‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने शिकवला सुखाचा नवा अर्थ…. गिरिजा प्रभू
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर त्याची असंख्य उत्तरं आपल्याला मिळतील. प्रत्येकाची आपली अशी सुखाची व्याख्या असते. कुणासाठी पैसे म्हणजे सुख, कुणासाठी समाधान म्हणजे सुख तर कुणासाठी जगण्यातला आनंद म्हणजे सुख. सुखाची हीच परिभाषा स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून उलगडण्यात येईल. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजन्सची असून अभिनेत्री गिरीजी प्रभू या मालिकेत गौरी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. याच निमित्ताने गिरिजा प्रभूशी साधलेला हा खास संवाद
गिरिजा या मालिकेतल्या तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशिल?
मी गौरी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. अत्यंत साधी आणि सर्वांवर प्रेम करणारी अशी ही मुलगी आहे. गौरी कधीच कुठल्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करत नाही. प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे त्याग असं तिला वाटतं. अश्या या भोळ्या गौरीच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे या मालिकेच्या रुपात उलगडत जातील.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं वेगळेपण काय सांगशिल?
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका एक कौटुंबिक मालिका आहे. कोल्हापूरात घडणारी ही गोष्ट आहे. सर्वसामान्य आयुष्यात आपलं सुख आपण कसं शोधत जातो तेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खूप सुंदररित्या मांडण्यात आलं आहे.’
या मालिकेत वर्षा उसगावकर एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला वर्षाताईंसोबत काम करण्याची संधी मिळते आहे. स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सने दिलेल्या या संधीबद्दल मी कायम ऋणी राहिन. माझे सर्वच सहकलाकार आणि आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. मालिकेतलं गौरी हे पात्र साकारताना मला याचा खूप फायदा होतो आहे. मुख्य भूमिका असलेली ही माझी पहिलीच मालिका आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे.
अल्पावधीतच या मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे त्याविषयी…
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं शीर्षकगीत गुणगुणत रहावं असंच आहे. श्रीरंग गोडबोलेंचे शब्द, पंकज पडघन यांचं संगीत आणि कार्तिकी गायकवाडच्या सुरांनी या गाण्याला साज चढवला आहे. या गाण्यावर अनेक चाहत्यांनी व्हिडिओही बनवले आहेत. लग्नाच्या प्रीवेडिंग फोटोशूटसाठीही या गाण्याला पसंती मिळतेय. सुख म्हणजे नक्की काय असतं याची अनुभूती मी शीर्षकगीतापासूनच घेतेय. मालिकेचे प्रोमो आणि शीर्षकगीताला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे त्यामुळे मालिकेलाही असाच प्रतिसाद देतील याची मला आशा आहे. त्यासाठी १७ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता पाहायला विसरु नका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही नवी मालिका फक्त स्टार प्रवाहवर.