हिटच्या ट्राॅफिज राहिल्या फक्त आठवणीत…
राजेश खन्ना ‘चित्रपटाच्या सेटवर’ मुलाखत देण्यापेक्षा खारच्या आपल्या आशीर्वाद फिल्मच्या ऑफिसमध्ये आम्हा सिनेपत्रकारांना अगदी सवडीने आणि एका दिवशी एकाच पत्रकाराला स्वतंत्रपणे आणि बराच काळ मुलाखत देणे पसंत करे. स्वारीचा मूड चांगला हवा इतकेच. (“कुछ भी पुछो” हे त्याचं स्वातंत्र्य जास्त भारी होतं). पण व्हायचं काय? त्याच्यापेक्षा त्याच्या मागे असलेल्या सिल्व्हर वा गोल्डन ज्युबिली ट्राॅफिजकडे जास्त लक्ष जायचं. बरं त्याचे इतके पिक्चर्स सुपर हिट की, त्या ट्राॅफिजच त्याचं यश सांगत होत्या.(Hit Movie Trophies Memory)
सुलोचनादीदींच्या घरीही अशाच अनेक मराठी व हिंदी चित्रपटांच्या यशाच्या ज्युबिली ट्राॅफिज लक्ष वेधून घेणार हे ठरलेलेच. त्या मांडणीतील आत्मियता मला कायमच जाणवे आणि त्यांनी अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा साकारल्यात हेही त्यात अधोरेखित होई. कलाकाराचे घर असावे तर असे असं कायमच मला वाटतं आलं.(Hit Movie Trophies Memory)
आमच्या गिरगावातील जुन्या राॅक्सी थिएटरमध्ये अनेकदा पिक्चर पाहायला जाणे होई. तेव्हा लाॅबी कार्ड्स, शो कार्ड्सबरोबरच एका शोकेसमधील ज्युबिली हिट ट्राॅफिज बघण्यात विशेष आनंद होई. खरं तर प्रत्येक वेळी त्याच त्याच अथवा त्यात आणखीन एकादी नवीन भर पडे इतकेच. पण पुन्हा पाहण्यातही गंमत असे. एक फूल दो माली, आराधना, अमर प्रेम, कटी पतंग, कुंवारा बाप, स्वर्ग नरक, एक दुजे के लिए यांच्या ज्युबिली हिट ट्राॅफिज असत. (Hit Movie Trophies Memory)
राजकमल कलामंदिर स्टुडिओत आजही राजकमल फिल्मच्या दो आंखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, नवरंग, पिंजरा यांच्या ज्युबिलीसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, राज्य चित्रपट पुरस्कार लक्ष वेधून घेतात. ते एक प्रकारचे वैभव आहे. इतिहास आहे. आठवणी आहेत. चित्रपट स्टुडिओ, रेकाॅर्डिंग स्टुडिओ, निर्माता व दिग्दर्शकांची कार्यालये, कलाकारांची घरे, एकाद्या तंत्रज्ञाचे घर, तेव्हाची पारंपरिक सिंगल स्क्रीन थिएटर्स यात अशा अनेक ट्राॅफिज पाहायला मिळत. तो एक वेगळाच आनंद असे. ती देखील एक छान संस्कृतीच.(Hit Movie Trophies Memory)
पिक्चर हिट झाले रे झाले एक ट्राॅफिज आपल्याकडे येणार याची खात्री असे. आणि त्याचा सोहळाही छान रंगे. यशाचे सेलिब्रेशन करावे ते फिल्मवाल्यांनी. माझ्या आठवणीत मी अनुभवलेले असे अनेक ज्युबिली हिट ट्राॅफिज देण्याचे इव्हेन्टस आहेत.
