Madan Mohan : संगीतकार मदन मोहन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार!

Gopaldas Neeraj : “या” निर्मात्याने गीतकाराला गिफ्ट केली स्वतःची कार !
काही गाण्याचे किस्से खूप मजेदार असतात. एकदा एका गीतकाराने लिहिलेले गाणे निर्मात्याला इतके आवडले की त्याने आपली कार त्या गीतकाराला गिफ्ट म्हणून देवून टाकली!! कोण होता तो गीतकार आणि कोणते होते ते गाणे?
गीतकार होण्यापूर्वी कवी गोपालदास नीरज (Gopaldas Neeraj) कवी संमेलनामध्ये आपल्या रचना सादर करत. त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय होत होत्या. त्या काळात ते उच्च विद्याविभूषित असल्याने त्यांना अलिगढ विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी होती. संपूर्ण भारतभर त्यांच्या कवितांना मोठी डिमांड होती. १९६० साली ते मुंबईला एका कवी संमेलनात आले होते. तिथे त्यांची भेट निर्माता आर चंद्रा (बरसात की रातचे निर्माते) यांच्याशी झाले. ते देखील अलिगढ उत्तर प्रदेशचे. त्यांना नीरज यांच्या कविता खूप आवडायच्या. त्यांनी आपल्या आगामी सिनेमासाठी नीरजला गाणी लिहिण्याची गळ घातली.

तसेच त्यांची त्या काळातील प्रचंड लोकप्रिय असणारी रचना ‘स्वप्न झरे फूल से..’ आपल्या सिनेमात घेण्याची परवानगी मागितली. नीरज तयार झाले. त्यांनी साईन केलेला हा पहिला सिनेमा ‘नई उमर की नई फसल’ निर्मिती अवस्थेत खूपच रेंगाळला. १९६५ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटातील रफीने गायलेल्या ‘स्वप्न झरे फूल से..’ या गाण्याला तर जबरदस्त लोकप्रियता मिळाली होती. भले हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी या गाण्याची लोकप्रियता आज देखील अबाधित आहे. पण या दरम्यानच्या काळात नीरज यांना ‘चा चा चा’ हा सिनेमा मिळाला. यातील ‘सुबहा न आये शाम न आये..’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. नीरज हे मुळात कवी असल्याने गीताकारीचे तंत्र शिकायला वेळ लागला.
१९६८ साली निर्माते राजेंद्र भाटीया चित्रपट बनवत होते ‘कन्यादान’. या चित्रपटात शशी कपूर, आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी नीरज (Gopaldas Neeraj) आणि हसरत जयपुरी यांनी लिहिली होती. संगीत Shankar-Jaikishan यांचे होते. या सिनेमाच्या गाण्याच्या सिटींगच्या वेळी नीरज यांनी आपली एक कविता शंकर जयकिशन यांच्यापैकी शंकर यांना दिली. त्या काळात शंकर जयकिशन हे दोघे वेग वेगळे संगीत देत असत. जरी ते नाव एकत्र वापरत असले तरी संगीत देताना मात्र वेगवेगळे देत असत. शंकर आणि शैलेंद्र यांची विशेष मैत्री असायची.

शैलेंद्र यांचे १९६६ साली निधन झाल्याने ते नवीन गीतकाराच्या शोधात होतेच. तर नीरज यांनी आपली एक कविता शंकर यांना दिली. शंकर यांना ती कविता अजिबात आवडली नाही. ते म्हणाले, ”चित्रपटात अशा रचना चालत नाहीत. हे काय गाणे आहे का?” आणि तो कागद नीरज यांच्याकडे फेकला. नीरज यांना खूप वाईट वाटले नंतर शंकर यांनी एक ट्यून नीरज (Gopaldas Neeraj) यांच्याकडे दिली आणि सांगितलं, ”उद्या यावर गाणे लिहून आणा.” नीरज यांची नाराजी निर्माते राजेंद्र भाटीया यांच्या लक्षात आली. ते म्हणाले, ”ठीक आहे. शंकर यांना तुमचे गाणे आवडले नसले तरी या ट्यूनवर तुम्ही असे गाणे बनवा की शंकर यांना पहिल्या झटक्यात आवडले जाईल! तुमच्यासाठी हे चॅलेंज आहे.” नीरज म्हणाले, ”ठीक आहे. पण तसं झालं तर तुम्ही मला काय देणार?” त्यावर राजेंद्र भाटिया म्हणाले, ”तू मागशील ते.” (Untold stories)
============
हे देखील वाचा : Karan Arjun : मेरे करण अर्जुन आयेंगे, मेरे करण अर्जुन आयेंगे…
============
नीरज ती ट्यून घेऊन घरी गेले. त्यानी ते चॅलेंज स्वीकारले होते. गीतकार म्हणून प्रस्थापित होण्यासाठी इथले कायदे कानून वापरणे गरजेचे होते. रात्री ती ट्यून वारंवार ऐकल्यानंतर चित्रपटातील सिच्युएशननुसार त्यांनी गाणे लिहिले. गाण्याचे बोल होते ‘लिखे जो खत तुझे वो तेरी याद में…’ सकाळी ते स्टुडीओत पोचले. त्यांनी ते गीत राजेंद्र भाटीया यांना दिले आणि सांगितले, ”तुम्हीच हे गीत शंकर यांना द्या.” शंकर वरच्या मजल्यावर होते.
भाटीया ते गीत घेवून वरच्या मजल्यावर गेले. पुढच्या दहा मिनिटात दोघे आनंदात खाली आले. शंकरने नीरज यांना मिठी मारली. म्हणाले, ”हेच तर पाहिजे होते!” नंतर हे गाणे आसावरी रागात तयार झाले. रफीने मस्त गायले. ‘लिखे जो खत तुझे वो तेरी याद में …’ या गाण्याला आणि सिनेमाला अफाट लोकप्रियता लाभली. या सिनेमातील हसरत यांनी लिहिलेली ‘मेरी जिंदगी में आते तो’, ‘पराई हू पराई मेरी आरजू न कर..’ ही गाणी खूप गाजली.
‘लिखे जो खत तुझे वो तेरी याद में …’ या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर निर्माते राजेंद्र भाटीया यांनी नीरजला विचारले, ”आपले ठरल्याप्रमाणे मी तुला काय गिफ्ट देवू?” नीरज (Gopaldas Neeraj) म्हणाले, ”मला तुमची कार हवी आहे!” निर्मात्यांनी क्षणाचा विलंब न करता गाडीची चावी नीरजच्या हातात सोपवली!