Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक

Dulhan Hum Le Jayenge चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण
हिंदी पिक्चर म्हणजे फुल्ल एंटरटेनमेंट. याच्याशी कायमच बांधिलकी मानणारे दिग्दर्शक अर्थात आमचे गिरगावकर मनमोहन देसाई. त्यांनी दिग्दर्शित केलेला “गंगा जमुना सरस्वती” (१९८८) फर्स्ट शोपासूनच पब्लिकने नाकारेपर्यंत त्यांनी आपल्या चित्रपटात पहिल्या दृश्यापासून क्लायमॅक्सपर्यंत जे जे जसे जसे दाखवले ते हाऊसफुल्ल गर्दीने कायमच एन्जाॅय केले. आपल्या देशातील सर्वसामान्य चित्रपट रसिक थेटरात जातो ते पडद्यावरच्या विश्वात आपले सुख दु:ख तणाव विवंचना विसरण्यासाठी या गोष्टीशी ते घट्ट राहिले. (Dulhan Hum Le Jayenge)

चित्रपट संकलनाकडून दिग्दर्शनात पाऊल टाकताच डेव्हिड धवनने याच मनजींना फाॅलो करीत आपल्याही चित्रपट यशाचे प्रगती पुस्तक चांगल्या गुणाचे ठेवले. रोहित शेट्टीही त्याच रुळलेल्या वाटेवरुन गेला तरी त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील रंगत ओसरत गेली. डेव्हिड धवनच्या अनेक मसालेदार मनोरंजक चित्रपटातील एक रोमॅन्टीक काॅमेडी चित्रपट “दुल्हन हम ले जाऐंगे” (Dulhan Hum Le Jayenge) (मुंबई रिलीज २४ मार्च २०००. मेन थिएटर लिबर्टी.) च्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण झालीदेखील.
डेव्हिड धवनच्या चित्रपटातून अतिशयोक्तीपूर्ण मनोरंजक होणार हे आपल्या मेंदूत फिट्ट बसवले तरच त्याचा चित्रपट पाहताना कंटाळा येणार नाही याची हमी. त्याच्या दिग्दर्शनातील जोडी नंबर वन, साजन चले ससुराल अशा चित्रपटांच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी गेल्यावर पटकन जाणवलेली गोष्ट म्हणजे, सेटवरचे तणावरहित वातावरण. गोविंदा, सलमान खान हे कधीच सेटवर वेळेवर न येण्यासाठी ख्यातनाम. तरीही डेव्हिड धवनचा मूड बिघडत नसे. याचं कारण ते सेटवर आल्यावर कोणती दृश्य भराभर चित्रीत करायची याबाबतचा त्याचा माईंट सेट! मूळचा संकलक असल्यानेच सेटवर उशीरा येत असलेल्या कलाकाराला कसे “कव्हर” करायचे, त्याचे फूटेज कसे ठरवायचे यामागचा त्याचा मांईड गेम जणू पक्का. तरी दुल्हन हम ले… मध्ये (Dulhan Hum Le Jayenge) अधूनमधून कंटीन्यूटी तुटल्याचे जाणवते. ती गृहित धरूनच पिक्चर फुल्ल एंटरटेनमेंट केलेय.
==============
हे देखील वाचा : Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते
==============
नव्वदच्या दशकातील विदेशात घडणाऱ्या हिंदी चित्रपटातील प्रेमकथेत अर्धी गोष्ट जणू काॅमन. विदेशातील अतिशय निसर्गरम्य ठिकाणी नायक नायिका भेटतात, सुरुवातीस त्यांच्यात तू तू मै मै होते. मग ते सहप्रवाशी होतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि भारतातील आपल्या कुटुंबियांना आपल्या प्रेमाच्या गोष्टीची कल्पना देतात, त्यात काही विघ्ने येतात, तणाव निर्माण होतो आणि मग चित्रपटाचा शेवट गोड तर सगळेच गोड गोड होते. या चित्रपटात सलमान खान व करिश्मा कपूर हे विदेशात भटकंती करीत असतानाच एकमेकांना पाहतात, भेटतात आणि मग पुढची स्टोरी रंगत जाते. नायिकेचे तीन प्रकारचे तीन काका आहेत (ओम पुरी, परेश रावल व अनुपम खेर) त्या तिघांच्या तीन तर्हा. त्यातून भन्नाट विनोद निर्मिती होते.

