… यामुळे विजय तेंडुलकरांना स्मिता पाटीलबाबत निर्णय बदलावा लागला.
ऐंशीच्या दशकात जेंव्हा मराठी सिनेमा तमाशापट, विनोदी पट आणि कौटुंबिक पट यामध्ये ढवळून निघत होता त्यावेळी १९८१ साली डॉ जब्बार पाटील यांनी ‘उंबरठा’ हा चित्रपट बनवून मराठी सिनेमाला एका वेगळ्या जॉनरचा चित्रपट दिला. ‘उंबरठा’ हा चित्रपट सर्वांथाने अतिशय वेगळा होता आणि आजही मराठीतील एक ‘माइल स्टोन’ चित्रपट म्हणून त्याकडे पाहिले जाते. या चित्रपटाचे कथानक शांता निसळ यांच्या ‘बेघर’ या कादंबरीवरून घेतले होते. या सिनेमाच्या मेकिंगची कहाणी डॉ जब्बार पाटील यांनी मागच्या वर्षीच्या एका दिवाळी अंकात फार सुंदर रीतीने मांडली आहे. त्यातून अनेक गोष्टींचा खुलासा होतो. आणि एखादी अजरामर कलाकृती बनत असताना त्यातील प्रत्येक पैलूचा किती बारकाईने विचार केला जातो हे लक्षात येतं.
मुळात शांता निसळ यांच्या या कादंबरीवर अभिनेते रमेश देव यांना एक नाटक बसवायचे होते. या कादंबरीचे नाट्यरूपांतर वसंत कानेटकर करणार होते तर या नाटकांमध्ये सीमा देव आणि रमेश देव यांच्या प्रमुख भूमिका असणार होत्या परंतु काही कारणाने हा प्रोजेक्ट बारगळला. नंतर या साहित्यकृती वर जब्बार पटेल यांनी सिनेमा बनवायचे ठरवले. जब्बार पटेल यांच्या मते हा विषय नाटकाचा नव्हताच. कारण त्याची व्याप्ती मोठी होती. रंगभूमीच्या कॅनवास वर हा विषय तितक्या प्रभावीपणे मांडता आला नसता. चित्रपटाचे कथानक काळाच्या पुढचे होते. १९७५ साली जागतिक महिला वर्ष साजरे झाल्यानंतर जगभर वुमन लिबर्टी मुव्हमेंट ची सुरुवात झाली. त्याचे पडसाद भारतात देखील वाजू लागले. ‘उंबरठा’ चित्रपट १९८१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात स्मिता पाटील (Smita Patil), गिरीश कार्नाड यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्या काळात नोकरी करणारी स्त्री हे सहसा न दिसणारे चित्र होतं. अर्थार्जनासाठी घराबाहेर पडणारी स्त्री ही आम्हाला नवीन नव्हती. पण यातील सुलभा महाजन त्या अर्थाने सुख वस्तू घरातील स्त्री होती. नोकरी करणाऱ्या स्त्रीची अभिव्यक्ती, तिची स्वतंत्र विचारसरणी, विचारांमधील स्पष्टता, स्वत:च स्वतः घेतलेला शोध स्मिता पाटील यांनी फार प्रभावीपणे या चित्रपटात दाखविला होता. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम अद्वितीय अशी बनली होती. हा चित्रपट मराठीमध्ये ‘उंबरठा’ आणि हिंदीमध्ये ‘सुबह’ या नावाने प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटात स्मिता पाटीलची (Smita Patil) निवड कशी झाली? जेव्हा विजय तेंडुलकर यांनी शांता निसळ यांच्या ‘बेघर’ या कथानकावर पटकथा लिहायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या डोक्यात देखील हे पात्र पडद्यावर कोणी रंगवावे याबद्दल विचार चालू झाला होता. तिकडे जब्बार पटेल यांना मात्र ‘जैत रे जैत’ ची नायिका स्मिता पाटील हिलाच या चित्रपटात घ्यायचे होते. स्मिता देखील या भूमिकेच्या प्रेमात पडली होती. कारण स्मिता पाटील (Smita Patil) यांची आई देखील समाजसेविका होती. कुठेतरी