला….(Double roll)
याबाबत तिने ‘बूंद जो बन गये मोती’ (१९६७) चे उदाहरण दिले. जितेंद्रचा हा सुरुवातीच्या काळातील हा एक चित्रपट. त्यात राजश्री नायिका होती आणि मुमताजला फक्त एक नृत्य होते. राजश्रीला तेव्हा अन्य निर्मात्यांच्या चित्रपटातून भूमिका साकारण्यास तारखा हव्या होत्या आणि म्हणून तिने आपल्या वडिलांना म्हणजे चित्रपती व्ही. शांताराम यांना तशी कल्पना देताच त्यांनी राजश्रीलाच आपल्या चित्रपटातून काढले आणि मुमताजला नायिका केले. तिने त्यांच्या स्त्री, सेहरा या चित्रपटातून छोट्या भूमिका साकारल्या होत्या आणि आता तिला बढती मिळाली. नेमकी तीच जितेंद्रला खटकली आणि त्याने या निवडीबद्दल कुरकूर करताच व्ही. शांताराम यांनी जितेंद्रलाच ताकीद दिली, मुमताजच या चित्रपटाची नायिका असेल आणि ती नको असेल तर तुझ्या जागी दुसरं कोणी हीरो घेईन. जितेंद्रपुढे गप्प राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.. मुमताजने एकदमच भारी गोष्टी सांगितली.(Double roll)
जितेंद्र व मुमताज जोडीच्या ‘रुप तेरा मस्ताना’ ( मुंबईत रिलीज १७ नोव्हेंबर १९७२. चक्क एकावन्न वर्ष झाली देखील..त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत, त्यामुळे हा चित्रपट काही शहरात २४ नोव्हेंबर ७३ आणि त्यानंतर प्रदर्शित होत गेला) यावर फोकस टाकताना सर्वप्रथम मुमताजशी झालेली भेट आणि त्यात तिने सांगितलेली रंजक गोष्ट आठवली. जितेंद्र व मुमताजने ‘बूंद जो..’नंतर ‘जिगरी दोस्त’ ( १९६९), मां और ममता , खिलौना, हिम्मत ( तीनही १९७०), कठपुतली, चाहत, एक नारी एक ब्रह्मचारी ( तीनही १९७१)इत्यादी चित्रपटातून एकत्र भूमिका साकारल्या. ‘नागिन’ ( १९७६)ही ते दोघेही होते. पण भूमिका भिन्न होत्या.
मुमताजने त्यानंतर संसाराला प्राधान्य देत चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. सिनेमाच्या कलरफुल दुनियेपासून तिला लांब राहणे बरेच जमले होते. ती ‘आंधिया’च्या वेळेसही यायला नको होती. सगळ्याच अभिनेत्री वैजयंतीमाला अथवा राखी नसतात. एकदा का तोंडाला रंग लावायचा नाही आणि कितीही ऑफर आली तरी कॅमेर्यासमोर यायचेच नाही या हक्क आणि हट्टाला घट्ट चिकटून बसायला…खरं तर तेच बरोबर आहे. एक छान इनिंग खेळलो. बस्स झाले. एक वेगळे आयुष्य जगूयात. हे स्वीकारण्यास मन तयार होत नाही.
‘रुप तेरा मस्ताना’चे विशेष म्हणजे, नायक व नायिका. अर्थात जितेंद्र व मुमताज या दोघांच्याही दुहेरी भूमिका. या चित्रपटाचे निर्माते मोहन अली, एम. एम. मल्होत्रा आणि बलदेव पुष्कर्णा. दिग्दर्शक खालिद अख्तर. कथा मोहन कौल, पटकथाक के. बी. लाल आणि रवि कपूर. संवाद एहसान रिझवी. गीते आनंद बक्षी व असद भोपाली. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल अशी श्रेयनामावली. मध्यवर्ती सूत्र असे, महत्वाकांक्षी क्रूरकर्मा अजित सिंग ( प्राण) राजकुमारी उषा ( मुमताज) हिचा खून करुन तिच्या जागी अगदी तिच्यासारख्याच दिसणार्या किरणला ( मुमताज, दुहेरी भूमिकेत) पाठवतो. यासाठी ती अजिबात तयार नसते. (Double roll)
पण तिच्यामार्फत राजकुमारची ( जितेंद्र) मालमत्ता त्याला हडप करायची असते. तो किरणला धमकावत किरणला जबरदस्ती राजकुमारी करतो. राजकुमारच्या सहवासात ही ‘नकली’ राजकुमारी त्याच्या प्रेमात पडते आणि राजकुमारसारखाच दिसणारा राजा साब ( पुन्हा जितेंद्रच. डबल रोल) अवतरतो आणि नवीन नाट्य निर्माण होते. पिक्चरच्या शेवटी सत्याचा विजय आणि खलनायकचा निप्पात ठरलेलाच. त्या काळात ‘पिक्चरचा शेवट गोड तर सगळेच गोड ‘ असा हुकमी फाॅर्मुला होता.
