यामुळे शांताराम बापूंनी वसंतराव यांना मिठी मारली
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपले नाव अजरामर करून ठेवले ते कलाकार म्हणजे चित्रपती व्ही शांताराम. आज २८ ऑक्टोबर. बापूंचा स्मृती दिन. त्यानिमित्ताने त्यांच्या एका गाजलेल्या चित्रपटातील गीताच्या निर्मितीचा रंजक किस्सा. यातून शांताराम बापू या माध्यमातून किती बारकाईने पाहत होते हे लक्षात येईल. प्रभात मधून बाहेर पडून शांताराम बापूंनी (Shantaram Bapu) ’राजकमल’ची स्थापना १९४२ साली केली. प्रभातमध्ये असताना शांताराम बापू यांनी त्या संस्थेच्या परंपरेला साजेसे असे अप्रतिम सामाजिक चित्रपट दिग्दर्शित केले. राजकमल या चित्र संस्थेची स्थापना केल्यानंतर त्यांनी सामाजिक चित्रपट निर्माण केलेच शिवाय त्यांनी काही भव्य दिव्य असे चित्रपट देखील निर्माण केले. भव्यतेच्या ध्यासात काही वेळा त्यांची चित्र लय हरवत होती. पण सामाजिक चित्रपटांवर त्यांची ठसठशीत अशी मुद्रा होती. त्यांच्या दहेज (१९५०) या चित्रपटाची देशभरातील लोकप्रियता पाहून भारत सरकारने हुंडाविरोधी कायदा केला. चित्रपटाचा असा एक चांगला परिणाम देखील समाजात घडताना दिसला.
याच संस्थेचा एक चित्रपट ’झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट १९५५ साली पडद्यावर आला होता. या घटनेला या वर्षी ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने एक आठवण. व्ही शांताराम यांच दिग्दर्शनाचे कसब अजब होते. कोणताही नामांकीत कलाकार न घेता ते सिनेमे यशस्वी करून दाखवत. प्रस्तुत सिनेमा्चे नायक होते (पुढे नृत्य दिग्दर्शक म्हणून ख्यातनाम झालेले) गोपीकृष्ण आणि नायिका होती संध्या. प्रभात पासून बापूंच्या सोबत असलेल्या वसंत देसाई यांच्याकडे संगीताची जबाबदारी होती. हा सिनेमा टेक्नीकल मध्ये बनणार होता. गोपीकृष्ण, संध्या व वसंत देसाई या तीनही नावांना बापूंच्या मित्रांनी आणि वितरकांनी नापसंती दर्शवली होती. पण बापूंचा आपल्या टीमवर विश्वास होता. (Shantaram Bapu)
या सिनेमाचे चित्रीकरण दक्षिणेतील विविध ठिकाणी पार पडलं. ‘नैन को नैन नाही मिलाओ’ हे गाणे म्हैसूरच्या वृंदावन गार्डनमध्ये चित्रीत झालं. या सिनेमाची श्रेयनामावली दाखवताना ‘टाय़टल सॉंग’ येते. या सिनेमातील भव्य दिव्य नृत्याचा अविष्कार, तिथले वैभव आणि कलेचा ओज पाहता हे गाणे उस्ताद अमीर खान या शास्त्रीय संगीत गाणार्या महान गायकाकडून गाऊन घ्यायचे ठरले. वसंतराव देसाई कामाला लागले. एवढा महान गायक आपल्या संगीत नियोजनाखाली गातोय या कल्पनेने ते हरखून गेले. उस्तादांच्या आवडत्या दरबारी रागावर त्यांनी सुरावट रचली. उस्तादांना मैफीलीचा फील यावा म्हणून रिहर्सलच्या वेळी खानदानी पध्दतीची बैठक सजवली, रिहर्सल झाली. उस्तादजी समरसून गात होते. वसंतराव खुश होते पण हा आनंद क्षणिक ठरला. रात्री ते ही चाल बापूंना ऐकवायला ते गेले. बापूंना ही चाल मुळीच आवडली नाही. रेकॉर्डींग दुसर्या दिवशी ठरलेलं. काय करायचं ? ’एक तर चाल बदल नाही तर सरळ गायक बदल’ असा निर्वाणीचा इशारा बापूंनी दिला. रात्रभर वसंतराव तळमळत राहिले. नेमकं काय चुकलं? बापूंना काय म्हणायचय? उद्या उस्तादजींना काय उत्तर द्यायचं ? डोक्याचा पार भुगा झाला.
===========
हे देखील वाचा : पांच : फिल्म रिलीज झाली नाही तरी लाखो लोकांनी पाहिली !
===========
बापूंना संगीतातील काय कळतं असा दुष्ट विचारही मनात चमकून गेला. पण त्यांनी मन स्थिर केले. बापू म्हणतात म्हणजे नक्कीच त्यात काही अर्थ आहे. या भव्य सिनेमाकरीता त्यांच व्हीजन नक्कीच वेगळं आणि महान असणार. सकाळी ते आत्मविश्वासाने उठले व निर्धाराने स्टुडिओत गेले. उस्तादजींना म्हणाले “ध्वनीमुद्रणासाठी कालचेच गाणे आपण प्रयोग म्हणून, आज वेगळ्या रागात बसवून पाहूयात का?” उस्तादाना वसंतराव यांचे कौशल्य् माहित होते. त्यांनी होकार दिला.आता दरबारीच्या ऐवजी अडाणा रागात चाल बांधली गेली. आता बापू देखील तिथे दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीतच रेकॉर्डींग झाले. गाणे संपल्यावर त्यांनी वसंतरावांना मिठी मारली. दरबारी पेक्षा अडाणा रागात ती रचना आणखी उठावदार झाली होती. मग आधीच्या चालीचे काय झाले? ही चाल याच सिनेमात नायकाच्या तोंडी तो गुणगुणताना वापरली गेली. व्ही शांताराम खरे द्रष्टे! सिनेमाचा इतका बारीक विचार करणारे दिग्दर्शक आता कुठे? काही असो या गाण्याचा राग बदलल्याने बापूंचा राग गेला हे मात्र खरे! आज बापूंच्या स्मृतीदिनी हा एक वेगळा किस्सा. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.