पदार्पणातच 3-4 चित्रपट साइन करणारा गोविंदा हा एकमेव कलाकार असेल
मुंबईच्या टॉयलेटमध्ये माझ्या पिक्चरचे पोस्टर लागण्याचे स्वप्न पूर्ण झाले, मी काय सांगू मी किती आनंदात आहे ते?
मी एकाच वेळी तीस, पस्तीस, चाळीस चित्रपटात भूमिका साकारतोय याचाच अर्थ मला तितकी मागणी आहे असा होतो….
जुहूला राहायला आलो असलो तरी माझ्या विरारला मी विसरलो नाही, तिकडच्या वुडलॅण्ड थिएटरमध्ये रांगेत उभे राहून पिक्चरचे तिकीट काढून मी टाळ्या शिट्ट्यांनी थिएटर डोक्यावर घ्यायचो….
धरमजी माझे फेवरीट हीरो. कधी वाटलं नव्हतं की आयुष्यात त्यांची कधी भेट होईल, आज मी त्यांच्यासोबत भूमिका करतोय, त्यांना भेटताक्षणीच मला झालेला आनंद मी लपवू शकलो नाही….
गोविंदा म्हणजे एका ओळीत उत्तरे देता आली पाहिजेत असा जणू स्वतःसाठी नियम घालून घेणारा आणि न चुकता ती अट पाळणारा, आणि सदैव हसतमुख असणारा….
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण गोविंदाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले तेच एकावेळी तीन चार चित्रपट स्वीकारत. त्याच्या मामाचा चित्रपट ‘तनबदन’ (नायिका खुशबू), पहलाज निहलानीचा ‘इल्जाम’ (नीलमसोबत), इस्माईल श्रॉफचा ‘लव्ह 86’ (नीलमच) अशा त्याच्या तीन तीन चित्रपटाचे एकाच वेळेस शूटिंग सुरु झाले आणि अर्थातच गोविंदा भेटीचे योग येत राहिले. तेव्हा त्याची उत्तरे ही अशीच, बैठक मारून लंबी मुलाखत देण्याची त्याला तशी हौस मौज नाही असे लक्षात आले.
सेटवर भटकंती करण्यात विशेष रस असलेल्या त्या काळातील आम्हा सिनेपत्रकारांना असे छान गप्पा करणारे स्टार जवळचे वाटत. त्यात चीची (गोविंदाचे टोपण नाव) ची खासियत म्हणजे चांगले मराठी बोलणार आणि भेटता क्षणीच बोलायला लागणार. मात्र ते बोलणं सुद्धा टू द पॉईंट असणार.
पण महत्वाचा प्रश्न तो भेटणार कधी आणि कुठे?
चीची एकाच वेळेस अक्षरशः अनेक चित्रपटांत भूमिका साकारू लागला. काही साप्ताहिके/मासिके यांनी या गोष्टीची कव्हर स्टोरी केली. कारण त्यातून त्याची क्षमता आणि धावपळ दिसत होती. त्यातूनच चीची म्हणजे ‘गरीब निर्मात्यांचा मिथुन चक्रवर्ती’ अशी नवीन व्याख्या जन्माला आली (तर मिथुन चक्रवर्ती गरीब निर्मात्यांचा अमिताभ बच्चन… ज्याचा भाव परवडेल त्याला साईन करा). त्या दिवसांत पूजा अर्चा करुन चीची सेटवर यायचा तो दुसरीकडे जाण्यासाठी! काही समजलं का? समजा तो मेहबूब स्टुडिओत ‘खुदगर्ज’च्या सेटवर आला असेल तर तीन तासात काही दृश्ये चित्रीत होताच तो नटराज स्टुडिओसाठी निघे. तेथून कदाचित त्याला रात्री फिल्मालय स्टुडिओत ‘स्वर्ग’चे पुन्हा तीन तासाचे शूटिंग असेल….
त्या काळात आम्हा सिनेपत्रकारांना याची सवय लागली. जसा स्टार तसेच आपण असावे हा अलिखित नियम पाळता येत असेल तर आणि तरच सिनेपत्रकारीतेत या हा अनुभवाचा सल्ला देतो.
चीचीच्या एका चित्रपटाच्या सेटवर आणखीन काही निर्माते हमखास दिसत. एकेकाळी राजेश खन्नाला साईन करायला असे निर्माते चक्क बॅग घेऊन येत असे बरेच किस्से प्रसिध्द आहेत. पण चीचीने तर अगोदरच भरपूर चित्रपट साईन केलेत तरी हे निर्माते का? कारण त्याने आपल्या चित्रपटासाठी तारखा द्याव्यात, वेळ द्यावा यासाठी असत.
मेहबूब स्टुडिओत मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’च्या जंगी मुहूर्ताच्या दृश्यात अमिताभ, रजनीकांत आणि गोविंदा असे तीन स्टार बघून महामनोरंजक चित्रपट निर्माण होईल याची खात्री वाटली. पण वक्तशीर अमिताभ आणि लेट लतिफ चीची यांचे कसे जमणार अशी उगीचच शंका आली. चीचीसाठी ही खूप मोठी संधी असली तरी त्याला इतरही अनेक लहान मोठे चित्रपट पूर्ण करायचेत ( ते तो या सगळ्यातून करायचा हे जास्त महत्वाचे) आणि त्यात ‘हम’ ही पूर्ण झालाच.
या ‘हम’च्या शूटिंगच्या वेळी काय घडले याचे उत्तर डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या वेळी मिळणे शक्य नव्हतेच. अमिताभचा तो पडता काळ होता आणि चीची जोरात होता.
पण त्याचे उत्तर विपुल शहा दिग्दर्शित ‘आंखे’ च्या वेळी मिळाले. या चित्रपटात गोविंदा नको असे बीग बीनी सुचवले म्हणून परेश रावलची निवड झाली यावर काही गॉसीप्स झालेच….
काही का असेना, आपल्या डान्सच्या जोरावर चीचीने बरीच मजल मारली, आणि त्याचा त्या काळात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हुकमी प्रेक्षकवर्ग होताच. तो प्रेक्षक त्याचे चित्रपट डोक्यावर घेई.
पहिल्या भेटीत ‘टू द पॉईंट’ भेटलेला चीची मग अनेकदा तसाच भेटत राहिला आणि मग तशा भेटीची सवयच लागली.
छोट्या छोट्या भेटी दीर्घकालीन वाटचालीसाठी चांगल्या असतात म्हणूया….