ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
अभिनय सम्राट दिलीपकुमार यांची कृतज्ञता!
अभिनय सम्राट दिलीपकुमार यांच्या अभिनयात रंगलेल्या कितीतरी भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. अभिनय सम्राट,अभिनयाचे गिरीशंकर,अभिनयातला शेवटचा शब्द अशा विविध बिरूदावल्या त्यांना लाभल्या . तराना,देवदास,फूटपाथ,संगदिल ,दिदार ,आरजू अशा सुरुवातीच्या चित्रपटातून भग्न हृदयाचा /वैफल्यग्रस्त प्रेमी रंगवून त्याने ‘शोकात्म भूमिकांचा राजा ‘ ही रसिकांकडून पदवी हासील केली. एकाहून एक सरस दर्दभऱ्या भूमिकातून तो दुःखी मनाला ‘मीठा दर्द’ देत होता. त्यांचा तो कालखंड देखील असाधरण असा होता. इंग्रजी साहित्य /सिनेमा यामुळे भारतात देखील रसिक प्रेक्षकांची ‘टेस्ट’ कलात्मक दृष्टीने बदलत होती. शहरी उच्च शिक्षित वर्ग नकळतपणे येणाऱ्या पश्चिमेकडील सांस्कृतिक वातावरणाशी एकरूप होवू लागला होता. उच्च श्रेणीची सांस्कृतिक भूक हवीहवीशी वाटत होती. त्यामुळेच कलकत्यात न्यू थिएटर मधील शरतचंद्र, रवींद्रनाथांच्या साहित्याचा अंतर्भाव असो,बॉम्बे टॉकीज मधील सामाजिक आशय असो वा प्रभात मधील सामाजिक भानासोबतच असलेला नवतेचा ध्यास असो हे त्याचेच द्योतक होते. त्यांचा रूपेरी पडद्यावरील प्रवेश अनपेक्षितपणे झाला. बॉम्बे टॉकीजच्या देविकारानी ने स्वत: त्यांना अभिनयाबाबत विचारले. प्रभावी व्यक्तीमत्वाचा युसुफ सुरुवातीला खूप लाजाळू होते. सिनेमासाठी त्यांनी वेगळे नाव घ्यावे, असे देविकारानीने सुचविले. त्यावेळी बॉम्बे टॉकीज मधील पंडीत नरेंद्र शर्मा यांनी ‘वासुदेव’ ‘जहांगीर’ आणि ‘दिलीपकुमार'(Dilip Kumar) हे तीन नावांचे पर्याय त्याच्यापुढे ठेवले. देविकारानीचा आग्रह ‘दिलीपकुमार’ या नावाशी होता, कारण हे नाव अशोककुमार या नावाशी साधर्म्य साधणारे होते.अशा प्रकारे दिलीपचे फिल्मी बारसे पार पडले. त्याचा पहिला सिनेमा ‘ज्वार भाटा’ २६ नोव्हेंबर १९४४ रोजी प्रदर्शित झाला,आणि फ्लॉप ही झाला. त्या वेळच्या परखड सिनेमा मासिक ‘फिल्म इंडिया’ च्या बाबूराव पटेल यांनी दिलीपच्या अभिनयावर जहरी टीका केली होती.दिलीपने अंतर्मुख होवून आत्मपरीक्षण केले. याच काळातील दिलीपच्या एका परिस्थितीवरील हा किस्सा आहे. दिलीपकुमार अभिनेता म्हणून जितके श्रेष्ठ होते तितकेच श्रेष्ठ एक व्यक्ती म्हणून देखील होते याचा प्रत्यय यातून आपल्याला येईल.
