गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार गौरव
लोग जिंदगी का सबसे छोटा और सबसे किमती लब्ज भुल गये है, प्यार. किसी बडी खुशी के इंतजार मे हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते है. इट इज सो सिंपल टू बी हॅपी. बट इट इज सो डिफिकल्ट टू बी सिंपल ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बावर्ची’ या चित्रपटातील हे गुलजार यांचे अतिशय प्रभावी संवाद. राजेश खन्नानेही त्याच सुरात वा शैलीत ते साकारल्याने त्यांचा प्रभाव आजही कायम. गुलजार यांच्या लेखानातील हे एक वैशिष्ट्य.(Gulzar Gyanpith Award)
काही ‘मानाच्या पुरस्कारां’ची उंची विजेत्यांमुळे अधिक अधोरेखित होते. योग्य प्रतिभावान व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार प्राप्त होत आहे अशीच सकारात्मक प्रतिक्रिया उमटते. गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार ही देखील अशीच गोष्ट. त्यांच्या निवडीबद्दल कोणतेही दुमत नाहीच.
सहज एक आठवण सांगतो, अंधेरीतील एका तारांकित स्पाॅटवर मेघना गुलजार दिग्दर्शित ‘फिलहाल ‘ या चित्रपटाच्या गीत संगीताच्या ध्वनिफितीच्या प्रकाशन सोहळा होता. गुलजार यांच्या मुलीने चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकलेय म्हणून एक प्रकारचे भारावलेले वातावरण आहे हे लक्षात येत होते.
या इव्हेन्टसला गुलजार नक्कीच येणार याची आम्हा उपस्थित पत्रकारांना खात्री होतीच. पण राखी? इव्हेन्टस सुरु असतानाच राखीचेही आगमन झाले. पण एकदम पहिल्याच रांगेत कसे जाणार? ती तर भरली होती. म्हणून राखीने चौथ्या रांगेत बसणे पसंत केले. ते पाहून मेघना स्टेजवरुन खाली आली आणि तिने आपल्या आईला पहिल्या रांगेत आपल्या पित्याशेजारी बसवले. हा भावनिक क्षण आम्हा उपस्थितांची विलक्षण दाद मिळवणारा ठरला. विशेष उल्लेखनीय गोष्ट, एका मराठी वृत्तपत्राने यावर पहिल्याच पानावर बाॅटम स्प्रेड स्टोरी दिली आणि वाचकांची उत्फूर्त दाद मिळवली. गुलजार व राखी अनेक वर्ष एकमेकांपासून वेगळे राहत होते म्हणून ते असे एकत्र येण्याचा क्षण मोठाच. (Gulzar Gyanpith Award)
गुलजार पाली हिलवरील बाॅस्कीयाना बंगल्यात तर राखी पनवेल तालुक्यातील तारा गावातील आपल्या फार्म हाऊसवर राहत होती. (२०१२ साली लोकसत्ता दिवाळी अंकासाठी राखीची मी घेतलेल्या सविस्तर मुलाखतीची आजही अनेक जण आठवण काढतात.) मुंबईत आल्यावर ती सांताक्रूझला मुक्तांगण सोसायटीत राह्यची. कालांतराने ते एकत्र आले. अशीच एक वेगळी आठवण. काही वर्षांपूर्वी मुंबईत एका ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात माझ्या ‘फिल्मी गप्पा आणि टप्पा ‘ या माहिती व मनोरंजनाच्या कार्यक्रमात माझे बोलणे झाल्यावर नेहमीप्रमाणेच श्रोत्यांना काही प्रश्न करा असे आवाहन करताच पहिलाच प्रश्न गुगली होता, गुलजार यांची कोणती भूमिका तुम्हाला आवडली?
प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आला तरी याच्या उत्तराचा मी विचार केला नव्हता. पण पटकन मी म्हणालो, फ्लॅशबॅक तंत्राने पडद्यावर पटकथा व संवाद साकारणारे ‘दिग्दर्शक’ गुलजार मला जास्त आवडतात. प्रश्नकर्त्याला उत्तर अपेक्षित होते मी कवी गुलजार जास्त आवडतात असे देईन. गुलजार एकाच वेळेस कवी ( शायर), चित्रपट गीतकार, पटकथा लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक, उत्तम संवादक असे अष्टपैलू आहेत. पण शब्द सामर्थ्यावर हुकुमत असलेले गुलजार चित्रपटाच्या दृश्यमाध्यमातही कर्तृत्ववान ठरले हेही तितकेच कौतुकास्पद आहे. त्यांच्या आजच्याही गीतलेखनात त्यांचे आणि त्यांच्या कारकीर्दीचे वय जाणवत नाही यातच त्यांच्या दिलखुलास प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक प्रत्यय येतोय.
