‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘गाईड’ चित्रपटाने आज पूर्ण केली तब्बल पंचावन्न वर्षे
जगप्रसिध्द टाईम मॅगझिनने भारतातील अभिजात सिनेमांची क्रमवारी प्रसिध्द केली होती त्यात देव आनंदच्या ‘गाईड’ या क्लासिक चित्रपटाला पहिल्या पाचात स्थान दिले होते. भारतीय सिनेतिहासातील सर्वोत्कृष्ट शंभर सिनेमांची चर्चा सर्व पातळ्यांवर शताब्दी वर्षात कायम घडत होती. यात नवकेतनच्या ‘गाईड’ या चित्रपटाचे नाव सर्वत्र येत होते. समीक्षक आणि आम जनता यांच्या कलाकृतीकडे पाहण्याच्या नजरा वेगळ्या असतात. कलात्मक मूल्य अभ्यासण्याचे दोघांचेही पॅरामीटर वेगवेगळे असतात. पण असे असतानाही अभिजन आणि बहुजन दोन्ही वर्गांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला.
आज ६ डिसेंबरला ‘गाईड’ पंचावन्न वर्ष पूर्ण करीत आहे त्या निमित्ताने या सिनेमाच्या मेकींग चा थोडक्यात आढावा घेऊयात.
प्रख्यात साहित्यिक आर. के. लक्ष्मण यांच्या १९५८ साली प्रसिध्द झालेल्या या कादंबरीला १९६० साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. देव आनंद या कथानकाच्या प्रेमात होता. यावर त्याला इंग्रजी भाषेत सिनेमा बनवायचा होता. त्या साठी त्याने नोबेल साहित्याच्या मानकरी पर्ल बक आणि पोलीश दिग्दर्शक टॅड डॅनियलेव्हस्की यांना बोलावले. याच सोबत हिंदीतही या सिनेमाची निर्मिती करावी असे त्याने ठरवले. सुरूवातीला हा चित्रपट चेतन आनंद दिग्दर्शित करणार होता. पण इंग्रजी आणि हिंदी या दोन दिग्दर्शकातील मतभिन्नतेमुळे चेतन आनंद यांचा उत्साह मावळला. त्यातच त्यांना त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट ’हकीकत’ करीता लष्कराची परवानगी मिळाली. त्या मुळे ते प्रोजेक्ट मधून बाहेर पडले.
देवआनंदने मग राज खोसला यांना बोलावले पण याला नायिका वहिदा रहमान यांनी आक्षेप घेतला कारण त्यांच्या सोबत तिचे ’सोलवा साल’ च्या वेळी मतभेद झाले होते. ‘जर राज खोसला दिग्दर्शक असतील तर मी हा चित्रपट करणार नाही’ असा बंडाचा पवित्रा वहिदाने घेतल्यावर राज खोसला यांनी मनाचा मोठेपणा दाखवत स्वत: बाहेर पडले.
आता देव समोर एकमात्र पर्याय शिल्लक होता गोल्डी तथा विजय आनंद! गोल्डीने काही गोष्टी सुरूवातीलाच क्लीअर करून घेतल्या. इंग्रजी सिनेमा गाईडची पटकथा अजिबात स्विकारली जाणार नाही. भारतीय प्रेक्षकांना केंद्रबिंदू ठरवून चित्रपट बनविला जाईल. गोल्डीने मूळ कादंबरीत बरेचसे सिनेमॅटीक बदल केले. कादंबरीत ही कथा मालगुडी अथवा तत्सम गावात घडते गोल्डीने कथेला राजस्थानच्या उदयपूर परीसरात नेले.
कादंबरी आणि सिनेमा यावर खूप काही विस्ताराने लिहिता येईल पण आर के नारायण मात्र सिनेमाला दिलेल्या या ट्रीटमेंट वर फारसे खूष नव्हते. आपल्या पतीला नाकारून प्रियकराच्या सोबत राहणारी नायिका हिंदी सिनेमाला सर्वस्वी नवीन होती. नायिकेचे हे बंड प्रेक्षक स्विकारतील का अशी देवला शंका होती. त्या साठी तिचा पती किशोर साहूचे कॅरेक्टर जास्तीत जास्त ग्रे शेड मध्ये करण्याचा प्रकार घडला.
सिनेमातील शैलेन्द्र ची गाणी आणि सचिनदाचे मिठ्ठास संगीत आजही रसिकांच्या मनात ताजे आहे. रफीची तीन एव्हरग्रीन गाणी ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’, ‘दिन ढल जाये हाय रात ना जाये’, ‘क्या से क्या हो गया’, लताची तीन बेफाम गाणी ‘कांटोसे खींच के ये आंचल, मोसे छल किये जा’, ‘पिया तोसे नैना लागे रे’, सचिनदाचे ‘अल्ला मेघ दे पानी दे’, आणि सदाबहार ‘वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां’. यातील ‘कांटोसे खींचके’ हे गाणे चित्तोडगडच्या किल्ल्याच्या परीसरात चित्रीत केले. गोल्डीचे गाणी चित्रीत करण्याचे कसब अफलातून होते. या चित्रपटात त्याचा प्रत्यय वारंवार आला.
आजही गाईडचे कोणतेही गाणे आठवले तर त्याचे दृष्य डोळ्यासमोर येते. हा व्हिज्युयल इफेक्ट खास गोल्डी टच होता. सिनेमाचा क्लायमॅक्स गुजरात मधील भुगरो नदीच्या काठी असलेल्या लिम्डी या गावी चित्रीत केला. नवकेतनचे छायाचित्रकार फली मिस्त्री यांचा कॅमेरा चित्रपटातील सौंदर्यस्थळाला आणखी देखणं करणारा होता. सिनेमातील प्रेमकथा शेवटी दु:खांताकडे जाते. नायकाचा शेवटी मृत्यु होतो त्यामुळे सुरूवातीला वितरक सिनेमाला हात लावायला तयार नव्हते. सुरूवातीला हा सिनेमा फ्लॉप झाल्याची आवई उठली गेली. पण नंतर माऊथ पब्लिसिटीने हळू हळू सिनेमा प्रेक्षकांना आवडू लागला. फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट चित्रपट, नायक, नायिका, संगीतकार, गायिका असे सर्व पुरस्कार गाईडला मिळाले. नवकेतनच्या इतिहासातील हा मानबिंदू ठरला! खाली ‘गाईड’ या चित्रपटाच्या हिंदी आणि इंग्रजी सिनेमाच्या यु ट्यूब लिंक दिल्या आहेत.