
लहानग्या Hrithik Roshan याने डान्स करून जितेंद्रची छुट्टी करून टाकली होती!
आजचा सुपरस्टार ह्रतिक रोशन याने अभिनेता जितेंद्र यांच्या एका सिनेमातील गाण्यात डान्स करून जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. आता तुम्ही म्हणाल जितेंद्रचे करिअर संपल्यावर ह्रतिक सिनेमात आला मग या दोघांच्या एकत्रित डान्स आणि गाण्याचा प्रश्न येतोच कुठे? बरोबर आहे. पण हा प्रसंग घडला तेंव्हा रितिक बालकलाकार होता!
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अभिनेता ह्रतिक रोशन याच्याबाबतीत हे खर आहे. कारण तो सहा वर्षाचा असताना त्याने त्याच्या आजोबांच्या म्हणजे जे. ओम प्रकाश यांच्या एका चित्रपटात एका गाण्यांमध्ये डान्स केला होता. हा डान्स त्याला न सांगता शूट केला होता. हा डान्स इतका जबरदस्त होता की, या चित्रपटाचा नायक जितेंद्र, दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांना म्हणाला,” कृपया या मुलाला माझ्यासोबत आता या चित्रपटात आणखी एकही शॉट देऊ नका. लोकं माझ्या डान्सच्या नावाने शिमगा साजरा करतील!! इतका सुंदर डान्स या मुलाने इथे केला आहे!!” कोणता होता तो चित्रपट आणि ह्रतिक रोशन ने कोणत्या गाण्यावर इतका चांगला डान्स केला होता
४ मार्च १९८० रोजी रिलीज झालेला ‘आशा’ हा जे ओम प्रकाश यांनी दिग्दर्शित सिनेमा त्या वर्षीचा बंपर हिट सिनेमा होता. या सिनेमाने त्यावर्षी बॉक्स ऑफिसवर दुसरा क्रमांक मिळवला होता. यातील सर्वच गाणी जबरदस्त गाजली. सिनेमा म्युझिकल हिट होता. चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. तर गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. चित्रपटांमध्ये जितेंद्र, रीना रॉय, रामेश्वरी, गिरीश कर्नाड सुलोचना लाटकर, मास्टर भगवान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे कथानक कौटुंबिक होते. मेलोड्रामा होता. भारतीय महिलांना आवडणारे कथानक होते.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
या चित्रपटात मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि नरेंद्र चंचल यांनी गाणी गायली होती. मोहम्मद रफी यांचं या चित्रपटातील एक गाणं होतं.’ जाने हम सडक के लोगो से महलो वाले क्यूं जलते है…’ या गाण्याचे चित्रिकरण चालू असताना जे ओम प्रकाश यांचा सहा वर्षाचा नातू रितिक रोशन तिथे उपस्थित होता. त्याला या गाण्याचे म्युझिक विशेषतः इंटरल्युड म्युझिक खूप आवडलं होतं आणि तो त्या म्युझिक वर एकटाच नाचत असायचा. त्याचे आजोबा जे ओम प्रकाश यांनी त्याला विचारलं,” तुला इतकं गाणं आवडलं का?” तेव्हा लहानगा ह्रतिक म्हणाला,” हो मला याचं म्युझिक खूप आवडलं.”

जे ओम प्रकाश यांनी एक आयडिया केली. त्याला न सांगता कॅमेरा सेट केला आणि गाणं लावलं आणि त्याला डान्स करायला लावला. अगदी परफेक्ट स्टेप्स त्याने यामध्ये घेतल्या होत्या. गंमत म्हणजे यासाठी कोणीही कोरिओग्राफर वापरला नव्हता. त्याने स्वतःच्या मनाने त्या स्टेप्स घेतल्या होत्या. सर्व कृ मेंबर्सने ह्रतिकच्या डान्स स्टेप्स कौतुक केलं. जितेंद्रला तर हा डान्स इतका आवडला की त्याने जे ओम प्रकाश यांना सांगितलं,” कृपया आता या मुलाकडून या सिनेमात आणखी एक ही शॉट घेऊ नका. नाहीतर लोकं माझ्या डान्सच्या नावाने शिमगा करतील!” जितेंद्रचे हे सर्टिफिकेट अक्षरशः खरं ठरलं. ह्रतिक मोठा झाल्यानंतर डान्सिंग स्टार म्हणूनच ‘कहो ना प्यार है’ या सिनेमातून लोकांच्या समोर आला.