एकाच व्यक्तिमत्व इतकी अफाट आणि बहुस्तरीय गुणवत्ता ही आपल्यातील प्रतिभेला त्यांनी दिलेला न्याय ( अथवा आकार) आणि त्यातून जनसामान्यांना दिलेला कलात्मक आनंद होय. म्हणूनच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होताच सर्वत्र सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाली.
गुलजार यांच्या शायरीला दाद द्यावी तेवढी थोडीच.(Gulzar Gyanpith Award)
वो मोहब्बत भी तुम्हारी थी नफरत भी तुम्हारी थी,
हम अपनी वफ़ा का इंसाफ किससे माँगते..
वो शहर भी तुम्हारा था वो अदालत भी तुम्हारी थी.
यूँ भी इक बार तो होता कि समुंदर बहता
कोई एहसास तो दरिया की अना का होता
बेशूमार मोहब्बत होगी उस बारिश की बूँद को इस ज़मीन से,
यूँ ही नहीं कोई मोहब्बत मे इतना गिर जाता है!
आप के बाद हर घड़ी हम ने
आप के साथ ही गुज़ारी है
तुमको ग़म के ज़ज़्बातों से उभरेगा कौन,
ग़र हम भी मुक़र गए तो तुम्हें संभालेगा कौन!
दिन कुछ ऐसे गुज़ारता है कोई
जैसे एहसान उतारता है कोई
तुम्हे जो याद करता हुँ, मै दुनिया भूल जाता हूँ ।
तेरी चाहत में अक्सर, सभँलना भूल जाता हूँ ।
आइना देख कर तसल्ली हुई
हम को इस घर में जानता है कोई
प्रत्येक शायरीत शब्द सौंदर्य आणि उत्तम आशय.
गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा. बहुमुखी प्रतिभेच्या गुलजारसाहेबांचा जन्म १८ ऑगस्ट १९३६ रोजी पंजाबमधील दीना येथील. फाळणीनंतर हे ठिकाण आता पाकिस्तानात आहे. गुलजार यांना लहानपणापासून गीतांच्या भेंड्यांमध्ये भाग घ्यायची आवड. त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. ते शेजाऱ्यांकडे जाऊन तंतुवाद्य वाजविण्याचा अभ्यास करीत. शिकण्याची प्रवृत्ती तेव्हापासूनच. गुलजार जेव्हा महाविद्यालयात गेले तेव्हा ते नियमितपणे रविशंकर आणि अली अकबर खान यांच्यासारख्यांच्या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागले. ऐकणे हा गुण त्यांनी अंगीकारला. ती एक गरज असतेच.(Gulzar Gyanpith Award)
हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचे कुटुंब फार वर्षे पाकिस्तानात राहू शकले नाही. ते कुटुंब भारतात अमृतसरला आले आणि गुलजार मुंबईला. इथे ते एका मोटार गॅरेजमध्ये काम करु लागले, मुंबईत त्यांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. फावल्या वेळात ते कविता करत. दिग्दर्शक व संकलक बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि संगीतकार हेमंत कुमार यांना भेटून ते आपल्या कविता वाचून दाखवू लागले. गुलजार यांनी बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’( १९६३) चित्रपटापासून कारकीर्दीला सुरुवात केली. बिमल रॉय हेच त्यांचे गुरू! त्याबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. संगीतकार सचिन देव बर्मन एकदा मोटार मेकॅनिक असलेल्या गाडी दुरुस्तीसाठी याच गॅरेजमध्ये आले होते. संपूर्ण सिंह यांच्याशी बोलता बोलता त्याच्यात दडलेला शायर आणि त्याची विलक्षण प्रतिभा सचिनदांनी हेरली.
