मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
‘घायल’ व ‘दिल’ एकाच दिवशी प्रदर्शित व सुपर हिट
माझं कायमच असं म्हणणं असते नि आहे, नवीन चित्रपटाचा शुक्रवारचा फर्स्ट डे फर्स्ट शोचा “पब्लिक रिपोर्ट” हाच त्या चित्रपटाचे व्यावसायिक यशापयशाचे चित्र स्पष्ट करतो….जे काय ते रसिकांना ठरवूद्यात. २२ जून १९९० या शुक्रवारी एकाच वेळेस प्रदर्शित झालेले धर्मेंद्र निर्मित व राजकुमार संतोषी लिखित व दिग्दर्शित “घायल” आणि इन्द्रकुमार दिग्दर्शित “दिल” सुपरहिट ठरतील असे कोणीही फिल्मी भविष्य वर्तवले नव्हते. (Ghayal and Dil)
मुंबईत “घायल”चे मेन थिएटर मेट्रो तर “दिल”चे नाॅव्हेल्टी होते. पावसाळा नुकताच सुरु झाला होता. शाळा काॅलेजही सुरु झाली होती. रेडिओ प्रोग्राम, रस्ते, बसच्या मागे, रेल्वे स्टेशनवर दोन्ही चित्रपटांची पोस्टर लागली, सगळीकडे होर्डींग्स लागली, मुद्रित माध्यमातून या दोन्ही चित्रपटांचे फोटो, बातम्या, कथानके प्रसिद्ध होत होते (“दिसला सिनेपत्रकार दे मुलाखत” असा आजच्यासारखा सुकाळ नव्हता. चित्रपट पाहिल्यावर आम्ही सिनेपत्रकार मुलाखत घेत असू म्हणून चित्रपट रसिकांपर्यंत पोहचत असे. आणि तेच योग्य होते.) ‘दिल’ची गाणी लोकप्रिय होत होती. ‘घायल’चे सनी देओलचे ॲक्शनबाज पोस्टर लक्षवेधक होते. (Ghayal and Dil)
सनी देओलचे डकैत, मंझिल मंझिल, जबरदस्त, सवेरेवाली गाडी, सनी हे चित्रपट फ्लाॅप झाल्याने त्याच्या भवितव्याबाबत शंका निर्माण झाली होती. चित्रपटाच्या जगात “यश हेच एकमेव चलनी नाणे” हा अलिखित नियम असल्यानेच सनीला “एक हिट पिक्चर हवा होता”. आमिर खानही लव्ह लव्ह लव्ह, दीवाना मुझसा नही, अव्वल नंबर अशाच फ्लाॅपच्या गर्तेत होता. (त्या काळातील त्याचे बरेचसे चित्रपट त्याने का स्वीकारले हा प्रश्नच आहे. उदा. जवानी झिंदाबाद वगैरे)
‘घायल’ व ‘दिल’ या दोन्ही चित्रपटांना आगाऊ तिकीट विक्रीला फारसा प्रतिसादही नव्हता. हे जरा चिंतेचे असते. प्रेक्षकांकडून चित्रपटाचे थंड स्वागत होतेय की काय अशी चिंता. (ते दिवसच वेगळे होते. सगळा खेळ प्रेक्षकांभोवती असे.) मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी इराॅस थिएटरमधील मिनी थिएटरमध्ये “घायल”चा प्रेस शो आयोजित करण्यात आला होता. राजकुमार संतोषी हा गोविंद निहलानी यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक होता आणि आता त्याचा हा स्वतंत्रपणे दिग्दर्शनातील पहिला चित्रपट. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्याने त्याचाच विचार करत चित्रपट पाह्यचा असतो ही स्वाभाविक गोष्ट. ‘घायल’ची मांडणी व बांधणीने असे काही गुंतवून ठेवले की (चांगल्या चित्रपटाचे हे एक लक्षण) मध्यंतर कधी झाले हे समजलेच नाही. (येथे उत्तम संकलक व दिग्दर्शक असे दोन्ही दिसतात.)
