
मेटाव्हर्स: मनोरंजन क्षेत्रासमोर आभासी तंत्रज्ञानाचं नवं आव्हान
आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. अहं.. फार टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण, ती काही अकल्पित किंवा दुर्दैवी घटना वगैरे नव्हती. पण ती जरा अनाकलनीय वाटली. घटना घडल्यानंतर त्या घटनेची प्रेस नोट नेहमीप्रमाणे सगळ्या माध्यमांकडे गेली. सर्वसाधारणपणे अलिकडे प्रेस नोटवरच बातम्या केल्या जातात.
आधी पत्रकार परिषदेत प्रेस नोट जरी मिळाली तरी ती खिशात टाकून पत्रकार परिषदेला बसे. आपले प्रश्न विचारी आणि त्यातून जे काही हाती लागलं आहे ते घेऊन तांत्रिक भाषा चुकू नये म्हणून खिशातली प्रेस नोट उघडून वाचकांला तो सगळा मथितार्थ कळेल अशा भाषेत लिहून छापे. जेणेकरून नवा प्रकार नेमका काय आहे तो वाचकाला कळे. आता तसं होत नाही.
हे सगळं आयोजकही जाणून असतात म्हणूनच आपण समजून घेण्यापेक्षा समोरचा काय म्हणतोय ते रेकॉर्ड करून छापायला देण्यात धन्यता मानली जाते. म्हणजे उद्या एखाद्या वाचकाला मुद्दा कळला नाही तर तो अमुकने चुकीचा सांगितला असं सांगत आपला बचाव करता येतो. असो… हे सगळं सांगण्यामागचं कारण, ती घटना होती.
व्यक्तिश: त्या पत्रकार परिषदेला मी नव्हतो. पण हाती आलेल्या प्रेस नोटचा मथळा हा होता, “शेर शिवराज’ चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित.” आता या बातमीत उल्लेख असलेल्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटाचा खरंतर या लेखाशी संबंध नाही. कारण, हा चित्रपट हा एक निमित्त ठरतो आहे इतकंच. मुद्दा आहे तो या मेटाव्हर्स (Metaverse) या तंत्रज्ञानाचा.

हा प्रकार पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत दाखल होत असल्याचा दावा या प्रेस नोटमध्ये करण्यात आला आहे. हरकत नाही. नव्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि त्याच्याशी इंड्स्ट्री म्हणून आपल्याला जुळवून घ्यायला हवं. पण आता मुद्दा हा आहे की, मेटाव्हर्स (Metaverse) म्हणजे नेमकं काय? त्यामुळे इंडस्ट्रीला आणि प्रेक्षकांना नेमका काय फायदा होणार आहे? तंत्रज्ञानाची नवी पायरी मानला जाणारा हा मेटाव्हर्स (Metaverse) खरोखरीच आपल्यासाठी वरदान ठरणार आहे का? ठरणार असेल तर तो कसा? हे पाहायला हवं.
मेटाव्हर्स (Metaverse) काय आहे? तर त्याला आपण मोघम भाषेत ‘व्हर्चुअल रिआलिटी’ म्हणू शकतो. मेटाव्हर्समध्ये तंत्रज्ञानाद्वारे आभास निर्माण केला जातो आणि त्याद्वारे दोन्ही बाजूंना एकमेकांशी संवाद साधता येतो.
अगदीच उदाहरण द्यायचं, तर शेर शिवराज चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला. तर मेटाव्हर्सच्या माध्यमातून आपल्याला तो ट्रेलर लॉंच पाहता येतोच, पण तो पाहताना आपण स्वत: प्रतापगडावर असल्याचा भास आपल्याला होतो आणि आपण आपल्या घरात जरी असलो तरी प्रतापगडावर चालू असलेल्या या ट्रेलर लॉंचच्या सोहळ्याला आपण जणू उपस्थितच आहोत असा भास निर्माण केला जातो. मेटाव्हर्सची ही गंमत आहे.
या प्रेसनोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वेब ३.० हे नव्यानं आलेलं इंटरनेटचं युग आहे. यात फाईव्ह जी, ब्लॉकचेन, ऑगमेन्टेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी यांचा समावेश होतो. पाहणारा थेट कार्यक्रमाशी कोणत्याही मध्यस्थाविना कनेक्ट होऊ शकतो हे यात महत्वाचं.
आता आपण या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला होऊ शकतो का याबद्दल बोलू. जे सर्वात महत्त्वाचं आहे. मेटाव्हर्स (Metaverse) हे तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. अनेकांना घरबसल्या याचा लाभ घेता येऊ शकतो हे जसं याचं बलस्थान आहे, तसंच इंडस्ट्रीच्या वाढीच्या मुळावर हा मुद्दा येऊच शकतो. म्हणजे असं पाहू.
