
जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!
कोणतेही गीत बनताना संगीतकार त्यावर प्रचंड मेहनत घेत असतात त्या गीतातील शब्दांना रसिकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी त्यात थोडेफार बदल देखील करत असतात पण त्या गाण्याचा मतितार्थ योग्य रीतीने रसिकां पर्यंत पोहचवा यासाठी त्याचा कायम प्रयत्न असतो. गुलजार यांनी लिहिलेली एक गझल तब्बल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली होती आणि प्रत्येकाने त्यातील सौंदर्य अधिक चांगल्या रीतीने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. गंमत म्हणजे पहिले दोन व्हर्जन रसिकांपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे गुलजार यांना आपली ही गझल शापित वाटू लागली पण नंतर मात्र या गझलने दुनियाभरातील रसिकांना खिळवून टाकले होते. कोणती होती ती गझल आणि काय होता तो नेमका किस्सा?
साठच्या दशकाच्या अखेरीस एक चित्रपट बनत होता ‘मिट्टी का देव’ यात संजीव कुमार प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाला संगीत सलील चौधरी यांचे होते या चित्रपटात साठी गुलजार यांनी एक गझल लिहिली. ‘शाम से आंख मे नमी सी है आज फिर आपकी कमी सी है..’ गझल सलील चौधरी यांनी मुकेश यांच्या स्वरात रेकॉर्ड केली. पण हा चित्रपटच पूर्ण होऊ शकला नाही आणि डब्यात गेला. त्यामुळे मुकेश यांनी गायलेली गुलजार यांची ही गझल रसिकांपर्यंत पोहोचू शकले नाही. (अलीकडे मात्र सलिल चौधरी यांच्या वेबसाइट वर हे गाणे ऐकायला मिळते!)

त्यानंतर काही वर्षांनी हीच गझल संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे गेली. त्यांनी ही गझल लता मंगेशकर यांच्या स्वरात रेकॉर्ड केली यात फक्त त्यांनी ‘ शाम से आंख मे नमी नमी सी है आज फिर आपकी कमी कमी सी है‘ असं नमी’ आणि ‘कमी’ला संगीतकार एल पी यांनी हे दोन शब्द मीटर मध्ये बसण्यासाठी रिपीट केले. त्या मुळे गझलेत सुरेल नादमयता आली. या गझलला लता मंगेशकर यांनी अतिशय सुंदर रीतीने गायले होते पण दुर्दैवाचा भाग म्हणजे ज्या चित्रपटात ही गझल होती तो चित्रपट देखील अर्धवटच राहिला आणि तो देखील डब्यात गेला! त्यामुळे ही गझल रसिकांसमोर येऊच शकली नाही. गीतकार गुलजार यांना आता हे गझल शापित वाटू लागली कारण दोन मातब्बर संगीतकार सलिल चौधरी व लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि मुकेश व लता या गायकांनी गाजलेली गझल रसिकांपर्यंत केवळ चित्रपट पडद्यावर न आल्यामुळे रसिकांपर्यंत पोहोचू शकली नव्हती.
================================
हे देखील वाचा : Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना का झापले होते?
================================
यानंतर बरीच वर्षे गेली नव्वद च्या दशकाच्या सुरुवातीला आर डी बर्मन गुलजार आणि आशा भोसले यांनी ‘दिल पडोसी है’ हा अल्बम तयार केला. यात त्यांनी गझल घेतली. आशा भोसले यांच्या स्वरात ही गझल रेकॉर्ड झाली. यात त्यांनी मूळ गझल जशीच्या तशी वापरली त्यात कुठलाही शब्द रिपीट केला नाही. आता मात्र ही गझल रसिकांपर्यंत व्यवस्थितरीत्या पोहोचली. गुलजार अर्थातच खूप आनंदित झाले कारण मागच्या वीस वर्षापासून ही गझल लिहून झाली होती पण संगीतबद्ध होऊन देखील रसिकांसमोर येऊ शकली नव्हती. या गझलची स्टोरी इथेच संपत नाही.

१९९९ साली गजलांचे बादशहा जगजीत सिंग यांच्या हाती ही गजल आली आणि त्यांनी त्यांच्या खास स्टाईल मध्ये ही गझल रेकॉर्ड केली. पुढे त्याचा समावेश त्यांच्या ‘मरासिम’ या अल्बम मध्ये झाला. अशा रीतीने एक गझल चार संगीतकारांनी सलिल चौधरी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर डी बर्मन आणि जगजीत सिंग यांनी स्वरबद्ध केली. जगजित सिंग आपल्या प्रत्येक कार्यक्रमात ही गझल आवर्जून म्हणत असत आणि रसिक देखील या गजले ला मनमुराद दाद देत असत!