बीसीसीआयचे माजी सेक्रेटरी जयवंत लेले यांनी एक भावस्पर्शी आठवण एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. साधारणता सत्तरच्या दशकात ज्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष पी एम रुंगटा होते त्यावेळी एकदा दिलीप कुमार आणि सायरा बानू त्यांना भेटायला आले होते त्या वेळचा हा किस्सा आहे. योगायोगाने तिथे जयवंत लेले देखील उपस्थित होते. दिलीपकुमार (Dilip Kumar)त्या वेळी स्टार होता. एक प्रस्थापित अभिनेता म्हणून त्याला लोकमान्यता मिळाली होती. सायरा बानो देखील तेंव्हा आघाडीचे अभिनेत्री होती. हे दोघे आल्यानंतर सहाजिकच बीसीसीआयच्या कार्यालयात लगबग वाढली. ज्यावेळी दिलीप कुमार रुंगटा यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी रुंगटा साहेब स्वागतासाठी उठून उभे राहिले. दिलीप कुमार यांनी त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला पण नंतर त्यांना चक्क वाकून नमस्कार केला! दोघांच्या गप्पा टप्पा झाल्या चहापान झाले. त्यानंतर दिलीप कुमार (Dilip Kumar)आणि सायरा बांधून निघून गेले.
======
हे देखील वाचा : शाहरुख खानने ‘हा’ चित्रपट अजुन पाहिलेला नाही…
======
हा सर्व प्रकार जयवंत लेले मोठ्या उत्सुकतेने पाहत होते. दिलीप कुमार गेल्यानंतर जयवंत लेले रुंगठा साहेबांकडे गेले आणि त्यांना त्यांनी विचारले,” सर, दिलीप कुमार(Dilip Kumar) एक प्रस्थापित अभिनेते आहेत.मोठे स्टार आहेत आणि मुख्य म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने अधिक आहेत. असे असतानाही त्यांनी तुम्हाला वाकून साष्टांग नमस्कार का केला?” त्यावर रुंगठा साहेब म्हणाले,” मी त्यांना अनेकदा असे करण्यापासून परावृत्त केले परंतु ते सिनेमाची मला नमस्कार केल्याशिवाय राहत नाहीत. काय करू? याची कहाणी खूप जुनी आहे. चाळीस च्या दशकात ज्या वेळेला दिलीप कुमार चित्रपटांच्या दुनियेत आले होते, त्यावेळेला त्यांचा पहिला चित्रपट ‘ज्वार भाटा’ प्रदर्शित झाला आणि त्याला फारसे यश मिळाले नाही. त्याच काळात या निर्मिती केलेल्या बॉम्बे टॉकीज या चित्र संस्थेला देखील उतरती कळा यायला लागली होती. चित्रपटाचे मानधन मिळण्याचे बाकी होते. ते माझ्या घर शेजारच्या एरियात रहात होते. दिलीप कुमार मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. परंतु स्वाभिमानी होते. आमच्या एका कॉमन फ्रेंड कडून दिलीप कुमारच्या आर्थिक परिस्थितीची मला माहिती कळाली आणि मी त्याच्याद्वारे दिलीपला थोडीशी आर्थिक मदत केली.दिलीपला मी ट्राम चा पास काढून दिला. परंतु ही अल्प अशी मदत देखील दिलीप कुमार ला खूप मोलाची वाटली आणि तेव्हापासून दिलीप कुमार(Dilip Kumar) ज्या ज्या वेळेला मला भेटतो त्या त्या वेळेला त्या मदतीची मला आठवण करून देतो आणि मला वाकून नमस्कार करतो. खरंतर मी केलेली मदत फार जास्त नव्हती पण दिलीप कुमारचे मन खूप मोठे आहे. एवढा मोठा अभिनेता जरी झाला असला तरी त्याने त्याचा संघर्षाचा काळ तो विसरलेला नाही. या काळात ज्या ज्या लोकांनी त्याला मदत केली त्यांना देखील तो विसरलेला नाही.
फार कमी लोकांकडे अशी कृतज्ञता असते.जनरली लोक अशा आठवणी मुद्दाम लपविण्याचा प्रयत्न करतात.पण दिलीपकुमार(Dilip Kumar) ग्रेट ह्युमन बिइंग आहेत!” बी सी सी आय चे सेक्रेटरी जयवंत लेले यांनी हा किस्सा सांगितला होता.आज रुंगटा साहेब, दिलीप कुमार, जयवंत लेले कुणीच आपल्यात नाही पण हा किस्सा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे!
धनंजय कुलकर्णी