वाढदिवसाचा डबल धमाका: धर्मेंद्र-शर्मिला!
काही तारखांची गंमत असते. आज ८ डिसेंबर; हिंदी सिनेमातील दोन मातब्बर कलाकारांचा जन्मदिवस. बॉलीवूडचा हि मॅन धर्मेंद्र आणि आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रसिकांच्या मनात घर करून राहिलेली अभिनेत्री शर्मिला टागोर या दोघांचा आज वाढदिवस आहे. धरमजी आज ८६ व्या वर्षात तर शर्मिला आज सत्यात्तराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
या दोघांचं अभीष्टचिंतन करताना या दोघांनी एकत्र काम केलेल्या काही सिनेमांची आठवण येणं संयुक्तिक ठरेल. धरमचे हिंदी सिनेमात आगमन अर्जुन हिंगोरानीच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमातून झालं. तर शर्मिलाचे रूपेरी पदार्पण सत्यजित रे यांच्या ’अपूर संसार’ या चित्रपटातून १९५९ साली झाले. हिंदी सिनेमात १९६४ सालच्या शक्ती सामंत यांच्या ‘कश्मीर की कली’ मधून शर्मिला प्रेक्षकांपुढे आली.
हे वाचलंत का: देव आनंदच्या गाईड ची यशस्वी पंचावन्न वर्षे पूर्ण
साठच्या दशकातील धरम त्याच्या नंतरच्या प्रचलित इमेज पासून खूप वेगळा होता. त्याच्यातील संवेदनशील अभिनयाने नटलेल्या कितीतरी अप्रतिम भूमिका आजही रसिक आठवतात. मारधाड, अॅक्शनपासून कोसो दूर असलेल्या त्याच्या हळव्या भावुक अदा असलेल्या धरमला पहाणं खूप सुखद होतं. शर्मिलाचा तर प्रश्नच नव्हता. तिचा चेहरा, तिचे डोळे सारं काही बोलून जात होते.
या दोघांचा पहिला चित्रपट १९६६ साली ऋशिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला ‘अनुपमा’ हा होता. यात शर्मिलाने अभिनयात बाजी मारली. धरमने साकारलेला कवी मनाचा सत्शील नायक अप्रतिम होता. यातील नायिका आपल्या आईच्या मृत्युला आपणच कारणीभूत आहोत या भावनेने आतल्या आत दु:खाचे कढ सोसणारी आहे. मनातील भावनांचा कोंडमारा तिला फुलूच देत नाही. या न उमललेल्या कळीच्या आयुष्यात प्रेम येतं. ‘कुछ दिल ने कहा’, ’धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार’, ‘या दिलकी सुनो वालो’ हि हेमंतदाची गाणी कथानकाला साजेशी होती.
याच वर्षी मोहन सैगल यांचा ‘देवर’ हा या जोडीचा चित्रपट झळकला. रोशनची यातली ‘रूठे सैय्या हमारे सैय्या क्यू रूठे’, ‘ दुनिया मे ऐसा कहां सबका नसीब है’ ‘बहारो ने मेरा चमन लूटकर’ हि गाणी सिनेमाला हिट करून गेली. १९६८ साली अमर कुमार चा ’मेरे हमदम मेरे दोस्त’ हा या जॊडीचा सिनेमा आला. छलकाये जाम आईये आपके, चलो सजना जहां तक घटा चले, हुई शाम उनका खयाल आगया, न जा कहीं अब न जा दिल के सिवा हि गाणी मस्त जमून आली होती.
हि जोडी आता हिट झाली होती. याच जोडीला ऋशिदांनी १९६९ साली ’सत्य काम’ या सिनेमात पुन्हा एकत्र आणले. पुन्हा एक अप्रतिम सशक्त कथानक (प्रख्यात बंगाली लेखक नारायण संन्याल) असलेला चित्रपट. याच वर्षी ब्रिज यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘यकीन’ या सिनेमात हि जोडी झळकली. धरमचा डबल रोल असलेल्या या जासूसी सिनेमात शर्मिला चक्क शॉर्टस मध्ये होती. पण गाणी मिठ्ठास होती ‘गर तुम भुला न दोगे’, ’यकीन करलो मुझे मुहोब्बत है तुमसे तुमसे’ या गाण्यांनी सिनेमा लोकप्रिय ठरला.
हे वाचलंत का: जिंदगी ना मिलेगी दोबारा- एक ब्रेक तो बनता है
या नंतर तब्बल सहा वर्षांनी दोघे एकत्र आले देवेंद्र गोयल यांच्या ’एक महल हो सपनोंका’ या चित्रपटात. थोडसं ऑफबीट कथानक असलेल्या सिनेमाला चांगला अभिनय असूनही व्यावसायिक यश नाही मिळालं. याच वर्षी ऋशिदांनी त्यांच्या ’चुपके चुपके’ या सिनेमात या दोघांना घेतलं. एक प्रसन्न विनोदीपट म्हणून आजही याचे नाव घेतले जाते. राज खोसला यांनी १९८४ साली ’सनी’ या चित्रपटात या दोघांना कास्ट केले सोबतीला वहिदा होती. धरम आणि शर्मिला हि जोडी जरी इतर लोकप्रिय जोड्यां इतकी गाजली नसली तरी काही सिनेमांकरीता त्यांना आठवावे लागतेच…
त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तर नक्की्च! या जोडीचे हे गाणे तुम्हाला त्या काळात नक्की घेवून जाईल.