सचिनदा तेव्हा बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ला संगीत देत होते. बंदिनीचे गीतकार शैलेंद्र होते. मात्र, या चित्रपटातील एका दृश्यावर शैलेंद्र यांचे कोणतेच गीत बिमल रॉय यांना पसंत पडत नव्हते. अशा स्थितीत सचिनदांना संपूर्णा यांची आठवण आली आणि संपूर्णा यांची बिमल रॉय यांच्याशी भेट घालून देण्याचा निश्चय त्यांनी केला. परंतु, अडचण अशी होती की, बिमलदा कुणाचेही म्हणणे सहजतेने कधीच स्वीकारत नव्हते. सचिनदांनाही आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्यापूर्वी दहादा विचार करावा लागत असे. संपूर्णामधील प्रतिभा पाहून बिमल रॉय कमालीचे प्रभावित झाले आणि ‘बंदिनी’चे गाणे त्यांना मिळाले. ‘मोरा गोरा अंग लई ले… मोहे श्याम रंग देई दे, छुप जाऊंगी रात ही मे, मोहे पी का रंग देई दे…’ हे गाणं संपूर्णा यांनी रचलं आणि हे गाणं एवढं हिट झालं की, ते रसिकांच्या ओठी आजही आहे. लतादीदींनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आणि एस.डींचे संगीत. यानंतर गुलजार यांना बिमल रॉय यांनी आपला सहायक बनविले. म्हणून गुलजार हे बिमल रॉय यांना आपला गुरू मानतात. ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी यांच्याशी गुलजार यांचं नातं भावनात्मक होतं. (Gulzar Gyanpith Award)
मीनाकुमारीने मृत्यूपूर्वी आपल्या सर्व डायऱ्या आणि शायरी गुलजार यांना सोपविली होती. गुलजार यांनी त्यावर संपादकीय संस्कार करून तिची शायरी प्रकाशित करण्याचे काम केले. ‘बेनझीर’ चित्रपटाच्या सेटवर मीनाकुमारीशी त्यांची भेट झाली होती. तेव्हा गुलजार हे बिमल रॉय यांचे सहायक होते. गुलजार यांनी मीनाकुमारीला ‘मेरे अपने’मध्ये झळकवले होते. मीनाकुमारीच्या आठवणींनी ते आजही व्याकुळच होतात.
हे होत असतानाच गीतकार म्हणूनही गुलजार यांची वाटचाल सुरु झाली. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘आंधी ‘ चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणी त्यांच्या सर्वोत्तम गीत रचना. तेरे बिना जिंदगी से कोई, किस मोड से जाते है, तुम आ गये हो नूर आ गया हो, गुलजार यांची गीतकार म्हणून बहुरंगी वाटचाल सतत यशस्वी ठरली. ”सत्या”मधील “सपने में मिलती हैं” ‘बंटी और बबली’ मधील कजरा रे कजरा रे…ऑंखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं. ‘ओंकारा’मधील बीडी जलाईऐ आणि नमक इश्क़ का. अशी आश्चर्याचा धक्का देणारी गाणीही गुलजार यांनी लिहून आपण कोणत्याच चौकटीतील नाही हे अधोरेखित केले. काळासोबत बदलणे आणि सतत वर्तमानात जगणे हा गुलजार यांचा स्वभाव. अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातील गीतांवरही त्यांचा विशेष ठसा उमटलाय.
दिग्दर्शक गुलजार ही आणखीन एक स्वतंत्र ओळख आणि त्यांच्या चित्रपटांच्या नावातच त्या चित्रपटांचे व्यक्तिमत्व दिसते ही प्रतिभावान दिग्दर्शकाची ओळख. मेरे अपने, कोशिश, अचानक, आंधी, खुशबू, मौसम, किनारा, मीरा, अंगूर, नमकीन, मीरा, इजाजत, लेकिन. विनोद खन्नाच्या क्षमतेवर गुलजार यांनी जास्त विश्वास दाखवला. तरी एक प्रश्न आहेच, गुलजार यांनी आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांना कधीच संधी का दिली नाही?(Gulzar Gyanpith Award)
आणीबाणीत ‘आंधी’वर आलेली बंदी त्यांना दुर्दैवाने स्वीकारावी लागली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ती गळचेपी होती. या चित्रपटातील राजकीय नेता आरतीदेवी ( सुचित्रा सेन) यांचा गेटअप तात्कालिक पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी मिळताजुळता आहे या कारणास्तव या चित्रपटावर बंदी आली. जे. ओम प्रकाश निर्मित हा चित्रपट १३ फेब्रुवारी १९७५ ला प्रदर्शित झाल्यावर समिक्षक व रसिकांची दाद मिळवण्यात यशस्वी ठरला होता. ( मुंबईत मेन थिएटर मेट्रो) ‘आंधी’वरील बंदी गुलजार यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करणारी ठरली. आणीबाणीनंतर पुन्हा ‘आंधी’ प्रदर्शित होताच त्याला पुन्हा रसिकांचा प्रतिसाद मिळाला. आजही म्हणजे चित्रपटाला ४९ वर्ष होऊनदेखिल त्याची विविध कारणास्तव विशेष दखल घेतली जाते.
