
संगीतकार R D Burman यांनी ‘या’ सोलो गाण्याचे ड्युएटमध्ये कसे रूपांतर केले?
लोकप्रिय गाण्यांच्या मेकिंगच्या कथा भन्नाट असतात. आपण जेव्हा या मेकिंगच्या गोष्टी ऐकतो तेव्हा चकित व्हायला होतं. त्या काळात खरोखरच किती सर्वांगीण विचार केला जायचा. आपली प्रत्येक कलाकृती हि दर्जेदारच व्हायला पाहिजे याची सर्वजण काळजी घ्यायचे. आणि त्या पद्धतीने तशी जाणीवपूर्वक कृती करायचे. असाच काहीसा प्रकार गीतकार गुलजार यांनी लिहिलेल्या एका गाण्याबाबत झाला होता. या गाण्यात खरंतर आधी फक्त लता मंगेशकरच गाणार होत्या परंतू, संगीतकार आर डी बर्मन यांनी या सोलो गाण्याचे ड्युएट मध्ये रूपांतर केले आणि किशोर कुमार यांना या गाण्यातील फक्त अंतरा गाण्यासाठी बोलावले. ते देखील गाणं संपल्यानंतर अगदी शेवटी ! असं कां करावे लागले? याचं कारण निर्माता (एन एन सिप्पी) आणि दिग्दर्शक (माणिक चटर्जी) यांना या गाण्यात किशोर कुमार यांचा स्वर नको होता. त्यांना फक्त लताचा स्वर हवा होता. मग आर डी बर्मन यांनी काय जुगाड करून किशोर चा स्वर या गाण्यात घेतला? हे गाणे तुम्हा सर्वांचे लाडके गाणे आहे. कोणते होते ते गाणे आणि कोणता होता तो सिनेमा ? मोठा इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. (R D Burman Movies)

१९७७ साली निर्माता एन एन सिप्पी यांनी एका चित्रपटाची निर्मिती करायची ठरवले. चित्रपटाचे नाव होतं ‘घर’. या चित्रपटाची गाणी गुलजार यांनी लिहिली होती तर संगीत आरडी बर्मन यांचे होते. चित्रपटात रेखा आणि विनोद मेहरा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिग्दर्शक होते माणिक चटर्जी. चित्रपटातील गाणी किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले गाणार होते. हा सिनेमा आज देखील एक कल्ट क्लासिक म्युझिकल हिट सिनेमा म्हणून ओळखला जातो. यातील ‘आपकी आंखो मे कुछ महके हुए से ख्वाब है..’ हे लता आणि किशोरचे ऑल टाइम हिट असे ड्युएट होते. किशोरकुमार यांच्या स्वरात एक सोलो गीत देखील होते ‘फिर वही रात है…’ या गाण्याल चांगली लोकप्रियता मिळाली होती.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील सोलो गीत ‘आजकल पांव जमीं पर नही पडते मेरे…’ तर भन्नाट बनले होते. या चित्रपटात आणखी एक गाणं होतं ‘तेरे बिना जिया जायेना…’ हे गाणं आधी फक्त लता मंगेशकर गाणार होत्या. पण संगीतकार आर डी बर्मन यांना हे गाणे सोलो न ठेवता ड्युएट करावे असे वाटले. तसे त्यांनी निर्माता एन एन सिप्पी आणि दिग्दर्शक माणिक चटर्जी यांना सांगितले. परंतु, दोघांनीही याला नकार दिला. आर डी बर्मन यांनी हर तऱ्हेने समजावून सांगितले की “ गुलजार यांच्या शब्दातून हे गाणं जर युगलगीत स्वरूपात आलं तर चित्रपटातील नायक नायकांचे प्रेम हे आणखी सशक्तपणे आपल्याला दाखवता येईल.” पण निर्माता दिग्दर्शक ऐकायला तयार नव्हते.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
तेव्हा संगीतकार आर डी बर्मन यांनी एक जुगाड करायचे ठरवले. त्यांनी रेकॉर्डिंगला किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांना बोलावले. सकाळच्या सत्रात किशोर कुमार यांचे ‘फिर वही रात है..’ हे गाणे रेकॉर्ड केले. त्यानंतर किशोर कुमारला स्टुडिओमध्येच थांबायला सांगितले. या गाण्यानंतर लताच्या आवाजात ‘तेरे बिना जिया जाये ना..’ हे गाणे रेकॉर्ड केले. या गाण्याची रेकॉर्डिंग झाल्यानंतर हे गाणे त्यांनी किशोर कुमार यांना ऐकवले आणि नंतर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना बोलावून सांगितले की,”किशोर आता या गाण्याला जोडून तुला काही ओळी गायच्या आहेत.” तेव्हा किशोर कुमार म्हणाला,” या गाण्याबद्दल मला निर्मात्याने काहीच सांगितले नाही.” त्यावर पंचम यांचे म्हणणे होते, “बरोबर आहे. त्यांना हे गाणे फक्त सोलोच हवे आहे. पण मला हे गाणे ड्युएट स्वरूपात पाहिजे आहे. त्यामुळे हे गाणं आणि या गाण्यातील शेवट तुझ्या स्वराने व्हावा असे वाटते. तुला फक्त या गाण्याचा मुखडा गायचा आहे आणि मला माहिती आहे निर्मात्याला हे गाणे सोलो स्वरूपात हवे असल्याने या गाण्याचे तुला कुठलेही पेमेंट देऊ शकत नाही पण तू गायलास तर खूप उपकार होतील!”
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
किशोर कुमार पंचम दा यांचा हात हातात घेऊन म्हणाले ,”मित्रा तू सांगतोयस तर मी नक्की गाणार!” त्यानंतर किशोर कुमारने या गाण्याचा फक्त मुखडा गायला. पंचमने तो मुखडा मुख्य गाण्याला जोडून घेतला. अशा प्रकारे सोलो गाण्याचे ड्युएट गीतात रूपांतर झाले. आज तुम्ही हे गाणं ऐकलं तर तुमच्या असं लक्षात येईल की गाण्यातील ९५% सुरुवातीचा पोर्शन हा फक्त लताने गायला आहे शेवटी अगदी काही मिनिटे किशोर कुमार येतो आणि गाण्याचा मुखडा गावून जातो. गाण्याचे रेकॉर्डिंग तर झाले पण जेव्हा गाण्याच्या पिक्चरायझेशनची वेळ आली तेव्हा पंचमने संपूर्ण गाणे निर्माता आणि दिग्दर्शकाला ऐकवले. किशोरचा स्वर ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. पण किशोरने ज्या रोमँटिक सॉफ्ट आवाजात ते गाणं गायलं होतं ते त्यांना आवडलं आणि त्यांनी चित्रपटातील सिच्युएशन बदलून गाणे चित्रित केले. किशोरच्या स्वराने गाण्याला पूर्णत्व प्राप्त झाले. पण किशोर कुमार ला या गाण्याचे क्रेडीट कधीच मिळाले नाही. कॅसेट वर आणि रेकॉर्ड वर या गाण्याची गायिका लता मंगेशकर यांचेच नाव आहे!