हिंदुस्तानी संगीतातील वसंत- डॉ. वसंतराव देशपांडे
वसंतरावांचं नाव घेतलं की, घेई छंद मकरंद, तू सुखकर्ता तू दु:खहर्ता, वाटेवर काटे वेचित चाललो, दाटून कंठ येतो, कुणी जाल का, सुरत पिया की, या भवनातील गीत पुराणे, बगळ्यांची माळ फुले या सारखी अनेक सदाबहार गीतं आठवतात.
वसंतरावांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं झाला. त्यांचं शिक्षण नागपूरमध्ये झालं. आई शिक्षिका होती. तसेच भक्तीमंदिरात त्या गात असत. त्याच गायनाचे संस्कार वसंतरावांवर झाले.
वसंतराव (Vasantrao Deshpande) ७ वर्षांचे असताना अशी एक गोष्ट घडली ज्यामुळे वसंतरावांचे संगीतक्षेत्राशी नाते जुळले. एकेदिवशी वसंतराव घरी परतत असताना अचानक पाऊस सुरू झाल्याने ते आडोशाला उभे राहिले आणि सहजच आईनं शिकवलेलं गाणं गुणगुणु लागले. पण ते गुणगुणणं इतकं सुरेल होतं की त्या घरातील गृहस्थांनी वसंतरावांना आपल्या घरात नेऊन गाऊन दाखवायला लावलं. पाऊस थांबल्यावर वसंतरावांना घेऊन ते गृहस्थ वसंतरावांच्या आईला भेटले आणि वसंतरावांच्या गाण्याचं कौतुक करत त्यांना संगीत शिक्षण देण्याविषयी त्यांनी आईला सूचवले. वसंतरावांच्या आईने आर्थिक दृष्ट्या आपण मुलाला संगीत शिकवायला अक्षम असल्याचे सांगितल्यावर त्या गृहस्थांनी वसंतरावांना शाळा सुटल्यावर मोफत शिकवण्याची तयारी दर्शवली.
अशाप्रकारे ग्वालियर घराण्याचे गायक शंकरराव सप्रे यांचे मार्गदर्शन वसंतरावांना लाभले. भालजी पेंढारकर यांच्या ‘कालिया मर्दन’ चित्रपटात वयाच्या आठव्या वर्षी वसंतरावांना कृष्णाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पुढे वसंतरावांच्या मामांनी वसंतरावांना लाहोर येथे नेलं असता हिंदुस्तानी संगीताचे वेगवेगळे पैलू वसंतरावांनी आत्मसात केले. दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवलं. असद अली खां नामक फकीराकडे सहा महिने त्यांनी केवळ मारवां राग आळवला. ठुमरी, गझल हे हिंदुस्तानी संगीतातील प्रकार ते या लाहोर वास्तव्यात शिकले.
उदरनिर्वाहासाठी वसंतरावांनी पुण्यात मिलीटरी अकाउंट्स मध्ये २४ वर्षं नोकरी केली. दरम्यान त्यांची संगीत साधना अविरत होती. वसंतरावांनी विविध नाटकात भूमिका केल्या पण कट्यार काळजात घुसली नाटकातील त्यांच्या खांसाहेब भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्या भूमिकेवरुनच पु.लं. देशपांडे यांनी वसंतरावांना ‘वसंतखां देशपांडे’ असं नाव दिलं होतं.
तब्बल ८० हून अधिक गाणी त्यांनी चित्रपटासाठी गायली.
वसंतरावांना विविध विषय, कला यांच्यात विलक्षण गती होती. शिल्प, नृत्य, स्तोत्र कोणत्याही विषयावर ते सहज व्यक्त होत. पुलं आणि वसंतरावांची घनिष्ठ मैत्री सर्वज्ञात आहे. सबकुछ पुलं म्हणून गाजलेल्या ‘गुळाचा गणपती’ चित्रपटातील सुप्रसिद्ध इंद्रायणी काठी हे गीत आपण जाणतोच. या गाण्याच्या रेकॉर्डींगचं बजेट अगदी तुटपूंजं होतं आणि त्यात रेकॉर्डींगवेळी ऑर्गनवाला आलाच नाही. अशावेळी वसंतराव मदतीला धावून आले. या गाण्यातील ऑर्गन वसंतरावांनी वाजवलाय. इंद्रायणी काठीमध्ये काय सुंदर संगम आहे! पुलंचं संगीत, पं. भीमसेन जोशी यांचा आवाज आणि वसंतरावांचा ऑर्गन. तबला, हार्मोनियम वाद्ये सुद्धा वसंतरावांना अवगत होती.
१९८२ सालच्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद वसंतरावांनी भुषवलं होतं.
वसंतरावांची गायकी इतकी वैविध्यपूर्ण असूनही त्यांना अपेक्षित मानसन्मान थोडा उशीरानेच प्राप्त झाला. पण त्याबद्दल वसंतरावांनी खंत न बाळगता आजीवन संगीत जपलं. ऐन उमेदीत कारकीर्द असताना विविध आजारांनी ग्रासलेल्या वसंतरावांनी ३० जुलै १९८३ साली जगाचा निरोप घेतला.
मात्र आजही वसंतरावांच्या गाण्यांच्या रेकॉर्डस् त्यांच्या सळसळत्या उर्जेने भरलेल्या गायकीची साक्ष देतात आणि जुन्या नव्या पिढीला त्या संगीताच्या प्रेमात पाडतात.