चित्रपटात कलाकार खूप. कादर खान, सतिश कौशिक, Johny Lever, दीपक तिजोरी, Farida Jalal, हिमानी शिवपुरी इत्यादी. जमल्यास या सगळ्यांनाच पटकथेत गुंतवून घ्यायचे आणि नायक नायिकांच्या तारखांची समस्या निर्माण झाल्यास यांची भूमिका वाढवायची. या चित्रपटाची पटकथा रुमी जाफरी याची. पिक्चर काढायचा तर काही वेळेस अशा पर्यायातून जावे लागते. अनुभवी दिग्दर्शक या सगळ्यातून मार्ग काढतोच. त्याला लवचिक रहावे लागते. सलमान खानच्या पिळदार सिक्स पॅकचे यात इतके नी असे दर्शन की बहुतेक ड्रेस डिझायनरला फारसे लक्ष द्यावे लागले असेल.
गाण्यात अनेकदा तो उघड्या निधड्या छातीने वावरला. तीच त्याची ओळख झाली. करिश्मा कपूर अर्थात बेबोने मनसोक्त मनमुराद विदेशी फॅशनची वस्त्रे वापरली. बहुतेक त्यासाठीच हा चित्रपट साईन केला की काय? धर्मेश दर्शन दिग्दर्शित “राजा हिंदुस्तानी” (१९९६) पासून तिने आपण सतत प्रेझेंटेबल कसे राहू यावरचा फोकस कायम ठेवल्याचे सतत दिसून आले आणि अशा धतिंगबाज चित्रपटात असेच तर असायला हवे. हे दोघेही या चित्रपटात स्टार आणि स्टायलिश मूडमध्ये. अनुपम खेर, ओम पुरी, परेश रावल यांना कोणतीही भूमिका द्या, सकारात्मक असो, नकारात्मक असो, काही असो ते जणू त्यासाठी मेकअप रुम्समधूनच तयार होत येतात असे वाटावे. जाॅनी लिव्हरने झ्याक हसवायचे जणू कंत्राटच त्या दिवसात घेतलेले. ते काम तो चोख करणारच. (Entertainment mix masala)
संगीतकार हिमेश रेशमिया या चित्रपटातील गाण्यांच्या लोकप्रियतेने सुखावला. प्यार दिलो का मेला है, चमिया, मुझसे शादी करोगे, तेरा पल्लू सरका जाऐ रे, धीरे धीरे चलना, दुल्हन हम ले जाऐंगे (Dulhan Hum Le Jayenge) अशी सगळीच गाणी हिट आणि त्याचे चित्रीकरण स्वित्झर्लंड, ऑस्ट्रीया, माॅरीशस येथील निसर्गरम्य स्थळांवर चित्रीत झालेली, अतिशय सुरेख नेत्रदीपकपणा होता. काही गाणी जणू टोळी नृत्य. त्यातही रंगत. छायाचित्रणकार हरमित सिंगने जणू चित्रपटगृहाच्या खुर्चीवर बसलेल्या चित्रपट रसिकांना भटकंतीचा झक्कास फिल दिला. हिंदी चित्रपट उगाच फाॅरेनला जात नसतो. पब्लिकचा पैसा वसूल करण्याचे त्याना भान असते. कधी ते फसतेही.

नव्वदच्या दशकात राजश्री प्राॅडक्सन्स निर्मित व सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित “हम आपके है कौन” ( १९९४) आणि यशराज फिल्म निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित “दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे” (१९९५) या चित्रपटांनी चकाचक मनोरंजनाचे युग आणले. व्हिडिओ कॅसेटमध्ये अडकलेला प्रेक्षक आता पुन्हा सहकुटुंब सहपरीवार चित्रपटगृहात येवू लागला होता, फरक इतकाच की असे देखणे चित्रपट नवश्रीमंत व उच्चभ्रू प्रेक्षकांची आवड झाले होते. तिकीट दरात भारी वाढ झाली होती..
दुल्हन हम ले जाऐंगे (Dulhan Hum Le Jayenge) हा मल्टीप्लेक्स युग सुरु होण्याच्या टप्प्यावरचा देखणा चित्रपट. दिग्दर्शक डेव्हिड धवनचे प्रगती पुस्तक अनेक सुपर हिट चित्रपटांनी भरलेले. त्यात हा एक चित्रपट. मुंबईत मेन थिएटर लिबर्टीत ज्युबिली हिट ठरला. २००० सालची सुरुवात राकेश रोशन दिग्दर्शित “कहो ना… प्यार है” च्या ज्युबिली हिटने झालेली आणि त्यातल्या चिकना ह्रतिक रोशनने तरुणाईला झपाटून टाकलेले. त्याच वातावरणात दुल्हन हम ले… आला आणि लै हिट ठरला. आणखीन काय हवे? चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वाधिक चलनी नाणे आणि पंचवीस वर्ष पूर्ण होवून देखील हा चित्रपट तरुण टवटवीत राहिलाय. गीत संगीत नृत्यासह मनोरंजन करतो, विनोदी पंचेसने मस्त हसवतो. आणखीन काय हवे?