दादा कोंडके यांनी जितेंद्रच्या शुभ हस्ते ‘पळवापळवी ‘च्या सिल्व्हर ज्युबिली हिट ट्राॅफिजचे दिलखुलास वितरण केले. कौतुकाची गोष्ट अशी, दादांनी या इव्हेन्टसला अशोक सराफ, सचिन पिळगावकर व महेश कोठारे यांनाही आवर्जून आमंत्रित केले. नेमका त्या दिवसांत लक्ष्मीकांत बेर्डे कोल्हापूरला होता. अन्यथा त्या काळातील ‘टाॅप फाईव्ह’ एकाच सोहळ्यात असा मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय दुर्मिळ योग आल्याचे आणि भेटीचा योग आला असता. (Hit Movie Trophies Memory)
जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये किरण शांताराम निर्मित व सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी ‘च्या गोल्डन ज्युबिली हिटच्या ट्राॅफिज चित्रपती व्ही. शांताराम आणि दिलीपकुमार यांच्या शुभ हस्ते देण्यात आल्या, तेव्हा व्ही. शांताराम व दिलीपकुमार यांना एकत्र पाहणे, ऐकणे, अनुभवणे, डोळ्यात साचवणे हा आयुष्यभर जपून ठेवावा असाच क्षण ठरला. चित्रपटाची यशोगाथा अशीही पुढे वाटचाल करत असते. सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एका पेक्षा एक’च्या ज्युबिली हिट सोहळ्यास निर्माते सतिश कुलकर्णी यांनी खास अमिताभ बच्चनलाच आमंत्रित करण्यात यश प्राप्त केले. अमिताभची ही मराठीतील पहिली उपस्थिती. आदबशीर अशी शाल लपेटून अमिताभ आला होता. मला आठवतय त्याच दिवशी त्याची भूमिका असलेला मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’ प्रदर्शित झाला. अमिताभच्या येण्याने ‘एकापेक्षा एक ‘च्या यशाची उंची आणखीन वाढली.
विजय कोंडके निर्मित व दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ ची सक्सेस पार्टी अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उशीरापर्यंत रंगली. खासदार सुनील दत्त पाहुणे होते. तर विजय कोंडके यांनी आवर्जून हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या हस्तींना बोलावून मराठीचं वैभव त्यांना दाखवले. (Hit Movie Trophies Memory)
एन. चंद्रा दिग्दर्शित ‘प्रतिघात ‘च्या ज्युबिली हिट पार्टीचे राजश्री प्राॅडक्सन्सच्या वतीने आयोजन गेट वे ऑफ इंडियाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करताना ‘ओली पार्टी’ न करता फक्त ट्राॅफिज वाटप आणि शाकाहारी मेन्यू असा ठेवल्याची बरेच दिवस ‘सुकी सुकी’ चर्चा रंगली. हे वेगळेपणही म्हणता येईल. ज्युबिली हिटची पार्टी म्हणजे शॅम्पेन आणि स्काॅचच हवी असे थोडेच आहे?
गुलशन राॅय हे त्या काळातील चित्रपट निर्मिती (त्रिमूर्ती फिल्म) आणि वितरण (माॅडर्न मुव्हीज) यातील मोठे प्रस्थ. त्यांनी आपला पुत्र राजीव राॅय दिग्दर्शित ‘त्रिदेव ‘च्या यशाची केम्प्स काॅर्नरच्या हाॅटेलमध्ये आयोजित केलेल्या पार्टीला पिक्चरमधील सगळ्या स्टार कास्टने हे यश भारीच एन्जाॅय केले.(Hit Movie Trophies Memory)
पिक्चर ज्युबिली झाले की, आता पार्टी हमखास हे समीकरण त्या काळात एकदम हिट होते. आणि तो सगळाच ऑखो देखा हाल माझ्यासाठी सुखद पर्वणीच ठरला. तेवढ्या आठवणींची साठवणी माझ्याकडे वाढत वाढत गेली, त्याचं व्याज आज मला मिळतयं. त्या लाईव्ह आठवणी आज मी नवीन पिढीसमोर आणतोय.
======
हे देखील वाचा : मराठीशी असलेले छान नाते..!
======
पिक्चर आजही सुपर हिट होताहेत. प्रमाणात घट झालीय इतकेच. पण ते ज्युबिलीचे दिवस इतिहासजमा झालेत. जास्तीत जास्त चार सहा आठवडे हिटचा मुक्काम. पण ‘हिटची ट्राॅफिज’ही आठवणीत गेली. हेही ठीक हो, पण अनेकदा हिटच्या ओल्या पार्टीत फक्त आणि फक्त त्या चित्रपटातील वरच्या अथवा पहिल्या फळीतीलच आमंत्रित असं का? चित्रपट निर्मिती हे भलं मोठ टीमवर्क आहे. पूर्वी अशा इव्हेन्टसमध्ये अनेक टेक्निशियन्स आणि मुंबईसह बाहेरगावच्या थिएटरवाल्यानाही ट्राॅफिज आवर्जून प्रेमाने ट्राॅफिज दिली जाई आणि त्यांचा चित्रपटाच्या यशातील सहभाग मोलाचा मानला जाई… जे अनुभवलं तेच सांगतोय हो. प्रत्येक पिक्चर हिट व्हायला हवा. त्याच्या आनंद सोहळ्यात सर्वांनाच सहभागी करता यायला हवे. बघा पटतंय का?