गुलजार यांचे बोलके संवाद हे आणखीन एक वैशिष्ट्य. नेमक्या शब्दात अतिशय अर्थपूर्ण संवाद लेखन हे गुलजार यांचे विशेष. अनेक चित्रपटांचे संवाद त्यांनी लिहिले. ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद ‘चे संवाद त्या चित्रपटाच्या व्यक्तिमत्वात भरच घालतात. जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं, जब तक जिंदा हू मरा नहीं जब मर गया साला मै ही नही, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ मे है जहापनाह…”आंधी” मधील त्यांचा संवाद, ये जो चांद है ना, इसे रात मे देखना. ये दिन मे नही निकलता… ‘नमक हराम ‘मध्ये त्यांचा एक संवाद आहे, जहा यार नही वहा प्यार नही, जहा प्यार नही वहा यार नही…(Gulzar Gyanpith Award)
गुलजार यांचे साहित्य ही आणखीन एक विशेष ओळख. काही नावे सांगायची तर बोस्की (कवितासंग्रह), तक़सीम (हिंदी कथासंग्रह), देवडी (मूळ हिंदी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद-अनुवादक अंबरीश मिश्र), धुऑं ( हिंदी कथासंग्रह), मिर्झा गालिब (मराठी अनुवाद – अंबरीश मिश्र)
साहित्यिक गुलजार हे चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अफाट कर्तृत्वाला जणू समांतर आहे. या दोन्ही भूमिकांची गल्लत त्यांच्याकडून होणे शक्यच नाही. पण त्या भूमिका एकमेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पूरकच. पण गुलजार यांचे संवाद व गीतलेखनात त्यांच्यातील साहित्यिक डोकावतो. त्यामुळेच चित्रपटाच्या बाबतीत एक वेगळेच ‘गुलजार स्कूल ‘ आहे आणि त्यातून शिकावे तेवढे थोडेच आहे. याबाबत गुलजार जणू एक विद्यापीठच. त्यातही सत्तरच्या दशकात एका बाजूला ‘थेटरातील टाळ्या शिट्ट्यां’ची उत्फूर्त दाद मिळवणारे मसालेदार मनोरंजक चित्रपट आणि दुसर्या बाजूला कलात्मक अथवा समांतर चित्रपटाचे गांभीर्य यांच्या मधला मार्ग म्हणजे स्वच्छ अथवा क्वालिटी चित्रपट. ही ओळख ह्रषिकेश मुखर्जी, गुलजार, बासू भट्टाचार्य, बासू चटर्जी यांनी आखली. चित्रपटाच्या इतिहासात हा कालखंड अनेक गोष्टींसाठी उल्लेखनीय.
=============
हे देखील वाचा : गिरीशमुळे नसीरुद्दीन शाहांना मिळाला पहिला ब्रेक
=============
१९८८ साली ‘मिर्झा गालिब’ व ९३ साली ‘किरदार’ या छोट्या पडद्यावरील मालिका त्यांनीच केल्या होत्या. ‘चौरस रात (लघुकथा संग्रह)’, ‘जानम’ (कवितासंग्रह) एक बूंद चॉंद (कवितासंग्रह), रावी पार (कथासंग्रह), रात चॉंद और मै, रात पश्मीने की, खराशें आदी त्यांची प्रमुख पुस्तके आहेत.
गुलजार यांना या चौफेर प्रवासात अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात येणे अगदी स्वाभाविकच. त्यातील काही पुरस्कार. साहित्य अकादमी पुरस्कार २००२ मध्ये धुऑं या कथासंग्रहासाठी, पद्मभूषण पुरस्कार २००४ मध्ये प्राप्त झाला. जय हो या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटातील गीत लेखनासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला. भारत सरकारच्या वतीने त्यांना २०१३ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.(Gulzar Gyanpith Award)
दिखाऊ व व्यवहारी फिल्मी दुनियेत वावरतानाही आपलं साहित्यिक मूल्य, स्वतंत्र विचारसरणी, शैली, फोकस जपणारे बहुपेडी व्यक्तिमत्व म्हणजे गुलजारसाहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. एका योग्य कलाकाराची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची सर्वांचीच भावना आहे, ही त्यांची मोठीच मिळकत म्हणावी लागेल.