ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
लताचे ‘हे’ गाणे गुलजार आपल्या पहिल्या चित्रपटात घेऊ शकले नाही?
प्रतिभावान गीतकार गुलजार (Gulzar) यांना हिंदी सिनेमात पहिला ब्रेक दिला होता दिग्दर्शक बिमल रॉय यांनी. गंमत म्हणजे शैलेंद्र यांच्यासोबत बिमलदा यांचे काही मतभेद झाले होते. त्यामुळे हे दोघे एकत्र काम करत नव्हते. ‘बंदिनी’ या चित्रपटातील गाणी लिहिण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा शैलेंद्र यांनीच गुलजारांना बिमलदा यांना भेटायला सांगितले! अशा पद्धतीने बिमल रॉय कॅम्पसमध्ये गुलजार यांचा प्रवेश झाला. गुलजार यांनी लिहिलेले पहिले गाणे ‘मोरा गोरा अंग लई ले’ याच चित्रपटासाठी होते.
बंदिनी चित्रपट बनायला बराच वेळ लागला . त्यामुळे या सिनेमा पूर्वीच बिमल रॉय यांचा दुसरा चित्रपट ‘काबुलीवाला’ हा ‘बंदिनी’च्या आधी प्रदर्शित झाला. त्यात देखील गुलजार गाणं होतं ‘ऐ मेरे प्यारे वतन तुज पे दिल पे कुर्बान..’ त्या मुळे बऱ्याच जणांना तोच गुलजार यांचे पहिले चित्रपट वाटते. पण त्या पूर्वी ‘बंदिनी’चे गाणे गुलजार यांनी लिहिले होते. बिमल रॉय हे खरे जोहरी होते. त्यांनी गुलजार (Gulzar) यांची बहुआयामी प्रतिभा तिथेच ओळखली आणि त्यांना आपला सहाय्यक म्हणून बंदिनी, काबुलीवाला या चित्रपटासाठी घेतले. चित्रपट या माध्यमाच्या सर्व अंगाची त्याना इथे व्यवस्थित ओळख झाली. यानंतर गुलजार हिंदी सिनेमा स्थिर असताना झाले.
दिग्दर्शक तपन सिन्हा यांनी १९६८ साली एक बंगाली चित्रपट बनवला होता ‘अपोनजान’ या चित्रपटाचा हिंदी रीमेक त्यांना बनवायचा होता. त्यासाठी त्यांनी या नियोजित हिंदी चित्रपटाचा स्क्रीन प्ले लिहिण्यासाठी गुलजार (Gulzar) यांच्याकडे दिला. गुलजार यांनी दोन वर्षे खपून हे सर्व काम हिंदी मध्ये व्यवस्थित करून ठेवले.
तपन सिन्हा यांनी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि वहिदा रहमान यांची निवड केली. पण नंतर काही कारणाने तपन सिन्हा यांना असे वाटले की हा चित्रपट हिंदीमध्ये काही चालणार नाही म्हणून त्यांनी हा प्रोजेक्टच ड्रॉप केला ! गुलजार (Gulzar) यांच्या सर्व मेहनतीवर अक्षरश: पाणी पडले. पण त्यांचे नशीब बलवत्तर होते कारण या चित्रपटाचे निर्माते एन सी सिप्पी यांनी गुलजार यांना सांगितले, ”या चित्रपटाचे सगळे हक्क आपण विकत घेऊयात. मी एखादा चांगला दिग्दर्शक पाहतो आपण हा चित्रपट हिंदीतुन बनवूयात!”
गुलजार यांनी या सिनेमावर तीन वर्षे मेहनत घेतली होती. त्यांनी धाडस करून एन सी सिप्पी यांना विचारले, ”तुम्ही जर परवानगी देत असाल तर हा चित्रपट मीच दिग्दर्शित करू का?” निर्माते एन सी सिप्पी यांना गुलजार यांची ताकत माहिती होती. त्यांनी होकार दिला. अशा पद्धतीने गुलजार (Gulzar) यांना पहिला चित्रपट दिग्दर्शित करायला मिळाला ‘मेरे अपने’. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत एक वृध्द स्त्री हवी होती संपूर्ण चित्रपटाचे कथानक या स्त्रीभोवती फिरत होते. ही भूमिका कुणी करावी यावरून निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यात वाद झाला. सिप्प्पी यांना ही भूमिका जुन्या काळातील अभिनेत्री निम्मी हिला द्यावी असे वाटत होते. तर दिग्दर्शक गुलजार यांना ही भूमिका छायादेवी यांना द्यावी असे वाटत होते. छायादेवी यांनी मूळ बंगाली चित्रपटांमध्ये ही भूमिका केली होती.
=========
हे देखील वाचा : यांचं गाणं ऐकून लता मंगेशकर झाल्या भावुक…
=========
दोघांचे एकमत होत नाही असे म्हटल्यानंतर सुवर्णमध्य काढायचा ठरवला आणि मीनाकुमारीचे नाव पुढे आले. पण त्यावेळी मीनाकुमारी यांची तब्येत फारशी चांगली नव्हती. ‘पाकीजा’ चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. एन सी सिप्पी यांचा मुलगा राज सिप्पी गुलजार यांच्यासोबत जाऊन मीनाकुमारी यांना भेटले आणि मीनाकुमारी या चित्रपटासाठी राजी झाल्या. चित्रपटाच्या अन्य भूमिकांसाठी विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांची निवड झाली. असराणी, पेंटल, दिनेश ठाकूर या सर्वांचा हा पहिला चित्रपट होता. ते कलाकार नवीन होते पण नवशिके नव्हते. या चित्रपटात मांडलेला विषय बेरोजगारी, गुन्हेगारी आणि भ्रष्ट राजकारणी त्यामुळे हा चित्रपट कल्ट क्लासिक बनला.
गुलजार यांचा पहिला चित्रपट प्रेक्षकांना आणि समीक्षकांना आवडला. पण गुलजार या चित्रपटाबद्दल बोलताना नेहमीच एक खंत व्यक्त करतात ते म्हणतात, ”चित्रपट सुंदर बनला. पण या चित्रपटात मला मीनाकुमारीवर एक गाणे चित्रित करायचे होते ते राहून गेलं. लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणं होतं ‘रोज अकेली आये रोज अकेली जाये…’ त्या काळात मीनाकुमारीची तब्येत खूपच तोळा मासा झाली होती. त्यामुळे गुलजार हे गाणे तिच्यावर चित्रित करू शकले नाही.
या चित्रपटाला संगीत सलील चौधरी यांची होते. या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं ‘कोई होता जिसको अपना कह लेते यारो…’ आज देखील किशोर कुमार चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. लताचे हे गाणे ऐकून आपण फक्त आता कल्पनाच करू शकतो मीनाकुमारीने रूपेरी पडद्यावर ते कसे साकारले असते!