‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्रतीक्षा थलाइवी चित्रपटाची….
अम्मा अर्थात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधीरीत असलेला थलाइवी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार का याची उत्सुकता जयललिता यांच्या चाहत्यांना आहे. कंगना राणावतने यामध्ये जयललिता यांची भूमिका केल्यानं चाहत्यांमध्ये अधिक उत्सुकता आहे. विजय ए एल दिग्दर्शित थलाइवी हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे. मात्र कंगना राणावतने ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.जयललिता यांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटाचे भव्य दिव्य प्रदर्शन होणार होतं. पण कोरोनामुळे हे शक्य नसलं तरी मोठ्या पडद्यावर थलाइवी प्रदर्शित व्हावा अशी कंगनाची इच्छा आहे. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन 26 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार की लांबणार हे लवकरच समजेल.
जयललिता यांच्या जीवनावरील थलाइवी या चित्रपटाची कथा विजयेंद्र प्रसाद यांनी लिहीली आहे. या चित्रपटात कंगना सोबत अरविंद स्वामी, प्रकाश राज, पूर्णा, जीशु सेनगुप्ता, मधू, समुथिरकनी, भाग्यश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अरविंद स्वामी, एम. जी. रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. थलाइवी चित्रपटासाठी मुंबईमध्ये जो सेट तयार केला त्याची किंमत जवळपास 48 रुपये इतकी झाली. 24 फेब्रुवारी 2019 रोजी जयललिता यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.
जयललिता या तामिळनाडूच्या तब्बल 14 वर्ष मुख्यमंत्री होत्या. एक लोकप्रिय अभिनेत्री ते एक यशस्वी राजकारणी असा त्यांचा प्रवास आहे. त्यांच्या आयुष्याचे हे महत्त्वपूर्ण दोन टप्पे या चित्रपटात समाविष्ट करण्यात आले आहेत. जयललिता या दोन वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे मुलांना घेऊन त्यांची आई माहेरी आली. जयललिला यांची मावशी चित्रपटात काम करायची. बहिणीबरोबर जयललिला यांची आईही चित्रपाटात काम करु लागली. जयललिला तीन वर्षाच्या असतांना त्यांनी शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली. शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून त्यांची ओळख होती. दहावीत त्या संपूर्ण राज्यात पहिल्या आल्या. स्टेट गोल्ड मेडल त्यांनी जिंकले होते. पुढे वकील होण्याची त्यांची इच्छा होती.पण त्यांच्या आईला चित्रपटात भूमिका कमी मिळत होत्या. त्यामुळे कुटुंबासाठी जयललिता या चित्रपटात काम करु लागल्या.
जयललिता अवघ्या पंधरा वर्षाच्या असतांना चित्रपटात काम करु लागल्या. त्यांच्या पहिल्या चित्रपटाला ए सर्टीफिकेट मिळालं होतं. त्यामुळे हा पहिला चित्रपट त्यांना बघता आला नाही. तमिळ चित्रपटातातील बोल्ड अभिनेत्री म्हणून त्यांचा परियच झाला. जयललिला यांचे चित्रपट हिट झाल्यावर त्यांचे शिक्षणाचे स्वप्न मागे पडले.जयललिता यांनी सर्वाधिक चित्रपट मरुधरन गोपालम रामचंद्रम म्हणजेच एमजीआर यांच्याबरोबर केले. पुढे जयललिता राजकारणात आल्या. एमजीआर यांच्या निधनानंतर त्या पार्टीच्या प्रमुख झाल्या. 91 मध्ये त्या तामिळनाडूच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या.
तब्बल 14 वर्ष जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यांच्या घऱावर जेव्हा आयकरविभागाचा छापा पडला तेव्हा नुसत्या साड्याच दहा हजार मिळाल्या, बाकीची रक्कम वेगळी होती.असे असले तरी त्या सर्वसामान्यांसाठी अम्मा होत्या. अम्मा कॅंटीन नावाचा उपक्रम त्यांनी सुरु केला. त्यात फक्त एक रुपयात इडली मिळत असे. जयललिता यांचा स्वतःची पोशाखाची स्टाईल होती. हिरवा रंग त्यांचा खास आवडीचा होता. शपथविधी घेतांना तर त्या पेनही हिरव्या रंगाचा वापरत. त्यामुळे त्यांचे लाखो समर्थकही हिरव्या रंगाच्या पोशाखात येत असत.
जयललिता या शास्त्रीय संगीताच्या उपासक होत्या. त्या कर्नाटक संगीत, पियानो, भरतनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, मणिपुरी, कथ्थक यामध्ये त्या पारंगत होत्या. त्यांचे अरंगेतरम झाले तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते शिवाजी गणेशन उपस्थित होते. त्यांनी तेव्हा जयललिता या भविष्यात मोठ्या फिल्मस्टार होतील अशी भविष्यवाणी केली होती.
जयललिता या फिल्मस्टारही झाल्या आणि राजकारणातही त्या खूप मोठ्या झाल्या. सर्व विरोधकांवर मात करत त्यांनी आपलं अढळ स्थान तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणात निर्माण केलं. हे सर्व सहज सोप्प नव्हतं.या सर्वात जयललिता यांचा संघर्ष या थलाइवीमध्ये दाखवण्यात आला आहे.
कंगना राणावतचा हिरव्या साडीतील लूक व्हायरल झाला आहे. या चित्रपटाच्या प्रोमोलाही लाखो लाईक मिळाले आहेत. काहींना कंगनाचा लूक आवडला नाही…मात्र थलाइवी अर्थात आपल्या क्रांतीकारी नेत्या असणा-या अम्माला पाहण्यासाठी सर्व माफ अशी जयललिता यांच्या चाहत्यांची भूमिका आहे. त्यामुळेच आपल्या अम्माला पडद्यावर कधी बघता येणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 26 ऑगस्टला थलाइवी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला तरी त्याला भरघोस प्रतिसाद मिळेल हे नक्की.