शेर शिवराज चित्रपटाच्या उदाहरणावर पुन्हा येऊया. मेटाव्हर्स (Metaverse) तंत्रज्ञानाद्वारे ट्रेलर लॉंच झाल्यास महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांना आपआपल्या शहरामधून या प्रतापगडावर होणाऱ्या कार्यक्रमाला व्हर्चुवल उपस्थिती लावता येईल.. ही झाली जमेची बाजू. म्हणजे खर्च वाचेल.. वेळ वाचेल. घरबसल्या मनोरंजन होईल. बातमीदारीला आपण स्वत: हा कार्यक्रम व्हर्चुअली का असेना, पण ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवू शकल्यामुळे यातून सकस खाद्य मिळेल. हे मुद्दे महत्वाचे आहेत. पण याचीच पुढची पायरी जर गाठायची ठरवली तर?
समजा उद्या सिनेमा जर मेटाव्हर्समध्ये लोकांना घरबसल्या पाहता येऊ लागला तर? तर आपणच आपल्या पायावर घाव घालण्यासाऱखी स्थिती निर्माण होऊ शकेल. कारण, घरबसल्या जर हा सिनेमा पाहात येत असेल, तर लोक थिएटरकडे येणारच नाहीत. थिएटरमध्ये लोक येईनासे झाले, तर मात्र या धंद्याशी निगडित अनेक घटकांवर याता परिणाम होणार आहे. तो अगदी बुकिंग क्लार्कपासून पार कॅंटीनवर उपजिविका करणाऱ्या प्रत्येकाला ते भोगावे लागतील, हा एक भाग.
दुसरी गोष्ट अशी की, चित्रपट पाहण्याचा अनुभव जो थिएटरमध्ये घेता येतो त्याला प्रेक्षक मुकतील. आज अनेक सिनेमे ओटीटीवर उपलब्ध असल्याबद्दल कुणीही कितीही आनंद व्यक्त केला तरी, हे सिनेमे तुम्ही शांतचित्ताने.. कोणतंही इतर काम हाती न घेता आणि कुणी एकदाही डिस्टर्ब न करता पाहू शकत नाहीच. कारण घरबसल्या आपल्या भवताली इतकी व्यवधानं असतातच.
नवं तंत्रज्ञान येणं ही चांगली बाब आहे. या गोष्टीशी जुळवून घ्यायला हवंच. पण ते घेताना आलेलं तंत्रज्ञान खरंच आपल्यासाठी योग्य आहे का आणि असेल तर त्याला कुठंवर प्रवेश द्यायचा याचा विचार व्हायला हवा. उद्या कदाचित मेटाव्हर्स (Metaverse) तंत्रज्ञान नाट्यसृष्टीमध्येही यायला मागेपुढे पाहणार नाही. कारण, टेक्नोलॉजीला योग्य-अयोग्य कळत नसतं. पण तसा तिचा शिरकाव होणार असेल, तर नाटकासारख्या जिवंत कलेला ते चालणारं आहे का, याचाही विचार व्हायला हवा.
उद्या व्हर्चुअली उत्तम थिएटरचा भास निर्माण केला जाईलही. उत्तम प्रकाशयोजना.. उत्तम नेपथ्य उभारलं जाईल. या आभासी दुनियेत येणारा प्र्त्येक प्रेक्षक पहिल्या रांगेत आपण बसून नाटक पाहातोय की काय असंच त्यालाा वाटत राहील, पण नाटक या कलेसाठी ते योग्य आहे का? जिवंत कला ही साद आणि प्रतिसादाच्या पुलावर बांधली गेली आहे. मंचावरून घातलेली साद जर समोर बसलेल्या प्रेक्षकापर्यंत पोचून त्यातून प्रतिसाद उमटणारच नसेल तर ती कला गर्भगळीत व्हायला वेळ लागणार नाही.
======
हे देखील वाचा – बालनाट्य: छोट्या प्रेक्षकांचा कमबॅकही गरजेचा
======
मुद्दा मेटाव्हर्सला विरोध करण्याचा नाहीच. मुद्दा हा आहे, की ती आपण नेमकी कुठे आणि किती वापरू शकतो. उद्या कार्पोरेट सेक्टरमध्ये, कार्यालयीन कामकाजात.. वैद्यकीय क्षेत्रात आदी ठिकाणी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरेल यात शंका नाही. पण जिथे ‘परफॉर्मिंग आर्ट’ आहे तिथे याचा कितपत उपयोग होईल याचा विचार करायला हवा. केवळ बातमी होतेय म्हणून त्या तंत्रज्ञानाला जवळ करण्यात काही अर्थ नाही, असं वाटून जातं आहे. असो. सांगायचं इतकंच होतं.
1 Comment
[…] मेटाव्हर्स: मनोरंजन क्षेत्रासमोर आभा… […]