या भूमिकेत ती स्वतःच्या आईला शोधत होती. त्यामुळे जब्बारकडे तिने या भूमिकेचा हट्टच धरला होता. जेव्हा जब्बार पटेल आणि विजय तेंडुलकर यांची या भूमिकेबाबत चर्चा झाली. त्यावेळी विजय तेंडुलकर यांनी पटेल यांना विचारले,” तुझ्या मनात कोणी अभिनेत्री आहे का?” त्यावर जब्बार यांनी सांगितले,” आहे, स्मिता पाटील (Smita Patil)!” त्यावर तेंडुलकर म्हणाले ,”मला वाटत नाही ही भूमिका ती चांगल्या पद्धतीने करू शकेल! जर तिला तू अद्याप शब्द दिला नसशील तर तिच्या ऐवजी आपण दीप्ती नवल हिला ही भूमिका देऊ. कारण आपल्याला हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत बनवायचा आहे.” परंतु जब्बार पटेल यांनी सर्व परिस्थिती तेंडुलकर यांना सांगितले आणि तेंडुलकरांनी मग नाईलाजाने त्याला होकार दिला. त्यांच्या मनात मात्र या भूमिकेसाठी दीप्ती नवल अगदी फिट बसली होती.
=====
हे देखील वाचा : …आणि हेमा मालिनी व देव आनंद रोप वे वरच लटकले!
=====
कर्णोपकरणी ही बातमी स्मिता पाटील (Smita Patil) पर्यंत पोहचली. आता तिने चंग बांधला कारण विजय तेंडुलकरांची इच्छा नसतानाही आपल्याला जब्बार पटेल यांनी ही भूमिका दिली आहे. त्यामुळे आपण दुप्पट ताकतीने ही भूमिका साकारली पाहिजे याचा जाणीव तिला झाली. तिने अतिशय अप्रतिम रित्या ही भूमिका साकार केली. चित्रपटाची काही रीळे पूर्ण झाली नंतर या रिळांचा ट्रायल शो जब्बार पटेल यांनी ठेवला होता. ही ट्रायल पाहायला विजय तेंडुलकर देखील आले होते. विजय तेंडुलकर पहिला रांगेत बसून पाहत होते. स्मिता देखील आली होती पण खूप मागे बसलेली होती. सिनेमाचा काही भाग पाहिल्यानंतर तेंडुलकर म्हणाले,” जब्बार पटेल तुझी निवड सार्थ होती. जब्बार मित्रा कुठेतरी मी चुकलोय गड्या. स्मिता पाटीलने (Smita Patil) चमत्कारच केलाय. तिला फिल्ममध्ये न घेण्याबाबतचा विचार मी अतिशय चुकीच्या पद्धतीने करत होतो. तू बरोबर आहेस. तिला भेटायला मला आवडेल!” त्यावर जब्बार म्हणाले,” ती देखील या ट्रायल आली आहे.” तेंडुलकर म्हणाले,” अरे मग ती कुठे आहे?” स्मिताला बोलावले त्यानंतर जब्बार तेंडुलकरांना म्हणाले,” ती थोडी घाबरली होती. कारण या सिनेमासाठी ही तुमची चॉईस नव्हती हे तिला कळालं होतं.” तेंडुलकरांनी स्मिताला जवळ घेतले स्मिताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तेंडुलकरांनी तिला थोपटले आणि म्हणाले ,”बेटा स्मिता तू हरवलस आज मला. मी ज्या सुलभा महाजन ची कल्पना केली होती तू जवळजवळ साक्षात जगली आहेस!” हे ऐकल्यानंतर स्मिताचा बांध फुटला. ती कितीतरी वेळ तेंडुलकरांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती!
सिनेमा निर्मितीमधील हे भावनिक बंध सिनेमाला चिरंजीवीता प्राप्त करून देतात. ‘उंबरठा’ या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्मिता पाटील (Smita Patil) (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), डॉ जब्बार पटेल (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा हे राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले.