मुसाफीर : ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट!
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शन शैलीमुळे रसिकांच्या मनात घर केलेले ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांचं हिंदी सिनेमासाठीचे योगदान फार मोलाचं आहे. त्यांना १९९९ साली सिनेमाच्या दुनियेतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांनी दिलीप कुमार (मुसाफिर), देवआनंद (असली नकली), राजकपूर (अनाडी) राजेश खन्ना (आनंद, नमक हराम, बावर्ची) अमिताभ बच्चन (आनंद,नमक हराम जुर्माना, मिली, बेमिसाल) या पाच सुपरस्टार्स सोबत काम केले आहे. सत्तरच्या दशकामध्ये हलक्या फुलक्या कथानकाला कलात्मक उंची देत त्यांनी एकाहून एक सरस कलाकृती दिल्या. ऋषिकेश मुखर्जी यांचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट कोणता होता? काय वैशिष्ट्य होतं या सिनेमाचं ? आणि भारतीय सिनेमांमध्ये या सिनेमाचं महत्त्व काय होतं?
ऋषिकेश मुखर्जी सुरुवातीला संकलक म्हणून भारतीय सिनेमाच्या दुनियेत आले. ते बिमल रॉय यांचे सहाय्यक होते. बिमलदा यांना त्यांचं काम खूप आवडत असे. ‘देवदास’ आणि ‘मधुमती’ या बिमलदा यांच्या चित्रपटाचे ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) सहाय्यक दिग्दर्शक होते. याच काळात या दोन्ही सिनेमांचे नायक दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री झाली.
दिलीप कुमार देखील यांनी देखील ऋषिदाचे टॅलेंट ओळखले होते. सेटवर असताना ते बऱ्याचदा त्यांना म्हणत की ,”आता तू स्वतंत्र दिग्दर्शक व्हायला पाहिजे. तुझ्यामध्ये ते सर्व कॅलिबर आहे. बिमलदा यांचे सर्व संस्कार तुझ्यामध्ये आलेले आहेत.” ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) हसत हसत मुद्दा टाळायचे. एकदा दिलीप कुमार यांनी सांगितले, ”तुझ्या पहिल्या सिनेमात मी एक पैसाही न घेता काम करेन !” पन्नासच्या दशकात दिलीप कुमार त्याकाळी मोठे सुपरस्टार होते ते सांगतील ते मानधन द्यायला निर्माते एका पायावर तयार होते. असे असताना दिलीप कुमार मात्र ऋषिकेश मुखर्जी यांच्याकडे एक पैसाही न घेता चित्रपटात काम करायला तयार झाले.
ऋषिकेश मुखर्जी हे देखील मग गंभीरपणे चित्रपट निर्मितीचा विचार करू लागले आणि त्यातूनच त्यांचा पहिला चित्रपट आला १९५७ साली ‘मुसाफिर’. हा चित्रपट भलेही व्यावसायिक दृष्ट्या फारसा सफल झाला नसला तरी कल्ट क्लासिक म्हणून या चित्रपटाची गणना होते. अलीकडे करण जोहर वगैरे मंडळींनी एकाच सिनेमात वेगवेगळ्या कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांनी १९५७ साली म्हणजे जवळपास ६०-६५ वर्षांपूर्वी हा प्रकार केला होता. ‘मुसाफिर’ हा चित्रपट अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण होता. या चित्रपटात दिलीप कुमार, उषा किरण, सुचित्रा सेन, किशोर कुमार, डेव्हिड, मोहन चोटी , केस्टो मुखर्जी, निरूपा रॉय, नासिर हुसेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
चित्रपटात तीन वेगवेगळ्या कथा जरी असले तरी त्या तिन्ही कथांना एका धाग्याने बांधून ठेवण्यामध्ये ऋषिदा कमालीचे यशस्वी झाले होते. तो धागा होता ते घर. ज्या घरात तीन कुटुंब एका पाठोपाठ येतात आणि राहून जातात. या चित्रपटाच्या पहिल्या कथेत शेखर आणि सुचित्रा सेन या नव विवाहित दांपत्याची गोष्ट आहे. या दोघांनी प्रेम करून लग्न केल्यामुळे घरच्यांचा त्यांना अजिबात पाठिंबा नसतो. पण सुचित्रा सेन आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्व कुटुंबीयांना एकत्र आणते. या दोघांना रोज रात्री व्हायोलीनचे सूर ऐकू येत असतात. ते त्याची विचारणा करतात. कुणी तरी पगला बाबू रात्री व्हायोलीन वाजवतो असे सांगितले जाते.
सुचित्रा घराच्या अंगणातील बागेमध्ये रोपट लावते. नंतर हे कुटुंब घर सोडते . घराच्या दारावर पुन्हा to let चा बोर्ड लागतो. घर मालक डेव्हिडच्या घरात आता तिथे एक विधवा स्त्री (निरुपा रॉय) आणि तिचा धाकटा दीर (किशोर कुमार) राहायला येतो. किशोर कुमार यात बेकार असतो. परिस्थितीला कंटाळून तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो पण त्याने प्राशन केलेलं विष बनावटी असल्यामुळे तो वाचतो. यात किशोर कुमारला एक सुंदर गाणं होतं ‘मुन्ना बडा प्यारा अम्मी का दुलारा…’ कथा पुढे सरकते आणि किशोर कुमारला दुसऱ्या गावी नोकरी मिळते आणि ते कुटुंब तिथून स्थलांतरित होतं. बागेतील झाड आता वाढलेले असते. घराच्या दारावर पुन्हा to let चा बोर्ड लागतो.
त्यानंतर तिथे उषाकिरण आणि तिचा अपंग मुलगा राहायला येतो. मुलाच्या अपंगात्वामुळे ती खूप दुःखी असते. या तिन्ही कुटुंबांना एक व्हायलीन वाजवणारा पगला बाबूचे स्वर ऐकू येत असतात. हा कुणाला दिसत नसतो. पण त्या अपंग मुलाला तो दिसतो. त्यांची मैत्री होते. तो पगला बाबू त्याच्या मनात उभारणी निर्माण करतो. त्या अपंग मुलात सुधारणा होवू लागते. उषा किरणच्या लक्षात येते की तो व्हायोलीन वाजवणारा पगला बाबू तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आहे! जो आता कॅन्सरने ग्रस्त आहे. चित्रपटाच्या शेवटी पगला बाबू मृत्यू पावतो पण त्यावेळी त्याचा छोटा दोस्त आता चालू लागतो. अंगणातील बागेतील झाडाला आता फळ फुले आलेले असतात.
=========
हे देखील वाचा : ‘या’ अभिनेत्याने साकारली होती रेपिस्ट ‘बलात्कारी’ भूमिका!
=========
तीन भिन्न कथा घेऊन हा चित्रपट बनवला गेला. वास्तु माणसाच्या आयुष्यात मोठी भूमिका करत असते. ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांनीच ही कथा लिहिली होती जी फार सुंदर रित्या पडद्यावर आणली होती. या चित्रपटाचा स्क्रीन प्ले ऋत्विक घटक आणि राजेंद्र सिंह बेदी यांनी लिहिला होता. कमल बोस यांचे छायाचित्रण होतं . चित्रपटाला संगीत सलील चौधरी यांचे होतं तर सिनेमातील सगळी गाणी शैलेंद्र यांनी लिहिलेली होती.
हा चित्रपट आज आठवला जातो तो दिलीप कुमार यांनी आयुष्यात एकमेव गायलेल्या गाण्यासाठी. लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी या चित्रपटातील गाणे गायलं होतं ‘लागी नाही छूटे राम चाहे जिया जाये…’ चित्रपटात हे गाणे दिलीप कुमार आणि उषा किरणवर चित्रित आहे. आज ‘मुसाफिर’ (Hrishikesh Mukherjee) हा चित्रपट युट्युब नि:शुल्क वर उपलब्ध आहे. रसिकांनी तो नक्की पहावा त्या काळात किती धाडसी प्रयोग निर्माते दिग्दर्शक करत होते हे आपल्या लक्षात येईल.