श्रीगणेशा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ‘वैजू नंबर वन’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. त्यात प्रमुख भूमिका साकारणारा कलावंत म्हणजे समीर खांडेकर. त्याला आपण ‘काहे दिया परदेस’, ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकांत पाहिले आहे. कॉलेजच्या एकांकिका स्पर्धांपासून ते मराठी चित्रपटांपर्यंतचा त्याचा प्रवास आपणाला परिचयाचा आहे.
समीर म्हणतो, “आमच्या गावात म्हणजे कोकणात दरवर्षी गणपतीची स्थापना होत असते. पण यंदाच्या वर्षी कोरोनामुळे आपल्याला गावी जाणे शक्य होणार नाही, हे माहित होते. सर्वांशी चर्चा करून आम्ही यंदा आमच्या नवीन घरात बोरिवलीला गणपती आणायचे ठरवले. यावर्षी गणपती आणण्यापूर्वी आम्ही देवाला गाऱ्हाणे घातले. “सर्व काही निर्विघ्नपणे पार पडू दे” अशी मनोभावे प्रार्थना केली. मग आम्ही ‘ट्री गणेश’ मूर्ती आणायचे ठरवले.
आमच्या नवीन घरात म्हणजे बोरिवलीला आम्ही खांडेकर कुटुंबीय आणि माझ्या बायकोचे आई वडील आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गणपती साजरा करण्याचे ठरवले. घरी सजावट केली होती. आम्ही दीड दिवसांसाठी गणपती आणत असल्याने ज्या मोजक्याच नातेवाईकांना बोलावले होते, त्यांना सुद्धा येण्याची दर्शनाची वेळ ठरवून दिली होती. त्यामुळे सर्व नियमांचे पालन केले जाणार होते.
तोरण, मखर अशी सर्व सजावट आम्ही सर्वांनी मिळून केली होती. घरच्या बाल्कनीत नियमाप्रमाणे ‘ट्री गणेशमूर्तीचे’ विसर्जन केले. आता काही कालावधीने एका छानशा वृक्षाच्या रूपाने बाप्पा आमच्या सोबत कायम असेल. आम्ही ‘वैजू नंबर वन’ मालिकेत सुद्धा गणपती आणल्याने तिथे सुद्धा चाळीतले वातावरण अनुभवले. मी लालबागचा आहे. यंदाच्या वर्षी लालबागच्या राजा साठी मंडळाने जो आरोग्य उत्सवाचा उपक्रम राबवला, त्याचे मला कौतुक वाटते. बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे आणि लोकांना आरोग्याच्या संदर्भात जागृत करणे, हे उत्तम कार्य मंडळाने केले. आम्ही लालबागच्या चाळीत वाढलो.
अनंत चतुर्दशीच्या श्री गणपतीबाप्पाला निरोप देण्याच्या मिरवणूका आजही लक्षात आहेत. येथून गणपती चौपाटीच्या दिशेने जाताना श्री गणरायांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्याची परंपरा आहे. ती परंपरा या वर्षी अनुभवता येणार नाही, ही खंत आहे. पण हा बाप्पा लवकरात लवकर या कोरोनाचे विघ्न दूर करो, अशी आपण प्रार्थना करूया.”