मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
आशा भोसले यांच्या टाॅप टेन पैकी ‘या’ गाण्याची पन्नाशी
चित्रपटाच्या जगातील काही प्रश्न फारच अवघड असतात, मधुबालाचे आवडते असे पाच क्लोजअप सांगा. अरे, असं कोणी मोजूनमापून सौंदर्याचे गुणगाण गातं का? काहीतरीच. श्रीदेवीची रुपेरी पडद्यावरील सर्वोत्तम पाच नृत्ये सांगा, असं श्रीदेवीच्या निधनाच्या वेळेस मला कोणी तरी प्रश्न केला होता. माझ्या डोळ्यासमोर मेहबूब स्टुडिओतील रवि टंडन दिग्दर्शित ‘नजराना’ मधील गाण्यावर श्रीदेवीच्या नृत्याच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी बनी रुबैन मला त्यांच्या गाडीतून घेऊन गेले असता मी गाडी थांबतोय तोच सेटवर पोहचलो देखील ते आठवले.(Asha Bhosle)
अशाच अवघड प्रश्नातील एक आशा भोसले यांची तुमच्या आवडती दहा गाणी सांगा. अरे फक्त दहाच. केवढा खजिना आहे त्यांच्या अष्टपैलू, चतुरस्र, बेहतरीन गायकीचा. ऐकत रहावे, तल्लीन व्हावे, भान हरपावे अशी व इतकी विविधता आहे. यावेळचा वाढदिवस त्यांनी दुबईत साजरा केला याची माहिती देण्याबाबतच्या वांद्र्यातील बॅण्ड स्टॅन्डच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील पत्रकार परिषदेत मी खरोखरच धीर ऐकवटून प्रश्न केला, तुमची अशीही अनेक गाणी असतील, ती या इव्हेन्टसमध्ये असावीत असे वाटले, पण निवडता आली नाहीत…आशाजींनी यावर छान उत्तर दिले (यू ट्यूबवर ही पत्रकार परिषद पाहता येईल.) (Asha Bhosle)
आज हे मी का सांगतोय ? तर आशा भोसले यांच्या माझ्या आवडत्या सर्वोत्कृष्ट दहा गाण्यातील एक ‘चैन को हमको कभी आपने जिने ना दिया’ या गाण्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतेच. आर. एम. प्रॉडक्शन्सच्या रतन मोहन निर्मित व अली रझा दिग्दर्शित “प्राण जाए पर वचन न जाऐ” या चित्रपटासाठीचे हे गाणे आहे. हे गाणे गीतकार एस. एच. बिहारी यांचे असून संगीत ओ. पी. नय्यर यांचे आहे. हा चित्रपट मुंबईत ४ जानेवारी १९७४ रोजी प्रदर्शित झाला. सुपर थिएटरमध्ये शंभर दिवसांचा मुक्काम केला. या चित्रपटाला आणि अर्थातच या गाण्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. (Asha Bhosle)
चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से हमको कभी
चांद के रथ में रात की दुल्हन जब जब आएगी
याद हमारी आपके दिल को तरसा जाएगी
आपने जो है दिया, वो तो किसीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से …
रेडिओ सिलोनवर, विविध भारतीवर, इराणी हाॅटेलमधील ज्यूक बाॅक्समध्ये आठ आण्यांचे नाणे टाकून हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकताना कधी एकदा सुपर थिएटरमध्ये प्राण जाए पर… पाहतोय असं झालं. आवडतं गाणे पाहण्यासाठी चित्रपटगृहाची वारी करण्याशिवाय त्या काळात पर्यायच नसे. पण पिक्चर ‘फक्त प्रौढांसाठी’ अर्थात ॲडल्स आणि मी शालेय वयात. (Asha Bhosle)
कसं जमणार ? पण पडद्यावर हे गाणं कसं दिसतेय याचा शोध तर घ्यायलाच हवा (तेव्हा गुगल वगैरे काहीच नव्हते. म्हणून तर उत्सुकता वाढत होती.) पण समजलं, पिक्चरमध्ये हे गाणेच नाही. फक्त ध्वनिमुद्रिकेत आहे. चित्रपटातील सहाही गाणी आशा भोसले यांनीच गायलेली. संगीतकार ओ. पी. नय्यर व आशा भोसले हे जबरदस्त हिट काॅम्बिनेशन.
साठच्या दशकात चित्रपट संगीतावर या जोडीचा जबरा ठसा. हे गाणे रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांच्यात काही कारणास्तव वाद निर्माण झाल्याने हे या जोडीचे शेवटचे गाणे. पण चित्रपटात समाविष्ट झाले नसले तरी याच गाण्याला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला. त्यावेळी आशा भोसले हजर नसल्याने ओ. पी. नय्यर यांनी तो स्वीकारला आणि रात्री उशीरा घरी परतत असतानाच आपली गाडी थांबवून तो रस्त्यावर टाकलाच आणि मग त्यावरुन गाडीही नेली असा किस्सा प्रसिद्ध आहे. (व्हाॅटसअपवरुनही तो फार व्हायरल झाला आहे.)
एखाद्या गाण्याचे नशीब (की दुर्दैव ?) असेही असते. या गाण्याचा आशा भोसले यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्ण धवल व्हिडिओ गुगलवर उपलब्ध आहे. आवर्जून पहालच. आता प्रश्न आशा भोसले यांची हिंदी चित्रपटातील माझी आवडती दहा गाणी. उत्तर अतिशय अवघड आणि गाण्यांचा क्रम त्याहीपेक्षा अवघड. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सणानुसार माझी आवड देतोय आणि गाणी निवडताना खूपच मोठा कालखंड व विविधता यांचा समावेश केला आहे. (Asha Bhosle)
आईये मेहरबान ( हावडा ब्रिज, १९५८. संगीत ओ. पी. नय्यर)
काली घटा छाई मोरा जिया ( सुजाता, १९५९. संगीत सचिन देव बर्मन)
निगाहे मिलाने को जी चाहता है ( दिल ही तो है, १९६३. संगीत रोशन)
दिल लगाके हम ( जिंदगी और मौत, १९६५. संगीत सी. रामचंद्र)
दम मारो दम मीट जाए गम ( हरे राम हरे कृष्ण, १९७२. संगीत राहुल देव बर्मन)
चुरा लिया है तुमने जो दिल को ( यादों की बारात, १९७३. संगीत राहुल देव बर्मन)
चैन को हमको कभी आपने…( प्राण जाए पर वचन न जाऐ, १९७४. संगीत ओ. पी. नय्यर)
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ( इजाजत, १९८७. संगीत राहुल देव बर्मन)
ले गई ले गई ( दिल तो पागल है, १९९७. संगीत उत्तमसिंग)
राधा कैसे ना जले ( लगान, २००१. संगीत ए. आर. रेहमान)
अर्थात ही माझी निवड असून ती सर्वानाच मान्य होईल असे अजिबात नाही. मराठी व हिंदी चित्रपट गीते, अन्य अनेक प्रकारची असंख्य बहारदार गाणी आहेत. ‘वय हा माझ्यासाठी एक आकडा आहे ‘ अशा सकारात्मक वृत्तीने आपल्या आयुष्याचा आणि गायनाचा आनंद देत घेत वाटचाल करत असलेल्या आशा भोसले यांचे चैन को हमको कभी गाण्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त हा फोकस…