‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
तळागाळातील माणसांपर्यंत त्यांचा चित्रपट पोहचला…
यशस्वी दिग्दर्शकाची व्याख्या अथवा ओळख काय ? ज्याचा ‘पिक्चर’ समाजाच्या सर्व स्तरातील रसिकांना समजतो (आणि म्हणूनच आवडतो) आणि हाऊसफुल्ल गर्दीत रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सवी आठवडे मुक्काम करतो ( आजच्या कार्पोरेट युगात पहिल्याच आठवड्यात काहीशे कोटीचा व्यवसाय केल्याच्या ब्रेकिंग न्यूज होतात), रसिकांच्या पिढ्या ओलांडून सतत पुढील पिढीतील रसिकांना माहित होतो, पहावासा वाटतो, त्यातील गीत संगीत व नृत्य सर्वकालीन लोकप्रिय असते तो दिग्दर्शक यशस्वी.(Manmohan Desai)
आमचे गिरगावकर दिग्दर्शक मनमोहन देसाई (Manmohan Desai) अगदी तस्सेच. सत्तरच्या दशकात एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या पडद्यासमोरच्या ‘स्टाॅलच्या पब्लिक ‘पासून ( त्यात मी हुकमी होतो) बाल्कनीच्या शेवटच्या रांगेतील रसिकांपर्यंत सगळेच त्यांचा ‘पिक्चर ‘ जल्लोषात एन्जाॅय करीत. तसं त्यांच्या पिक्चर्समध्ये असे काय ? मनोरंजन, मनोरंजन, मनोरंजन ( एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट) त्यांच्या पिक्चर्सनी समाज घडवला, प्रतिकात्मक दृश्यातून काही मांडले, मेंदूला खाद्य दिले असे भलेही झाले नसेल ( त्यासाठी अन्य दिग्दर्शक होतेच) . त्यांचा फोकस स्पष्ट होता, एकदा थेटरातील अंधारात पडद्यावर पिक्चर सुरु झाला रे झाला जनसामान्य प्रेक्षक त्यात गुंतत गुरफटत गेला पाहिजे. आपली दु:खे, तणाव, विवंचना विसरायला हवा. तो खुशीत असला तरी त्याने आपला पिक्चर पहावा, तो कटकटीने बेजार असला तरी त्याने आपला पिक्चर पहावा. अनेक गोष्टींवरचा एकच उपाय, मनजींचा पिक्चर.
‘छलिया ‘पासून ‘गंगा जमुना सरस्वती ‘ पर्यंत त्यांनी आपला फोकस कायम ठेवला. त्यांच्या यशाचे प्रगती पुस्तक पाहिलंत तर त्यांच्या यशाचे प्रमाण तब्बल पंचाण्णव टक्के आहे. त्यांचा ‘शरारत ‘ ( विश्वजीत, मुमताज व शत्रुघ्न सिन्हा) नावाचा पिक्चर होता हे फार कोणाला माहित नाही. तो फारसा यशस्वी ठरला नाही. ‘आ गले लग जा ‘ने फक्त मुंबईत ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात ज्युबिली हिट यश संपादले. देशभरात त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आणि त्यांनी दिग्दर्शिलेला शेवटचा चित्रपट ‘गंगा जमुना सरस्वती’ ( १९८८) पूर्णपणे फ्लाॅप झाला. त्यात मनजींचा स्पार्क अजिबात दिसला नाही.
याच मनजींचे १९७२ साली भाई हो तो ऐसा, शरारत आणि रामपूर का लक्ष्मण असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. तर १९७७ साली धरमवीर, अमर अकबर ॲन्थनी, चाचा भतिजा आणि परवरीश असे चार चित्रपट पडद्यावर आले तेच सुपरहिट. अमर अकबर…. कोणत्याही दृश्यापासून कधीही पहावा एकदम भन्नाट मनोरंजन. एकाद्या दिग्दर्शकाचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण होत वाढत जाणे हे सर्वात मोठे यश. खरं तर हा ‘स्टार, सुपर स्टार, ही मॅन यांच्या हुकमी क्राऊड पुलरने ओळखला जाणारा काळ ‘, त्यात एक दिग्दर्शक आपली स्पेस, ओळख व यशाची खात्री निर्माण करतो तर मग आणखीन काय हवे? चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे पण त्याची अशीही हुकुमत निर्माण व्हावी.(Manmohan Desai)
मनजी शेवटपर्यंत गिरगावात राहिल्याने त्यांची जनसामान्यांशी असलेली नाळ घट्ट राहिली. मी गिरगावातील खोताची वाडीत लहानाचा मोठा होताना समजले की मनमोहन देसाई आपल्या घरापासून अवघ्या पाच सात मिनिटांवरील खेतवाडीतील प्रताप निवासमध्ये राहतात. मग कधी ते घराबाहेर पडल्यावर युनियन हायस्कूलजवळच्या देवळासमोर उभे राहून नमस्कार करताना दिसत. कधी डाॅ. भडकमकर मार्गावरील अप्सरा थिएटरसमोरील गिल्डन मैदानावर टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळताना दिसत. ते ज्या क्रिकेट संघाचे पदाधिकारी होते तो फलक आजही कायम असून त्या विभागात कधीही गेलो तरी त्या फलकाचे मी दर्शन घेतो.(Manmohan Desai)
मी मिडियात आल्यावर ‘दिग्दर्शक मनमोहन देसाई ‘ यांच्या भेटीचे व मुलाखतीचे छान योग आले. मनजी दिलखुलास मनसोक्त मनमुराद बोलत. त्यांच्या बोलण्यात कसलाही आडपडदा नसे. अमिताभ बच्चनशी त्यांची जमलेली जोडी हा एका अख्ख्या मुलाखतीचा विषय होता. १९९१ च्या एका दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झाली. आपल्या चित्रपटाच्या मुहूर्ताना व सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी ते आम्हा सिनेपत्रकारांना आवर्जून आमंत्रित करीत. मला आजही अंधेरीतील नटराज स्टुडिओतील ‘गंगा जमुना सरस्वती’ या चित्रपटाचा मुहूर्त आठवतोय. फार धमाल अनुभव होता. मुहूर्त दृश्यात असलेल्या ऋषि कपूरने लगोलग हा चित्रपट सोडला. चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत आपला मुलगा केतन देसाई दिग्दर्शित ‘अल्लारखा ‘च्या सेटवर आम्हास बोलावले असता सेटबाहेर ते दूरचित्रवाणीवर कसोटी क्रिकेट सामना पाहण्यात रमले होते.
सोबत शम्मी कपूरही होता. हेच ‘मन’मौजी अथवा ‘फन’मोहन देसाई दोनदा मात्र चिंतेत दिसले. मला आठवतय, ‘गंगा जमुना सरस्वती’ हा आपल्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट असेल असे त्यांनी खूपच अगोदर जाहीर केले. या चित्रपटाच्या अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील पूर्णतेच्या पार्टीत ते त्यामुळेच भावनाविवश वाटले. त्यांच्यातील संवेदनशील माणूस दिसला. आपला आवडता कलाकार राज कपूरने आपल्या पहिल्याच दिग्दर्शनातील चित्रपटात भूमिका साकारल्याने आपण आनंदात आहोत ( चित्रपट ‘छलिया’), पण आपले आवडते संगीतकार नौशाद यांच्यासोबत उत्कट प्रेमकथा चित्रपट मात्र करु शकलो नाही हेही ते म्हणाले. तर ‘गंगा जमुना सरस्वती’चा मुंबईवरील आम्हा समिक्षकांना मेट्रो थिएटरमधील फर्स्ट डे फर्स्ट शोची पब्लिकसोबत चित्रपट पाह्यची तिकीटे दिली असता मध्यंतरमध्ये ते व केतन देसाई आम्हाला भेटायला आले असता त्यांना चित्रपटाच्या व्यावसायिक भवितव्याबाबत अंदाज आला होता असे वाटले.
============
हे देखील वाचा : ‘दो राहा’ पोस्टरवरचा ‘A’ ठरला चक्क गर्दीचा…
============
मनमोहन देसाई माझ्या अतिशय आवडत्या दिग्दर्शकांनी एक. सत्तरच्या दशकात त्यांनी राजेश खन्ना व हेमा मालिनी या रोमॅन्टीक जोडीच्या “बाजीराव मस्तानी ” या भव्य दिमाखदार महत्वाकांक्षी चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटसृष्टीच्या ट्रेड पेपरमध्येही जाहिरातही दिली. पण हा चित्रपट बनलाच नाही. आजच्या त्यांच्या जन्मदिवसानिमित्त या काही विशेष आठवणी. त्यांच्या सुपरहिट पिक्चर्सची नावे सच्चा झूठा, रोटीपासून कुली, मर्दपर्यंत बरीच आहेत. ती वेगळी सांगायला नकोतच.