मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
इगो प्रॉब्लेममुळे ‘या’ सिनेमाच्या टायटल्स मधून कलावंताची नावेच काढून टाकली!
कधीकधी पराकोटीचा अहंकार हा मैत्रीमध्ये बाधा आणतो. असाच काहीसा प्रकार अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या बाबत झाला होता. हा किस्सा ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीचा आहे. दिग्दर्शक राज एन सिप्पी एक चित्रपट बनवत होते ‘अंदर बाहर’. या चित्रपटात अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र येत होते. हा सिनेमा १९८२ साली आलेल्या हॉलीवूडच्या ‘४८ अवर्स’चा रिमेक होता. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होत आले. आता प्रमोशनची आणि रिलीजची वेळ आली. या चित्रपटात जॅकी श्रॉफला नायिका(मून मून सेन) असल्यामुळे सहाजिकच तो सिनेमाचा हिरो झाला आणि त्याचे नाव सुरुवातीला अग्रभागी आले. ते पाहून अनिल कपूरचे पित्त खवळले. तो म्हणाला,” हे कसे शक्य आहे? मी जॅकी श्रॉफ पेक्षा सीनियर आहे. माझा पहिला चित्रपट १९७९ साली आला होता. तर जॅकी श्रॉफ आत्ता एक वर्षांपूर्वी ‘हिरो’ या चित्रपटातून पडद्यावर आला आहे. मी सीनियर आहे. माझे नाव आधी पाहिजे.”(Actors Ego Problems) दिग्दर्शक राज एन सिप्पी यांनी अनिल कपूरला सांगितले,” ते बरोबर जरी असले तरी या चित्रपटात त्याला नायिका आहे त्याची भूमिका तुमच्यापेक्षा मोठी आहे नायकाची आहे म्हणून त्याचे नाव आपण सुरुवातीला घेत आहोत!”
पण अनिल कपूरचे समाधान झाले नाही. त्यांच्यातील वाद वाढत राहिला. राज सिप्पी यांनी हे प्रकरण सुभाष घई यांच्या कोर्टात नेले. सुभाष घई यांनी आपला कौल जॅकी श्रॉफ च्या बाजूने तिला. पण यावर देखील अनिल कपूरचे अजिबात समाधान झाले नाही(Actors Ego Problems). या दोघांच्या भांडणामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे पुढे ढकलले जात होते. पण याच वेळी अनिल कपूरचे दोन चित्रपट पडद्यावर आले आणि एक सिनेमा फ्लॉप झाला तर दुसरा चित्रपट हिट झाला पण त्याचे क्रेडिट दिलीप कुमारला मिळाले. हे चित्रपट होते ‘लैला’ आणि ‘मशाल’. (लैला हा चित्रपट अनिल कपूरचा सोलो हिरो असलेला पहिला चित्रपट होता. त्याच्या खूप अपेक्षा होत्या.सावन कुमार दिग्दर्शित या सिनेमाला उषा खन्ना चे संगीत होते. ‘साथ जियेंगे साथ मरेंगे हम तुम दोनो लैला’ हे गीत यात होतं. पूनम धिल्लन सारखी नायिका होती.पण तरी पिक्चर पडला!) त्यामुळे अनिल कपूरने थोडी पडती बाजू घेऊन एक पर्याय राज सिप्पी यांच्याकडे ठेवला. दोन्ही कलाकारांची नावे एकाच ओळीमध्ये लिहायची. कुणाचे नाव खाली नाही कुणाचे नाव वर नाही.
यावर एक मत झाल्यानंतर चित्रपटाचे प्रमोशन सुरू झाले. डिस्ट्रीब्यूटरची मीटिंग झाली. परंतु आता डिस्ट्रीब्यूटरने जॅकी श्रॉफ यांचे फोटो आणि त्याचे नाव ठळकपणे पोस्टरवर आणि लॉबी कार्डवर दिसेल असे छापले. अनिल कपूर कुठेतरी कोपऱ्यात दिसत होता. आता पुन्हा अनिल कपूर आणि राज सिप्पी दोघेही नाराज झाले(Actors Ego Problems). ज्यावेळी सिनेमा प्रदर्शित करण्याची वेळ आली त्यावेळेला राज सिप्पी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या सिनेमातील सुरुवातीचे अभिनेत्यांचे क्रेडिट टायटल्स काढून टाकले! या सिनेमांमध्ये एकाही कलाकाराचे नाव सुरुवातीला पडद्यावर दिसत नाही. सिनेमा सुरु झाला की, क्रू मेंबर्सची नावे दिसतात. अशा पद्धतीने कदाचित हा भारतातील एकमेव आणि पहिला सिनेमा असावा; ज्यामध्ये कलाकारांची नावेच चित्रपटात दाखवली नाही(Actors Ego Problems). ७ सप्टेंबर १९८४ रोजी ‘अंदर बाहर’ प्रदर्शित झाला.
=========
हे देखील वाचा : मराठा मंदिर थिएटर्सच्या बाल आठवणी
=========
चित्रपट हिट झाला त्याचा फायदा दोन्ही अभिनेत्यांना झाला. पुढे या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले.अंदर बाहर (१९८४), युद्ध (१९८५), कर्मा (१९८६) राम लखन (१९८८) काला बाजार (१९८९),परिंदा (१९८९),रूप की रानी चोरोंका राजा (१९९३) १९४२ ए लव्ह स्टोरी (१९९४),त्रिमुर्ती (१९९५), कभी न कभी (१९९८), लज्जा (२००१) आज ज्यावेळी ते एकमेकांना भेटतात त्या वेळेला ‘अंदर बाहर’ चे प्रसंग आणि त्यावेळेस त्या दोघांचा अहंकार आठवून मनमुराद हसतात.
धनंजय कुलकर्णी