Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

एल्फिन्स्टनचा ब्रीज पाडला आणि Deewaar आठवला….
मुंबई आणि चित्रपटसृष्टी विविध स्तरांवर अतिशय घट्ट नाते… इतके की कुलाब्यातील मुकेश मिलपासून बोरीवलीत राष्ट्रीय प्राणी संग्रहालयापर्यंत आणि आमच्या गिरगावातील खोताची वाडीपासून भांडूपच्या रेल्वे कारशेडपर्यंत अनेक तरी लहान मोठे स्पॉट मराठी व हिंदी चित्रपटातून दिसलेत. एखाद्या साऊथ इंडियन चित्रपटातही (उदाहरणार्थ ‘कुबेरा’त ग्रॅन्ड रोड स्टेशनबाहेरचे जग), भोजपुरी, गुजराती वगैरे अनेक भाषेतील चित्रपटात मुंबई दिसलीये. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापासून रंगीत चित्रपटापर्यंत हा मुंबईतील गिरगाव चौपाटी असो, वरळी सी फेस असो, जुहू चौपाटी असो, मढ असो, ते चित्रपटातून दिसलेय.
म्हणूनच तर जेव्हा दक्षिण मध्य मुंबईतील इंग्रजकालीन एल्फिन्स्टन ब्रीज पाडण्यात येत असलेली बातमी ऐकून पटकन आठवले ते गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ (१९७५) पटकन डोळ्यासमोर आला. याच एल्फिन्स्टन ब्रीजच्या खाली एका इमारतीच्या कामात मोलमजुरी करणारी, कष्ट करणारी सुमित्रा वर्मा (निरुपा रॉय) आपल्या दोन लहान मुलांना घेऊन गरीबीत राहतेय… आणि कालांतराने पूर्वेकडील बाजूस खाली दोन भाऊ म्हणजे विजय वर्मा (अमिताभ बच्चन) व त्याचा धाकटा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर रवि वर्मा ( शशी कपूर) यांची रात्री झालेली भेट आणि त्या भेटीतील काही नाट्यपूर्ण डायलॉगबाजी.

‘दीवार’ मध्ये मुंबईतील अशी अनेक छोटी मोठी स्थळे आपल्याला पाह्यला मिळताहेत. विजय लहानपणी चर्चगेट येथील गेलॉर्ड हॉटेलबाहेर रस्त्यावर बुट पॉलिशचा व्यवसाय करतोय आणि तेथेच राज दावर (इफ्तेखार) आपला सहकारी जयचंदसह (सुधीर) बुट पॉलिश केल्यावर जयचंदने फेकलेले पैसे पाहून विजय (मा. अलंकार) ताडकन उठून अतिशय स्वाभिमानाने सांगतो, “हम बुट पॉलिश करता है कोई भीक नहीं मांगता…पैसे उठाके हाथ मे दो” आणि दावर देखिल जयचंदला सांगतो, “पैसा उठाके हाथ मे दो…”
अशी या चित्रपटात मुंबईतील अनेक स्थळे दिसतात. कला दिग्दर्शक देश मुखर्जी यांचे याबाबत विशेष कौतुक करायलाच हवे. असे अनेक लहान मोठे स्पॉट वा जागा एखाद्या व्यक्तिरेखेनुसार चित्रपटात दिसतात. एल्फिन्स्टन ब्रीजही तसाच दिसतो. याच ब्रीजखालचा हुबेहुब सेट परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत उभारण्यात आला. काही दृश्य प्रत्यक्षात स्पॉट वर तर कधी सेटवर असे चित्रपट माध्यमात होतच असते. अनेक चित्रपटात ते दिसेल. ‘दीवार’ चा मुहूर्त याच राजकमल कलामंदिर स्टुडिओत झाला. एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकावर (व अगदी लोअर परळ येथेही) उतरुन आपण या स्टुडिओत जातो.
एल्फिन्स्टन ब्रीजखालील विजय व रविच्या भेटीची दृश्य रात्रीची आहेत. याचं विशेष कारण आहे. इन्स्पेक्टर रवि वर्माने मुंबईतील स्मगलिंगाची पाळेमुळे खणायला घेतलीत तर विजय त्याच क्षेत्रात मुरलाय. श्रीमंत झालाय. यातूनच या दोन भावांतील संबंधात तणाव निर्माण झालाय आणि अशातच विजय रविला याच एल्फिन्स्टन ब्रीजखाली रात्री भेटायला बोलावतो आणि विजय म्हणतो, “जानते हो रवि तुम्हे यहां क्यू बुलाया…इस पूल के नीचे हमने अपना बचपन गुजारा…” आणि मग विजय व रवि यांच्यातील महत्वाचा संवाद होतो, जब तक एक भाई बोल रहा है एक भाई सुन रहा है….

विशेष उल्लेखनीय गोष्ट अमिताभ बच्चननी एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सांगितले होते, त्या काळात दिवसभर आपण बंगलोरजवळील रामनगर येथील रामगढच्या सेटवर चित्रीकरण करुन मग रात्रीच्या विमानाने मुंबईत येवून रात्री ‘दीवार’च्या चित्रीकरणात भाग घेत असू आणि पहाटेच्या सुमारास विमान पकडून बंगलोरला जात असू. आणि ये जा करताना विमानात झोप पूर्ण करीत असू. अमिताभ बच्चनच्या या बोलण्यातून काही किस्से तयार झाले. पण ते रात्रीचे चित्रीकरण हे याच एल्फिन्स्टन ब्रीजखालील दृश्यांचे होते.
================================
हे देखील वाचा : Bollywood Gossips : घटस्फोट हाच मार्ग? वेगळेही राहता येते….
=================================
छायाचित्रणकार केजी यांनाही याचे श्रेय द्यायला हवे. त्यांनी या दृश्यातील रात्रीची शांतता आणि दोन भावांतील वैचारिक द्वंद्व हा मूड चांगलाच पकडला आहे. सलिम जावेद यांच्या सर्वोत्तम पटकथा व संवाद लेखनात ‘दीवार’ चा खास उल्लेख होतो. आणि त्यातही एल्फिन्स्टन ब्रीजखालील दोन भावांतील भेट अतिशय महत्वाचे दृश्य. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट काळातील चित्रपटांच्या वेळची मुंबई अर्थात काळानुसार काही ठिकाणी बदलत बदलत जात आहे पण जुन्या काळातील चित्रपटात त्या काळातील मुंबई आणि अशा अनेक गोष्टी मात्र नक्कीच दिसत राहतील. आणि जुन्या आठवणीत नेत राहतील हे नक्कीच. एल्फिन्स्टन ब्रीज पाडला जातोय हे त्यासाठी आणखीन एक विशेष उल्लेखनीय उदाहरण.