मध्यंतरमध्ये समोसा, सॅण्डविच खात असतानाच चित्रपटाच्या पीआरओ अजित घोषने हळूच कानात सांगितले, चित्रपट संपल्यावर मागच्याच त्री स्टार हाॅटेलमध्ये सनी देओल काही निवडक सिनेपत्रकारांना भेटणार आहे. तू थांब…… मिडियात असल्यानेच असे अनेक भन्नाट योग येत असतात याचे मला कायमच भान असतेच. सनी जास्त बोलत नाही, मोजक्या शब्दात आपली मते व्यक्त करतो हे अनुभवायला मिळाले (त्याच्यासोबत फोटो ही काढता आला), राजकुमार संतोषीने म्हटले, आपण मनोरंजक चित्रपटाची चौकट कायम ठेवूनच त्यात काही वेगळा टर्न आणि ट्विस्ट देवूया असे धर्मेंद्रला पटवून देण्यात यशस्वी ठरल्यावर पटकथेवर भरपूर काम केले आणि हा चित्रपट पडद्यावर आला. (Ghayal and Dil)
=========
हे देखील वाचा : चक्क दोन मध्यंतर रसिकांना आवडली
=========
संतोषीच्या बोलण्याचा सकारात्मक प्रत्यय राजन कोठारीचे छायाचित्रण आणि व्ही. एन. मयेकर यांच्या संकलनात दिसले. मयेकर यांनी चित्रपटातील नाट्य अधिकाधिक खुलेल अशी कैची चालवत गती दिली. संकलन म्हणजे काय यासाठी हा चित्रपट आदर्श ठरावा. ‘घायल’ला रसिकांचा प्रतिसाद हळूहळू वाढत गेला. चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी या चित्रपटाची वृत्तपत्र प्रसिद्धीचे काम पाहत असलेल्या बाॅम्बे पब्लिसिटी सर्विस ( BPS) च्या गिरगावातील प्रार्थना समाज येथील कार्यालयात गेलो असता वसंत साठेसाहेब मला म्हणाले, “घायल” पब्लिक रिपोर्ट फॅन्टॅस्टीक! पिक्चर लोक डोक्यावर घेताहेत. हिट होतोय. (वसंत साठे हे अतिशय अनुभवी व अभ्यासू पब्लिसिस्ट व पटकथालेखक होते. चित्रपट व्यवसायाशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली. काँग्रेस नेते वसंत साठे पूर्णपणे वेगळे हे आजच्या डिजिटल मिडियात कळकळीने सांगावे लागतेय. या दोन भिन्न व्यक्ती आहेत. )
“दिल” रिलीज झाला आणि त्याची गाणी आवडल्याने ध्वनिफीतीची विक्री वेगाने वाढत वाढत गेली. कुठेही जावे तर ‘दिल’ची गाणी कानावर पडत. अगदी रिक्षात बसलो तरी तेच. गाण्याच्या भन्नाट लोकप्रियतेवर पिक्चर हाऊसफुल्ल गर्दीत चालू लागला. मुझे नींद ना आये, हम प्यार करनेवाले, खंबे जैसी खडी हो, ओ प्रिया प्रिया, हमने घर छोडा है…. गाणी एन्जाॅय करायला पब्लिक पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जावू लागले. गीत संगीत नृत्य आपल्या चित्रपट संस्कृतीची जानच आहे म्हणा.
=======
हे देखील वाचा : हसता हसता “बीवी नंबर वन”ला २५ वर्ष झाली देखिल…
=======
अशातच एके दिवशी निरोप आला, ‘दिल’मध्ये आणखीन एक गाणे समाविष्ट करण्यात येत असून शूटिंग रिपोर्टींगसाठी सेटवर ये….. अवघ्या दोन दिवसात आणि डबल शिफ्टमध्ये आमिर व माधुरीवर दम दमा दम गाण्याचे शूटिंग करुन, ते एडिट करुन आठवडाभरात पिक्चरमध्ये आले देखिल आणि नवीन आकर्षण अशी त्याची जाहिरात करण्यात आली. दोन्ही चित्रपट एकदम जोरात असतानाच ‘घायल’मधील इन्स्पेक्टर शर्मा ही भूमिका साकारलेल्या दीप धिल्लाॅनची मुलाखत केली.
काही वर्षानी हे दोन्ही सुपरहिट चित्रपट रिपीट रनला, मनोरंजन उपग्रह वाहिनीवर पुन्हा पुन्हा एन्जाॅय केले गेले. रसिकांच्या किमान तीन पिढीसोबत हे चित्रपट आजही लोकप्रिय आहेत तर मग आणखीन काय हवे? आपण कोणता चित्रपट डोक्यावर घ्यायचा याचा निर्णय प्रेक्षक असा काही घेतात की तो चित्रपट कायमच पडद्यावर राहतो. ‘घायल’ व ‘दिल’ (Ghayal and Dil) असेच. अशी सुपरहिट शुक्रवारची गोष्ट हवीहवीशी.