सुरांचा वृक्ष… गाणारे रत्न…
छोट्या छोट्या संगीतकाराकडील रफीची लाजवाब गाणी!
३१ जुलै हा जेष्ठ गायक म.रफी यांचा स्मृती दिन. ३१ जुलै १९८० ला त्यांचे निधन झाले. त्याला ही आत्ता ४० वर्षे होताहेत! असं म्हणतात कोणतीही व्यक्ती किती जगली याचे मोजमाप त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर किती वर्षे ती समाजाच्या स्मरणात राहिली यावरून होत असतं.हेच सूत्र कलावंताच्या बाबतीत लावायचं तर आज महंमद रफीच्या स्वराशिवाय कोणतीही सिनेसंगीताची मैफल पुरी होवू शकत नाही.
आकाशवाणी वरील जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमात रफीचा स्वर हा आजही प्रामुख्याने रसिकांच्या पुढे येतो.अगदी रफीच्याच भाषेत सांगायचे तर ’कभी ना कभी कही ना कही कोई ना कोई तो…’ (इथे फक्त आयेगा च्या जागी गायेगा शब्द टाकायचा!). रफी ने गाणी गाताना कधीही भेदाभेद अथवा दुजाभाव केला नाही.आज त्यांचे अशी अनेक गाणी आहेत जी अगदी कमी लोकप्रिय अशा संगीतकारांकडे गायली आहेत. रफीची नौशाद, ओपी, रवि कडची गाणी आपण नेहमीच ऐकतो आज काही अशा गाण्यांची चर्चा करूयात ज्याचे संगीतकार केवळ रफीच्या स्वराने काही काळाकरीता तरी उजळून गेले!
१९६५ साली ’अॅडव्हेंचर ऑफ रॉबिनहूड’ या सिनेमातील जी एस कोहली यांच्या संगीतात गायलेले ’माना मेरे हंसी सनम तू रशक-ए-माहताब है..’हे एक अप्रतिम गीत रफीने गायले होते.याच संगीतकाराकडे ’शिकारी’(१९६५) या चित्रपटात ’चमन के फूल भी तुखको गुलाब कहते है’ या गीताची खुमारी काही औरच होती.१९६४ साली आलेल्या ’चाचाचा’ या सिनेमात (सं.इकबाल कुरेशी) ’सुबहा न आये शाम न आये जिस दिन तेरी याद न आये..” वो हम न थे वो तुम न थे वो रहगुजर थी प्यार की’ हि दोन गाणी रफीने काय नजाकतीने गायली होती!’दिल का सुना साज तराना ढूंढेगा’ हे गाणं विविध भारतीचं लाडकं गाणं आहे हे गीत ’एक नारी दो रूप’(१९७२) या सिनेमाकरीता गणेश यांच्या कडे गायलं होतं.गणेश कडील एक गाणं ’दिल ने प्यार किया था इक बेवफासे,दिल हमारा था हमने हारा था’(शरारत-१९७३) जाणकारांना आजही आठवतं.
अशीच काही अप्रतिम गाणी जी रफीने फारश्या प्रकाशात न आलेल्या संगीतकारांकडे गायली ते योगदान पहा.ये रात ये फिजाये फिर आये या न आये आओ शमा बुझाके (बटवारा-एस मदन-१९६१),अगर बेवफा तुझको पहचान जाते खुदा की कसम हम मुहोब्बत न करते(रात के अंधेरे में-प्रेम धवन-१९६९), ढलती जाये रात सुनले दिलकी बात शम्मा परवानेके का न होगा फिर साथ(रजिया सुल्तान-लच्छीराम-१९६१),आंखो पे भरोसा मत कर दुनिया जादू का खेल है (डिटेक्टीव्ह-मुकुल रॉय-१९५८) भुला नही जी भुला नही देना जमाना खराब है (बारादरी-नाशाद-१९५५) नव कल्पना नव रूपसे (मृगतृष्णा-शंभू सेन-१९७५) अपनी आंखोमे बसाकर कोइ इकरार करूं (ठोकर-श्यामजी घनश्यामजी-१९७४) कुहू कुहू बोले कोयलीया (स्वर्ण सुंदरी-आदी नारायण राव-१९५८), तुम तो प्यार हो सजना,ज जा जारे तुझे हम जान गये, तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये (सेहरा-रामलाल-१९६३)हि यादी खूप मोठी व न संपणारी आहे.
हि गाणी गाताना रफीने बर्याचदा एक छदाम देखील घेतला नाही! रफीच्या या काहीश्या अप्रसिध्द पण गुणी संगीतकाराकडील स्वर कर्तृत्वावर खूप लिहिता येईल पण आज रफीच्या स्मृतीच्या निमित्ताने त्याच्या या ’रेयर जेम्स ’ ची वाचकांना सुरीली आठवण करून द्यायचा प्रयत्न!