दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
पानशेतच्या महापूरात वाचलेलं गदिमांच अजरामर गीत!
मराठीतील आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते महाकवी ग दि माडगूळकर यांची जन्मशताब्दी उलटून तीन चार वर्षे झालीत. त्यांचे यथोचित स्मारक पुण्यात करायचे हे मागच्या चाळीस वर्षापासून पुणेकर ऐकत आहेत. स्मारक पुण्यामध्ये कधी होईल ते ब्रह्मदेवाला माहीत! परंतु गदिमा यांच्या विषयीचे अनेक आठवणी आणि किस्से आज देखील अनेक कार्यक्रमांमधून सांगितले जातात. गदिमांना आपल्यातून जाऊन चाळीस-पन्नास वर्षाचा कालावधी होत असला तरी त्यांच्या शब्दांची जादू आजही अबाधित आहे. सध्या पुणे विविध भारती या आकाशवाणी केंद्रावर सध्या रोज सकाळी साडेआठ वाजता गदिमांच्या गाण्यांचा सुंदर कार्यक्रम सादर होत असतो या कार्यक्रमातून गाण्यांच्या सोबतच अनेक किस्से देखील सांगितले जातात. त्यातील एक किस्सा गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी तयार केलेल्या गदिमा वरील वेबसाईटवरून घेतला आहे. अतिशय मनोरंजक असा हा किस्सा आहे.(Ajramar Geet)
काही गाण्याचं अगदी भाग्य असतं. देव तारी त्याला कोण मारी असा प्रत्यय गदीमांच्या एका गाण्याबाबत आला होता. १२ जुलै १९६१ या दिवशी पुण्यात पानशेत धरण फुटल्याने मोठा हाहाकार माजला होता. गदिमांचे एक मित्र बाळ चितळे मुठा नदीच्या काठी सदाशिव पेठेत राहत होते, त्यांचे घर देखील पाण्याखाली गेले होते, पण स्वतःच्या होणार्या नुकसानी पेक्षा त्यांना चिंता लागली होती ती गदिमांच्या एका हस्तलिखिताची. तेव्हा गदिमांनी नुकतेच ‘वरदक्षिणा’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व गाणी लिहून त्यांच्याकडे दिली होती. पुराच्या तडाख्यात ती घरातच राहून गेली होती, त्याकाळी झेरॉक्स वगैरे प्रकार नव्हते त्यामुळे ती एकमेव प्रत होती, व तिचे काय झाले असेल याची चिंता त्यांना लागून राहीली होती. पुढे काही तासांनी पाणी उतरण्यास सुरवात झाली, पुण्यात झालेल्या हानीचे चित्र सगळीकडे दिसतच होते, काळजीत पडलेले बाळ चितळे आपल्या घरी येऊन पोहोचले, घराचे दार उघडले, घरात सर्वत्र चिखलच चिखल साचला होता, सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. भिंतीवर २-३ फुटांपर्यंत पाणी चढल्याच्या खुणा होत्या त्यांना वाटले गेले ते स्क्रिप्ट आणि गेली ती गाणी पुरात वाहून! धडधडत्या हृदयाने चितळे आतल्या खोलीत पोहचले, पण काय आश्चर्य समोरच्या टेबलावर गदिमांचे स्क्रिप्ट जसेच्या तसे पडले होते, कोरडेच्या कोरडे, पाण्याचा एकही थेंब त्यावर पडला नव्हता! कोरडे ठक्क!(Ajramar Geet)
गंमत अशी झाली की, जसेजसे पाणी वाढू लागले तसे तसे ते लाकडी टेबल पाण्यावर तरंगू लागले, पाणी जसे वाढे तसे पाण्याबरोबर ते टेबल वर तरंगत गेले व छताला टेकले! पाणी उतरताच त्याबरोबर खाली आले व गदिमांचे स्क्रिप्ट जसेच्या तसे तिथेच राहीले! बाळ चितळे धावत धावत टेबलाजवळ गेले, स्क्रिप्ट चाळू लागले व समोरच गदिमांच्या सुंदर हस्ताक्षरातील गाणे लिहिलेले होते ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा…’ आता बाळ चितळे यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या! गदिमा यांचे स्क्रिप्ट आणि गाणी महापुरात वाचले होते. दिनकर द पाटील दिग्दर्शित या सिनेमाचे मग चित्रीकरण सुरु झाले. रमेश देव आणि सीमा यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात शालिनी सिनेटोन येथे झाले.(Ajramar Geet)
=====
हे देखील वाचा : व. पु. च्या कथेवर बनलेला ’मुंबईचा जावई’आजही लोकप्रिय!
=====
पुढे ‘वरदक्षिणा’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला, हुंडा देणे-घेणे या अनिष्ठ प्रथेवर हल्ला करणारा हा एक सामाजिक चित्रपट होता. ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा…’,’ एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात…’ ‘झाली गं बरसात फुलांची’, ‘पाठ शिवा हो पाठ शिवा’,बाळ तुझे नवसाचे यशोदे’,‘शोध शोधता तुला’ सारखी अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. हिंदी चित्रपटातील ख्यातनाम गायक मन्नाडे यांनी ‘घन घन माला नभी दाटल्या’ हे गाणे (Ajramar Geet) आपल्या गायकीने अमर करुन टाकले होते. या गाण्यासाठी त्याला अनुकूल असलेला मल्हार राग वापरला होता. अभिनेते विष्णूपंत जोगांवर चित्रित झालेलं हे गाणं वसंत पवारांनी स्वरबध्द केलं होतं. संत तुकारामांचे अभंग जसे पाण्यातून तरंगत वर आले तसाच काहीसा प्रकार ग दि माडगूळकर यांच्या वरदक्षिणा या चित्रपटातील गाण्यांच्या बाबत झाला!