
Fussclass Dabhade :OTTवर धुमाकूळ; थिएटरमध्येही पूर्ण केलं अर्धशतक
मराठी चित्रपट काही हटके कंटेन्ट देत नाहीत किंवा मराठी चित्रपट इतर भाषिक चित्रपटांची कॉपी करतात अशी तक्रार वारंवार केल जाते. पण या सगळ्यांना मागे टाकत ‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade) या चित्रपटाने प्रेक्षकांना एक नवी मेजवानी दिली आहे. मराठी मातीतल्या कुटुंबाची साधी-सोप्पी कथा सांगणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाला महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अॅमेझॉन प्राईम या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला युएई – जीसीसी प्रदेश, युके या देशांमधून प्रचंड प्रेम मिळालं आहे. (Marathi films)
कुटुंबातील नातेसंबंध, सामाजिक संदर्भ, मजेशीर संवाद आणि प्रसंग या सगळ्यांवर हसत खेळत भाष्य करणारा ‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade) हा एक परिपूर्ण कौटुंबिक चित्रपट ठरला आहे. २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे ‘हा चित्रपट अॅमेझोनवर (Amazon prime) प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात संपूर्ण भारतात बघितल्या जाणाऱ्या पहिल्या तीन चित्रपटांमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे ओटीटीवर प्रदर्शित झाला असूनही हा चित्रपट मोठ्या संख्येने थिएटरमध्येही पाहिला जात आहे. (Marathi films ott release)

मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या अभूतपुर्व यशामुळे अशा कलाकृती अधिक याव्या आणि प्रेक्षकांनीही मराठी चित्रपटांना उत्सफुर्त प्रतिसाद द्यावा अशीच आशा आहे. दरम्यान, चित्रपटाला मिळालेल्या यशावर दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) म्हणतात, “खूप आनंद वाटतोय की आपल्या मातीतला ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटगृहात सलग पन्नास दिवस पूर्ण करतोय आणि ओटीटी वर देखील अव्वल ठरतोय. मुळात ही कथा तुमच्या आमच्या घरातली असल्याने ती प्रेक्षकांना विशेष भावतेय. प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यामुळेच असेच नवनवीन विषय प्रेक्षकांपुढे आणण्याची उर्जा देखील मिळते. ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ नंतर ‘फसक्लास दाभाडे’ देखील चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण करतोय. आजवर मराठी प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.”(Fussclass Dabhade)
=============
हे देखील वाचा : हेमंत ढोमे: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुगुणी कलावंत
=============
‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटात तीन खट्याळ भावंडांची कथा पाहायला मिळते. क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका साकारली असून त्यांच्यासोबत Nivedita Saraf, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade)चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत.