Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं

Famous Studio आता पडद्याआड चालला!
गोरेगाव पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील फिल्मीस्तान स्टुडिओच्या विक्रीची बातमी जुन्या आठवणीत नेत असतानाच त्याचे पाडकामही सुरु झाले आणि अंथेरी पूर्वेकडील महाकाली येथील कमाल अमरोही स्टुडिओच्या (पूर्वीचे नाव कमालीस्तान स्टुडिओ) जागेवर वेगाने व्यावसायिक संकुल उभे राहताना दिसत आहे. यापाठोपाठ मुंबईतील आणखी एक चित्रपट स्टुडिओ काळाच्या पडद्याआड जात असल्याचे वृत्त समजले पण त्यात फारसे आश्चर्य वाटले नाही. आणि धक्कादेखील बसला नाही. मुंबईतील बॉम्बे टॉकीज (मालाड), नटराज (अंधेरी, पूर्व), फिल्मालय (आंबोली), कामराज (परेल), आर. के (चेंबूर) असे अनेक चित्रपट स्टुडिओ हे एकेक करत बसस्थानकावरील नावापुरतेच राहिलेत हादेखील चित्रपटसृष्टीचा एक प्रवास आहे. तो स्वीकारायला हवाच.
फेमस स्टुडिओ पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी स्टेशनपासून फक्त एक बसस्थानक अंतरावर. चालत सात आठ मिनिटे. ई. मोसेज रोडवर अतिशय मोक्याच्या जागेवरचे ठिकाण. साडेसहा स्वेअर मिटर्स अशा जागेवर २ जून १९४३ रोजी या स्टुडिओच्या बांधकामास सुरुवात झाली आणि १९४५ साली तो कार्यरत झाला. यात चित्रीकरणासाठी मोठाच स्टेज, साऊंड रेकॉर्डिंग, मिक्सिंग, मिनी थिएटर व अनेक लहान मोठ्या निर्मात्यांची कार्यालये ही या स्टुडिओची वैशिष्ट्य. चेतन आनंद, देव आनंद व विजय आनंद यांनी आपल्या नवकेतन फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली तेव्हा याच स्टुडिओत १४७ क्रमांकाच्या जागेत त्यांनी आपले कार्यालय सुरु केले.

पहिलाच चित्रपट ‘अफसर’ (१९५०). साधारण सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत येथे नवकेतन फिल्मचे कार्यालय होते. मुंबईची सीमारेषा फार पूर्वी वांद्रा सायनपर्यंत असताना हा स्टुडिओ मध्यभागी होता. मग प्रथम अंधेरीपर्यंत आणि मग मुलुंड/ बोरिवलीपर्यंत मुंबई उभी आडवी पसरताना हा स्टुडिओ एका बाजूस राहिला तरी सतत कार्यरत राहिला. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झालेच पण मनोरंजन उपग्रह वाहिनीच्या युगात रिएॅलिटी शो, म्युझिकल शोज, म्युझिक अल्बम यांचे अतिशय मोठ्याच प्रमाणावर सातत्याने चित्रीकरण होत राहिले. अनेक जाहिरातपटांचेही येथे चित्रीकरण होत राहिले.
================================
हे देखील वाचा : Ramesh Sippy यांचे ‘न आलेले चित्रपट’ ही मोठेच
=================================
फार पूर्वी येथे प्रसिद्ध चित्रपट प्रसिध्दी प्रमुख बनी रुबेन यांचे याच स्टुडिओत प्रशस्त कार्यालय होते. बनी रुबेन हे राज कपूरची आर. के. फिल्म, आनंद बंधुंची नवकेतन फिल्म, बी. आर. चोप्रा यांची बी. आर. फिल्म, यश चोप्रा यांची यशराज फिल्म, गुलशन रॉय यांची त्रिमूर्ती फिल्म अशा त्या काळातील आघाडीच्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या चित्रपटांची प्रसिध्दी यंत्रणा सांभाळत. त्यामुळे या फेमस स्टुडिओत अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पूर्वप्रसिध्दीचे कामकाज झाले आहे. अनेक मोठे निर्माते व दिग्दर्शक बनी रुबेन यांच्या भेटीसाठी फेमस स्टुडिओत येत व आपल्या चित्रपटाचे कॅम्पेन आखत. या स्टुडिओच्या गौरवशाली इतिहासात ही गोष्ट विशेष उल्लेखनीय. बनी रुबेन यांना भेटण्यासाठी मी १९८३ साली या स्टुडिओत पहिल्यांदाच गेलो आणि तेव्हापासून आजपर्यंत या स्टुडिओत सातत्याने जात आहे. (Entertainment News)

याच स्टुडिओत दुसर्या मजल्यावर असलेल्या मिनी थिएटरमध्ये अनेक मराठी व हिंदी चित्रपट पाहण्याचा मला सातत्याने योग येत आहे. आणि त्यात काही आठवणीही आहेत. जॉन मॅथ्युज दिग्दर्शित ‘सरफरोझ’ या चित्रपटाच्या वेळेस एक रिळ मागेपुढे झाल्याने अचानक चित्रपट बराच पुढे गेला होता. अर्थात खेळ थांबवून मग ती चूक सुधारली. प्रियांका चोप्राने आपली भूमिका असलेल्या ‘व्हॉट्स युवर राशी’ या चित्रपटाचा आम्हा काही निमंत्रितांसाठी येथेच आयोजित केलेल्या शोला तिने प्रत्येकाचे हसून स्वागत केले आणि चित्रपट पूर्ण होईपर्यंत ती थांबली. अवधूत गुप्ते यांनी आपल्या ‘झेंडा’ या चित्रपटाची कला प्रेमी राज ठाकरे यांजसाठी येथेच विशेष खेळाचे आयोजन केले होते. आम्हा चित्रपट समीक्षकांच्या खेळास येथे अनेक कलाकार उपस्थित राहिलेत. आता नवीन चित्रपटाच्या फर्स्ट लूक सोहळ्याचे येथे मोठ्याच प्रमाणावर आयोजन करण्यात येत असताना अनेक कलाकार या स्टुडिओत येतात. फेमस स्टुडिओच्या ग्लॅमरमध्ये ती भरच म्हणायची.
याच स्टुडिओत तळमजल्यावर मागील बाजूस कामत फोटो फ्लॅश यांचे अतिशय प्रशस्त कार्यालय होते. अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे सेटवरचे फोटो (त्याला स्टील फोटोग्राफी म्हणतात), चित्रपट पूर्ण होताच त्याच्या पूर्वप्रसिध्दीचे खास फोटो सेशन अशी कामत फोटो फ्लॅशची खास वैशिष्ट्य. त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीचा चौफेर इतिहास जपलाय. कालांतराने त्यांचे कार्यालय अंधेरी पश्चिमेकडे गेले. फेमस स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक. फार पूर्वी नवोदित कलाकार येथील निर्मात्यांच्या कार्यालयाना सदिच्छा भेट देऊन आपले फोटो देत. त्या काळात असे फोटो सेशन करणे अनेक नवोदित कलाकारांना महाग वाटत असे. पण निर्मात्यांना तर भेटायला हवे. फेमस स्टुडिओत तळमजल्यावरील कॅन्टीनमध्ये अधूनमधून सुशोभीकरण करण्यात येत असे. (Mumbai’s film studio history)
================================
हे देखील वाचा : Kamalistan Studio च्या खाणाखुणा मिटत चालल्यात…
=================================
फेमस स्टुडिओ इतिहासजमा झाल्यावर तेथे उत्तुंग इमारती उभ्या राहणार आहेत आणि ते अपेक्षितच आहे. आज मुंबई उभी वाढतेय. उंच उंचच चकाचक इमारती उभ्या राहताहेत आणि त्यातील काहींच्या मुळाशी जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे आणि चित्रीकरणाचे स्टुडिओ आहेत. जुन्या काळातील चित्रपटातील श्रेयनामावलीत मिक्सिंग फेमस स्टुडिओ असे कायमच वाचायला मिळेल. खरं तर मुंबईतील अशा पडद्याआड जात असलेल्या चित्रपट स्टुडिओवर एखाद्या माहितीपटाची निर्मिती व्हायला हवी. तो एक चित्रपटसृष्टीचा इतिहास आहे, जुन्या मुंबईची ओळख आहे…