किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
साठच्या दशकातील देखणा सुपरस्टार : राजेंद्र कुमार!
साठच्या दशकातील सुपरस्टार राजेंद्र कुमारला (Rajendra Kumar) खरं तर अभिनेता व्हायचंच नव्हतं ; त्याला दिग्दर्शक व्हायचं होतं! फाळणीनंतर तो जेंव्हा महानगरीत आला त्या वेळी दिग्दर्शक एच एस रवेल यांच्याकडे त्याने सहाय्यक म्हणून काम सुरू केले. पतंगा, सगाई, पॉकेटमार…. या सिनेमांकरीता दिग्दर्शन सहाय्य करताना किदार शर्मा यांनी त्याला ’जोगन’ सिनेमात एक छोटी भूमिका दिली. या सिनेमाचा नायक दिलीप कुमार होता.
ही भूमिका बघून देवेंद्र गोयल यांनी १९५५ साली ’वचन’ सिनेमात मोठी भूमिका दिली.(हा संगीतकार रवि यांचाही पहिला हिट सिनेमा ठरला) यात त्याच्यासोबत गीता बाली होती. पण ती त्याच्या बहिणीच्या भूमिकेत होती! या सिनेमाकरीता त्याला १५०० रूपये मानधन मिळाले होते. सिनेमा सिल्वर ज्युबिली हिट झाला. ’अ न्यू स्टार इस बॉर्न’ असं फिल्म इंडियाच्या बाबूराव पटेलांनी त्याची प्रशंसा केली. पण राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) अजूनही सेफ गेम खेळत होता त्याने रवेल यांची साथ सोडली नाही. तो असं का वागत होता? याचे कारण त्याने ऐश्वर्य आणि त्यानंतरची गरीबी दोन्ही अनुभवले होते.
त्याच्या वडलांचा कराचीला टेक्स्टटाईलचा मोठा उद्योग होता. तिथे त्यांची मोठी प्रॉपर्टी होती.पण फाळणीने सारेच चित्र बदलले.सर्व मालमत्ता सोडून त्यांना भारतात परतावे लागले होते.श्रीमंती नंतरची गरीबी जास्त पीडादायक असते.या काळाने राजेंद्रकुमारला वयाच्या मानाने अधिक प्रौढ , विचारी बनवले.१९५६ साली व्ही शांताराम यांच्या ’तूफान और दिया’ या लो बजेट सिनेमाने मोठे यश मिळविले. हा सिनेमा पाहूनच मेहबूब खान यांनी राजेंद्र कुमारला (Rajendra Kumar) ’मदर इंडीया’ त मुख्य भूमिकेत घेतले. या सिनेमाने त्याला खर्या अर्थाने स्टार बनवले.
या नंतर त्याच्या हिट सिनेमांचा रतीब सुरू झाला. अल्पावधीतच त्याला मिडीयाने ’ज्युबिली कुमार’ हे नाव दिले. हिट सिनेमांची भली मोठी रांगच त्याने उभी केली. त्याच्या स्वभावाला अनुकूल असलेल्या आदर्श मुलाच्या, प्रामाणिक प्रियकराच्या, समंजस कुटुंब वत्सल व्यक्तीच्या भूमिका त्याला मिळत गेल्या. गूंज उठी शहनाई, ससुराल,आई मिलन की बेला, कानून, प्यार का सागर , घराना, धूल का फुल, आस का पंछी, मेरे मेहबूब, दिल एक मंदीर, संगम, आरजू , सूरज, झुक गया आसमान, साथी,तलाश ….या सर्व चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवी यश मिळविले.
समीक्षकांनी मात्र कायम त्याची दिलीप कुमारची भ्रष्ट नक्कल म्हणून संभावना केली. त्याच्यावर दिलीपच्या अभिनयाचा पगडा होताच.(संगम करीता राज कपूरची पहिली पसंती दिलीपच होता.) राजेंद्र कुमारच्या भावस्पर्शी भूमिका काही कमी दर्जाच्या नव्हत्या. ’मीनाकुमारी सोबत राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) हि पडद्यावरची सर्वात परफेक्ट पेयर होती’ असा कबुली जवाब दस्तुरखुद्द कमाल अमरोही यांनी दिला होती. कितीतरी म्युझिकल हिट सिनेमांचा तो नायक होता. विशेषत: प्रेमाच्या त्रिकोणी कथानकातील आधारीत त्याचे सिनेमे प्रचंड गाजले. बी.सरोजादेवी, कुमकुम ते वैजयंती माला, वहिदा, हेमा, रेखा हा त्याचा नायिकांबाबतचा चढता आलेख होता.
सत्तरच्या दशकात मात्र त्याची जादू ओसरू लागली. त्याने त्याचा ’डिंपल’ नावाचा कार्टर रोड वरील अलिशान बंगला राजेश खन्नाला विकला. (हा बंगला त्याने भारत भूषण कडून विकत घेतला होता) आणि राजेशचे नशीब फळफळले. त्याचा भाऊ नरेश कुमार आणि मेव्हणे ओ पी रल्हन यांच्या सिनेमातून तो कायम पडद्यावर येत राहिला. सावन कुमार यांच्या ’साजन बिना सुहागन’पासून चरीत्र अभिनयात त्याने रंग भरायला सुरूवात केली.
==============
हे देखील वाचा : राजकपूर यांनी चायनाचे निमंत्रण का नाकारले?
==============
आपल्या मुलाचे करीयर मात्र घडविण्यात तो यशस्वी झाला नाही. दिलीप-राज-देव या सदाबहार त्रिकूटाची कारकिर्द बहरात असताना १९५७ ते १९६७ हे दशक राजेंद्रने गाजवले. त्याची नोंद सिनेतिहासात नक्कीच घेतली जाईल. २० जुलै १९२९ रोजी सियालकोट पाकिस्तान मध्ये जन्मलेल्या राजेंद्र कुमारचे (Rajendra Kumar) १२ जुलै १९९९ रोजी निधन झाले. एकाच महिन्यात जन्म आणि मृत्यूची तारीख असण्याचा दुर्दैवी योगायोग त्याच्या वाट्याला आला.