महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
हिरो विश्वजित यांचा फिल्मी आणि सुरेल प्रवास
आपल्याकडे नायक आणि गायक यांची जोडी जमलेली दिसते. सिनेमाच्या सुवर्णयुगात तर सदाबहार त्रिकुटाने गायक आणि संगीतकार देखील वाटून घेतले होते. राज कपूरसाठी मुकेश, देव आनंदसाठी किशोर, दिलीप कुमारसाठी मोहम्मद रफी. त्याचप्रमाणे शम्मी कपूरसाठी रफी, राजेश खन्ना,अमिताभसाठी किशोर अशा जोड्या जमत होत्या. साठच्या दशकात नवीन नायकांचा उदय झाला. त्यापैकी एक होता विश्वजीत. (Hero Vishwajit)
विश्वजित (Hero Vishwajit) यांच्याकरिता पार्श्वगायन प्रामुख्याने हेमंतकुमार, महेंद्रकपूर आणि रफीने केले. त्याच्या पहिल्या हिट सिनेमात ’बीस साल बाद’ मध्ये हेमंतदाच्या स्वरात त्याने ’जरा नजरोसे कहदो जी निशाना चूक ना जाये’ आणि ’बेकरार करके हमे यूं न जाईये आपको हमारी कसम लौट आईये’ साकारली. या दोन रोमॅंटीक गाण्यांनी हेमंतदा त्याचा रूपेरी स्वर बनले. पुढे कोहरा, बिन बादल बरसात या सिनेमातून तो याच स्वरात पडद्यावर गात होता. १९६५ सालच्या ’मेरे सनम’ या संगीतमय चित्रपटात तब्बल ८ गाणी रफीच्या आवाजात होती. रोका कई बार मैने दिल की उमंग को, हमदम मेरे खेल ना जानो, पुकारता चला हूं मै, हुये है तुमपे आशिक हम बुरा मानो भला मानो, हमने तो दिल को आपके कदमोंमे रख दिया, रफीच्या या गाण्यांनी विश्वजितचं बॉलीवूड मधील स्थान पक्कं झालं.
पुढे एप्रिल फूल (मेरी मुहोब्बत पाक मुहोब्बत) ,शहनाई (न झटको जुल्फ से पानी), दो कलीयां (तुम्हारी नजर क्यूं खफा हो गई), नाईट इन लंडन (नजर न लग जाये) हे सिनेमे निव्वळ संगीतामुळे गाजले. मनमोहन देसाई यांचा ’किस्मत’ १९६८ साली आला. यात ओ पी नय्यर यांनी विश्वजीत करीता महेंद्रकपूरचा स्वर वापरला. लाखो है यहां दिलवाले पर प्यार नही मिलता, आंखो में कयामत के काजल ही गाणी ओपीच्या बेस गिटार पीस मुळे व त्यातील र्हीदमने अफाट गाजली. या सिनेमात विश्वजितला आणखी एक स्वर लाभला तो होता शमशाद बेगम यांचा ! गाणं होतं ’कजरा मोहब्बतवाला ऑंखियों में ऐसा डाला’! या गाण्याने अफाट लोकप्रियता हासिल केली. लोकसंगीतावर आधारीत या गीतात हार्मोनियमच्या सूरांचा अप्रतिम वापत होता. विश्वजितने या गाण्यावर स्त्री वेषात दिलखेचक नृत्य केले होते.(Hero Vishwajit)
१९७० सालच्या ’मै सुंदर हूं’ या सिनेमात किशोरकुमारचा स्वर मुझको ठंड लग रही है या गीतात विश्वजितला (Hero Vishwajit) लाभला. मुकेशचा आवाज मात्र त्याच्याकरीता एकाच सिनेमात वापरण्यात आला. हा सिनेमा ऋशिकेश मुखर्जी यांनी १९६६ साली सुरू केला होता. यात विश्वजितची नायिका माला सिन्हा होती. या सिनेमात दिलीपकुमारची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. हा सिनेमा होता ’फिर कब मिलोगी?’ ऋशिदांचा हा सिनेमा खूप रखडला. शेवटी १९७४ साली कसाबसा रीलीज झाला. या सिनेमात ’कहीं करती होगी वो मेरा इंतजार’ हे मुकेशने गायलेलं गीत त्याचावर चित्रीत होतं. (पंचमने या गीताची चाल अमेरीकन गायक हेर्ब एल्पर्ट च्या ’द लोनली बुल’ या १९६२ सालच्या अल्बम वरून घेतली आहे.)
==========
हे देखील वाचा : … आणि अक्षयला मिळालं ‘कुमार’ हे आडनाव
==========
मुकेश आणि आर. डी. बर्मन हे कॉंम्बिनेशन १९७० साली कटी पतंग, धरम करम, मुक्ती या सिनेमात दिसले असले तरी फार अभावानेच ते दोघे एकत्र आले. त्यामुळे या गाण्याचे महत्व आहे. विश्वजित (Hero Vishwajit) आणि मुकेश या दोघांचे हे एकमेव गाजलेलं गीत! आज चाळीस वर्षानंतर ’फिर कब मिलोगी?’ हा सिनेमा कुणाला आठवणारही नाही. पण, हे गाणेच त्या सिनेमाची एकमेव आठवण राहीली आहे. हा सिनेमा विश्वजितच्या (Hero Vishwajit) नायक पदाची अखेर करणारा चित्रपट ठरला कारण या नंतर १९७५ साली त्याने ’कहते है मुझको राजा’ या सिनेमाचे दिग्दर्शन करून हात पोळून घेतले.