जितेंद्र देखणा, फिट्ट पॅन्टीत पडद्यावर वावरणारा आणि नृत्यात जम्पिंग जॅक म्हणून ओळखला जाणारा. हे सगळेच तो करतो. मुमताज देखणेपण, अभिनय व नृत्य या केमिस्ट्रीला मेहनतीची जोड देत मेन स्ट्रीममधील चित्रपटातील हीरोंची नायिका झालेली. म्हणून तर प्रत्येक चित्रपटात चमक दाखवण्याचा तिचा प्रयत्न. राज खोसला दिग्दर्शित ‘दो रास्ते’ ( १९६९) च्या सुपरहिट यशाने तिची आता चित्रपट रसिक, चित्रपटसृष्टी आणि मिडिया दखल घेऊ लागलेला. राजेश खन्ना याच काळात सुपर स्टार आणि मुमताज त्याची फेवरेट नायिका, त्यामुळे तीही टाॅपवर. जोडी जमलीही छान. शोभलीही छान. ‘रुप तेरा… ‘मधील प्राण विशेषच. (Double roll)
कपटी खलनायक म्हणून त्याचा हा शेवटचा चित्रपट. मनोजकुमार दिग्दर्शित व अभिनित ‘उपकार ‘ ( १९६७) पासून त्याने चरित्र भूमिकेत रस घेतलेला. मनोजकुमारने त्याचा रुपेरी बदमाशपणा मागे ठेवून त्याला सभ्यतेचे रुपडं दिले. तरी अगोदर साईन केलेल्या व्हीलनच्या भूमिकांचे चित्रपट हळूहळू कमी होत गेले आणि ‘रुप तेरा मस्ताना’नंतर तो पुरता सभ्य भूमिकेत शिरला. याशिवाय लीला मिश्रा, जानकीदास, व्ही. गोपाल, राजन कपूर, बिरबल, मधुमती, केदारनाथ सैगल इत्यादींच्या प्रमुख भूमिका. पिक्चरमधील तीन गाणी लोकप्रिय झाली. दिल की बाते ( पार्श्वगायक लता मंगेशकर व मोहम्मद रफी), हसीन दिलरुबा ( मोहम्मद रफी), बडे बेवफाये है यह हुस्नवाले ( मोहम्मद रफी).
इतकं सगळं असूनही पिक्चर फ्लाॅप झाला. पब्लिकला हा क्राईम रोमान्स अजिबात आवडला नाही..गोष्टीचा प्लाॅट चांगला असला तरी मांडणीत फसला. भव्य दिव्य सेटस ( राजकुमार राजकुमारीचा महल देखणा महागडाच असणार) आणि जितेंद्र व मुमताजचे आकर्षक ड्रेसेस पाहण्यास रसिकांना फारसा रस वाटला नाही. गाणी लोकप्रिय असल्यानेच मॅटीनी शो, रिपीट रनला पिक्चरला गर्दी झाली. मी स्वतः या गाण्यांसाठीच ताडदेवच्या डायना थिएटरमध्ये रिपीट रनला पाहिला.(Double roll)
============
हे देखील वाचा : ‘हीरा’ ठरला डाकूपटाच्या वाटचालीत सुपर हिट
============
जितेंद्र व मुमताजने रुपेरी पडद्यावर अनेक गाणी साकारलीत. त्यांची गाण्यातील छान केमिस्ट्री पाह्यची तर मान जाईये मान जाईये ( हिम्मत), रुबी हो रुबी ( चाहत), रात सुहानी जाग रही है ( जिगरी दोस्त), या गाण्यात. ‘रुप तेरा मस्ताना ‘ म्हटलं वा आठवलं तरी शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना’ ( १९६९) मधलं मोहक मादक आकर्षक रुपातील शर्मिला टागोर व राजेश खन्ना यांचे ‘ वन टाइम फिरता कॅमेरा टेक’मध्ये शूटिंग झालेले रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना.. आठवणारच आणि या गाण्याच्या सुपरहिट मुखड्यावरुन त्याच नावाचा चित्रपटही आठवायला हवाच. होय ना? (Double roll)
आणखीन एक महत्वाचे, नायक व नायिका या दोघांचीही दुहेरी भूमिका असलेला आणखीन एक चित्रपट ऐंशीच्या दशकात आला. तो होता संकलक बी. एस. ग्लाड दिग्दर्शित ‘हम दोनो’ (१९८५). त्यात राजेश खन्ना व हेमा मालिनी यांचा डबल रोल आहे. देव आनंदचा अमरजीत दिग्दर्शित याच नावाच्या चित्रपटाशी याचा फक्त नामसाम्यापुरता संबंध. मसालेदार मनोरंजक चित्रपटांत अशा अनेक गोष्टी होत असतात. काही जमतातही.