
‘बागबान‘ सिनेमाकरीता बी आर चोप्रा यांना Dilip Kumar हवा होता!
भारतीय सिनेमातील महान चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बी आर चोप्रा यांनी 2003 साली ‘बागबान’ हा चित्रपट निर्माण केला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन बी आर चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. फार वर्षांपूर्वी पन्नास च्या दशकात ‘ऊन पाऊस’ हा मराठी चित्रपट आला होता. ‘बागवान’ हा चित्रपट याच कथानकावर होता. अर्थात ऊन पाऊस चित्रपट देखील १९३७ सालच्या देखील Make Way for Tomorrow या हॉलीवुड सिनेमावरून घेतला होता. मध्यंतरी स्मिता तळवळकर यांनी ‘तू तिथे मी’ हा चित्रपट निर्माण केला होता याची स्टोरी लाईन देखील हीच होती. (राजेश खन्नाच्या ‘अवतार’ या सिनेमात हाच प्रश्न हाताळला होता) पण या सिनेमाचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांनी या सिनेमाची आयडिया आपल्या वडिलांना नॉर्वे मधील एका प्रवासा दरम्यान सुचली असे सांगतात.

एकदा बी आर चोप्रा नॉर्वे येथे तेथील साईट सिंइंग करत असताना त्यांना एक मोठी इमारत दिसली. ते सहज आत गेले तर तिथे आत अनेक वृद्ध लोक राहत असलेले दिसले. त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी विचारले आपण सर्वजण येथे काय करता? तेव्हा ते सर्व म्हणाले की आम्ही इथे या ओल्ड एज होम मध्ये राहतो. तिथे खूप चांगल्या सुविधा होत्या. बी आर यांनी तिथल्या वृद्धांना विचारलं,” तुम्ही इथे आनंदी आहात ना?” त्यावर तेथील एक वृध्द गृहस्थ म्हणाले,” इथे आम्हाला खूप चांगल्या सुविधा आहेत पण हे आमचे घर नाही. आमची मुले इथे नसतात. इथे सोयी सुविधा खूप आहेत. पण सुख नाही. या वयात खरं सुख आपल्या कुटुंबीया सोबतच असते!” त्यांच्याशी वार्तालाप होत असतानाच बी आर चोप्रा यांना ‘बागबान’ या सिनेमाची आयडिया सुचली. ही घटना सत्तर च्या दशकाच्या सुरुवातीची होती. त्यावेळी त्यांचा ‘जमीर’ हा चित्रपट फ्लोअर वर होता.

‘जमीर’ हा चित्रपट बी आर चोप्रा यांचे चिरंजीव रवी चोप्रा दिग्दर्शित करीत होते. दिग्दर्शनातील त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. ‘जमीर’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, शम्मी कपूर, सायरा बानू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा एक बिग बजेट सिनेमा होता. आपले वडील आणि काका (यश चोप्रा) दोघेही मोठे दिग्दर्शक असल्याने एक नैसर्गिक दबाव त्यांच्यावर होता पण त्यांनी पहिल्याच प्रयत्ना त चांगले यश मिळवले. भले हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला नाही. पण रवी चोप्रा यांचे दिग्दर्शन प्रेक्षकांना आवडले. या सिनेमात एका मोठ्या गार्डनमध्ये काही शॉटस घ्यायचे होते. पण रवी चोप्रा यांना लोकेशन मिळत नव्हते. म्हणून त्यांनी दिलीप कुमार यांच्या पाली हिल येथील बंगल्यात असलेल्या गार्डन मध्ये शूट करायचे ठरवले. रवी चोप्रा यांचे दिग्दर्शन दिलीप कुमार दुरून पाहत होते त्यांना देखील ते खूप आवडले. बी आर चोप्रा यांनी त्याच वेळेस दिलीपकुमार यांना ‘बागबान’ या चित्रपटाची स्टोरी ऐकवली. दिलीप कुमार खूष झाले आणि त्यांनी या चित्रपटात काम करायला होकार दिला. पण त्यावेळी ते ‘बैराग’ या चित्रपटात काम करत होते. नंतर काही कारणाने हा चित्रपट लांबत गेला.
================================
हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..
================================
पुढे दिलीप कुमार चरित्र अभिनेत्याच्या भूमिकांमध्ये शिरले. रवि चोप्रा यांनी दिलीपकुमारला घेऊन १९८३ साली ‘मजदूर’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले. (हा ‘मजदूर’ चित्रपट बी आर यांच्याच ‘नया दौर’ चा रि मेक होता.) ऐंशी च्या दशकाच्या उत्तरार्धात बी आर चोप्रा यांनी महाभारत हि महा मालिका दूरदर्शनसाठी निर्माण केली. त्यामुळे ‘बागबान’ हा चित्रपट बनणे लांबत गेले. शेवटी २००३ साली फायनली या चित्रपटावर काम सुरू झाले. दिग्दर्शन रवी चोप्रा करणार होते ते दिलीप कुमार यांच्याकडे गेले आणि 30-35 वर्षांपूर्वीच आठवण त्यांना सांगितली. पण दिलीपकुमार म्हणाले ,” आता मला शक्य नाही मी चित्रपटात काम करणे थांबवले आहे!” नंतर रवी चोप्रा यांनी या सिनेमा दिलीप कुमारच्या ऐवजी अमिताभ बच्चन यांची निवड केली.