जम्पिंग जॅक जितेंद्रला त्याचा पहिला सुपरहिट सिनेमा ‘फर्ज’ कसा मिळाला?
अभिनेता जितेंद्र खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाला तो ऐंशीच्या दशकामध्ये. श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यासोबत त्यांनी तब्बल २५ हून अधिक सिनेमे या काळात केले आणि जवळपास सर्व यशस्वी झाले. पण करीअरच्या सुरुवातीला पहिली काही वर्षे जितेंद्रला खूप स्ट्रगल करावा लागला होता. शांताराम बापूंच्या ‘नवरंग’ पासून त्याने रुपेरी पडल्यावर पाऊल ठेवले असले तरी पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती १९६७ साली आलेल्या ‘फर्ज’(Farz) या चित्रपटापासून. हा चित्रपट त्याला कसा मिळाला याची देखील एक रंजक स्टोरी आहे.
१९६६ साली तेलगूमध्ये ‘गुडाचारी वन वन सिक्स’ हा एक चित्रपट आला होता. ही एक स्पाय मूवी होती आणि प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटांमध्ये कृष्णा (अभिनेता महेश बाबूचे वडील) आणि जय ललिता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट निर्माते सुंदरलाल नहाटा यांनी या गाजलेल्या चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक करायचे ठरवले. त्यासाठी ते सुरुवातीला फिरोज खान यांच्याकडे गेले. परंतु फिरोज खान यांनी आपण केवळ एक शिफ्टमध्ये काम करतो आणि डेट्सचा प्रश्न असल्यामुळे सिनेमात काम करायला नकार दिला.
त्यानंतर निर्माते शशी कपूर यांच्याकडे गेले. शशीने एक लाख बारा हजार रुपये मानधन म्हणून सांगितले. तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हतेच. चित्रपटाचे बजेटच कमी होते. त्यानंतर निर्माते मनोज कुमार यांना भेटले मनोज कुमार यांनी कथानक ऐकल्यानंतर स्पाय मूव्हीज या सी ग्रेड सिनेमाचे लक्षण आहे असे सांगून सिनेमा नाकारला. शेवटी निर्माते सुंदरलाल नहाटा यांनी या भूमिकेसाठी जितेंद्रला विचारले. तो पर्यंत तो एक फ्लॉप स्टार म्हणून ओळखला जात होता. कारण त्याच्या नावावर तो वर एक ही हिट सिनेमा नव्हता. त्याने लगेच काम करायला होकार दिला आणि ३५००० मानधनावर त्याने सिनेमा साईन केला. सिनेमाची नायिका म्हणून बबीताची निवड झाली. चित्रपटाचे दिग्दर्शक रविकांत नागाईच होते. त्यांनीच या चित्रपटाचे छायाचित्रण देखील केले होते. हिंदीमधील हा तसा ऑफिशियल पहिला बॉण्ड पट होता!(Farz)
चित्रपट सुरुवातीला प्रेक्षकांना फारसा अपील झाला नाही. पहिले आठ दहा आठवडे सिनेमाने कसाबसा थिएटरमध्ये तग धरला. जितेंद्रला आपल्या करिअरची मोठी काळजी होती. त्यामुळे त्याने बाराव्या आठवड्यानंतर थिएटर मालकांना सांगितले, ”कृपा करून तुम्ही हा सिनेमा थिएटर मधून काढू नका. तुमचे जे काही नुकसान होईल ते मी भरून द्यायला तयार आहे!” अशा पद्धतीने जितेंद्रने स्वतः तिकिटांची खरेदी करून सिनेमा पंधरा आठवड्यापर्यंत थेटरमध्ये टिकू दिला. तोपर्यंत या चित्रपटातील गाण्यांनी आणि माऊथ पब्लिसिटीने वेग घेतला आणि पंधराव्या आठवड्यानंतर सिनेमाने प्रचंड वेग घेतला.
सिनेमा सुपर डुपर हिट झाला. इतका की या सिनेमाच्या काही नवीन प्रिंट तयार करून त्या पुन्हा नवीन थिएटरमध्ये रिलीज कराव्या लागल्या! जितेंद्रने केलेला जुगाड कामी आला. या चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते. या चित्रपटात एकूण सहा गाणी होती आणि सर्व गाणी लोकप्रिय ठरली होती. सर्वात गाजले ते ‘मस्त बहारों का मै आशिक…’ हे गाणे. या गाण्यातील जितेंद्रचा अटायर जबरदस्त होता. जितेंद्र यांनी रेडिओवरील एका मुलाखतीत सांगितले की, ”या सिनेमाचे बजेट कमी असल्यामुळे प्रत्येक जण या सिनेमाचे कॉस्ट्यूम्स स्वतःच आपल्या घरून आणत होता.” या गाण्यातील जितेंद्रने घातलेले पांढरे बूट ही नंतर त्याची आयडेंटिटी झाली.
=========
हे देखील वाचा : ‘शान त्रेचाळीस वर्षाचा झाला..’
=========
या चित्रपटातील ‘हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने’ हे मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेले गाणं खूप गाजले. (याच गाण्याच्या चालीवर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील एक गाणे घेतले होते.) रफी आणि लता परस्परांसोबत गात नसल्यामुळे रफीसोबत सुमन कल्याणपुर यांचे ‘तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत ना मैंने करनी थी मगर मेरे दिल ने मुझे धोका दे दिया…’ हे गाणे या गाण्यातील जितेंद्रचा डान्स खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटातील बर्थडे सॉंग आज देखील प्रचंड लोकप्रिय आहे. ‘बार बार दिन ये आये बार बार दिल ये गाये तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू हॅपी बर्थडे टू यू’ या चित्रपटापासूनच डान्स पाहून त्याला ‘जम्पिंग जॅक’ ही पदवी रसिकांनी दिली.(Farz)
या सिनेमाला कुठलेही अवॉर्ड त्यावर्षी मिळाले नाही. परंतु आज जवळपास ५५ वर्षे झाली तरी या चित्रपटाची जादू उतरलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी नागाईच यांना तर हे कथानक एवढे आवडले की त्यांनी स्वतःच या सिनेमाचे दोनदा रीमेक केले. पहिल्यांदा १९७३ साली ‘किमत’ या नावाने त्यांनी हाच चित्रपट पुन्हा एकदा बनवला त्यावेळी नायक धर्मेंद्र होता. तर त्यानंतर आठ वर्षांनी १९८१ साली पुन्हा एकदा जितेंद्रला घेऊन त्यांनी हाच चित्रपट बनवला आणि त्याचे नाव ‘रक्षा’ ठेवले!