Madan Mohan : संगीतकार मदन मोहन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार!

Prasad Oak : सहाय्यक दिग्दर्शकापासून सुरु झाला होता प्रसाद ओकचा अभिनय प्रवास
मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय प्रतिभासंपन्न अभिनेता म्हणून प्रसाद ओकला (Prasad Oak) ओळखले जाते. प्रसादने ना केवळ आपल्या अभिनयाने तर आपल्या उत्तम दिग्दर्शनाने देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. आज प्रसाद मराठी मनोरंजनविश्वातील मोठे नाव समजले जाते. मात्र त्याच्यासाठी हा प्रवास ही ओळख तयार करणे अजिबातच सोपे नव्हते. त्याने यासाठी रात्रंदिवस अफाट मेहनत घेतली आणि नावलौकिक कमावला. आज १७ फेब्रुवारी रोजी प्रसाद ओक त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. (Prasad Oak)
प्रसादचा जन्म १७ फेब्रुवारी १९७५ रोजी पुण्यामध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये झाला. सुरुवातीपासूनच प्रसादचा ओढा अभिनयाकडे होता. त्याला गायनाची देखील खूपच आवड होती. त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये घेतले. त्यानंतर त्याने बीएमसीसी कॉलेजमधून त्याची डिग्री पूर्ण केली. पुण्यात असल्यापासूनच त्याने नाटकांमध्ये कामं करण्यास सुरुवात केली. नाटक हे प्रसादचे पहिले प्रेम होते. (Prasad Oak Birthday)

प्रसादने सिनेसृष्टीतल्या त्याच्या करिअरला सुरुवात देखील नाटकापासूनच केली. प्रसादने श्रीराम लागू (Shriram Lagoo) यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) नाटकात श्रीराम लागू यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नाटकांमध्ये काम करताना प्रसादने पुणे सोडून मुंबई गाठले. मुंबईमध्ये आल्यानंतर प्रसादचा मोठा संघर्ष सुरु झाला. इथे त्याचा राहण्यासाठी जागा शोधण्यापासूनच संघर्ष सुरु झाला. मात्र मेहनत आणि अथक प्रयत्न करून प्रसाद प्रत्येक अडचणींवर मात करत पुढे जात राहिला. अशातच त्याला ‘बंदिनी‘ (Bandini) या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि तो हळूहळू प्रसिद्ध होऊ लागला. (Entertainment Mix Masala)
‘बंदिनी’ या मालिकेनंतर प्रसाद ‘अंधाराच्या पारंब्या’ या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत दिसला. त्यानंतर पुढे २००८ साली तो झी मराठीच्या ‘अवघाची संसार’ (Avghachi Sansar) या मालिकेत झळकला आणि त्याच्या करियरला आणि आयुष्याला मोठे सुखद वळण मिळाले. या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला. २००८ मध्ये ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेत प्रसादने साकारलेले हर्षवर्धन भोसले हे पात्र देखील कमालीचे गाजले. प्रसाद मराठीमध्ये लोकप्रिय आणि प्रसिद्ध होत असताना त्याने हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली. (Marathi Actor)

मालिकाविश्व गाजवणारा प्रसाद आता चित्रपटांकडे वळू लागला आणि त्याने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. प्रसाद ओकला यश मिळाले आणि त्याने त्याचा पहिला सिनेमा म्हणजे बॅरिस्टरमध्ये काम केले. या सिनेमानंतर त्याने ऐका दाजिबा, एक डाव धोबी पछाड, कलियुग, जेहर, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझी घरी, हिप हिप हुर्रे, खेळ मांडला, निर्मला, धतिंग धिंगाणा, बाळकडू, डॉक्टर रमाबाई, 7 रोशन व्हिला, शिकारी, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, ये रे ये रे पैसा, पिकासु, हिरकणी, धुरळा, स्माईल प्लिज आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. (Prasad Oak Movie)
२०२२ साली प्रसादने ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmveer) या सिनेमात काम केले. त्याने या सिनेमात साकारलेली आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका कमालीची गाजली. त्याला या सिनेमापासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील केले गेले. यासोबतच प्रसादने २००९ साली आलेल्या ‘हाय काय नाय काय’ या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली. सहाय्यक दिग्दर्शक ते आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक असा हा प्रसाद ओकचा प्रवास अनेक खच खळग्यांनी भरलेला होता.

प्रसाद ओकने २०१७ साली ‘कच्चा लिंबू’ (Kachha Limboo) या सिनेमाचे दिग्दर्शन केले. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. यासोबतच त्याने हिरकणी, चंद्रमुखी हे गाजलेले सिनेमे देखील दिग्दर्शित केले आहे. लवकरच प्रसादने दिग्दर्शित केलेला सुशीला सुजित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तो बाबुराव पेंटर आणि महापरिनिर्वाण यांच्या भूमिकेत देखील झळकणार आहे. तो निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा देखील करत आहे. यासोबतच तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. (Prasad Oak Life Facts)
==============================
हे देखील वाचा: ‘मनमोही’ गाण्यात सावनी रवींद्रच्या अभिनयाची जादू; Abhijeet Khandekar सोबत जुळणार लव्हकेमिस्ट्री!
==============================
प्रसादने मंजिरीशी ७ जानेवारी १९९८ रोजी लग्न केले. या दोघांचे लव्हमॅरेज होते. प्रसादला मंजिरीची त्याच्या संघर्षाच्या काळात मोठी मदत झाली. दोघांनी मिळून शून्यातून विश्व निर्माण केले आहे. या दोघांना दोन मुलं देखील आहेत.