‘आशा’ या चित्रपटात ‘शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है’ हे लता मंगेशकर यांनी गायलेलं अप्रतिम गाणं होतं. आनंद बक्षी यांनी आयुष्याची फिलॉसॉफी या गाण्यात फार सुंदर रित्या मांडली होती. लताने देखील फार सुंदर हे गाणं गायला होतं. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे रिना रॉय यांना यात कुठलेही जास्त ॲक्शन करायचं नव्हत्या. एका जागी उभे राहून त्यांना हे गाणं गायचं होतं. फक्त फेशियल एक्सप्रेशन आणि हाताच्या काही हालचाली करायच्या होत्या. या गाण्याला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. बिनाका गीतमाला मध्ये त्यावर्षीचे हे टॉपचे गाणे होते.

या चित्रपटात मोहम्मद रफी आशा भोसले आणि नरेंद्र चंचल यांनी गायलेलं वैष्णोदेवीचे भक्ती गीत असलेलं ‘तुने मुझे बुलाया शेरावालीये मै आया मै आया शेरावालीये….’ गाणं होते हे गाणं देखील प्रचंड गाजलं. गंमत म्हणजे हे गाणं या चित्रपटासाठी लिहिलंच नव्हतं. हे गाणं १९७७ साली सुरू झालेल्या ‘दो वक्त की रोटी’ या चित्रपटासाठी लिहिलं होतं आणि रेकॉर्ड झालं होतं. परंतु हा चित्रपट पुढे बंद पडल्यामुळे जे ओम प्रकाश यांनी हे गाणं त्या निर्मात्याकडून विकत घेतलं आणि आपल्या चित्रपटात वापरलं. जितेंद्र आणि रामेश्वरी यांच्यावर हे गाणं चित्रीत झालं होतं.
वैष्णो देवीच्या भक्तांसाठी हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. या गाण्याची दुसरी गंमत म्हणजे ‘आशा’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर ‘दो वक्त की रोटी’ या चित्रपटावर पुन्हा काम सुरू झालं आणि त्या चित्रपटात देखील हे गाणे घेतले गेले. परंतु त्या चित्रपटाच्या एलपी रेकॉर्डवर हे गाणे घेता आलं नाही कारण याचे राइट्स आता ‘आशा’ या चित्रपटाचे निर्माते जे ओम प्रकाश यांच्याकडे आले होते. अशा प्रकारे रफी आणि चंचल यांनी गायलेलं गाणं दोन चित्रपटात आपल्याला दिसते .
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
=================================
या चित्रपटात गिरीश कर्नाड यांची चांगली भूमिका होती खरं तर ही भूमिका आधी संजीव कुमार यांना ऑफर झाली होती पण त्यांनी ती नाकारली. रामेश्वरी या अभिनेत्रीची निवड तिच्या राजश्री प्रॉडक्शनच्या ‘दुल्हन वोही जो पिया मन भाये..’ या चित्रपटातील अभिनय पाहून झाली होती. खरंतर या भूमिकेसाठी रंजीता आणि रिता भादुरी यांचा विचार झाला होता पण त्या दोघींना बाजूला ठेवून रामेश्वरी ची निवड झाली. चित्रपटाची कथा राम केळकर यांची होती. जे ओम प्रकाश यांचा हा एक ब्लॉकबस्टर हिट सिनेमा होता. जितेंद्रच्या करिअरला देखील आकार देणारा हा सिनेमा होता. सर्वांचा अभिनय अप्रतिम झाला होता. या चित्रपटाला तब्बल सहा नामांकन मिळाली होती.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना या चित्रपटाच्या संगीतासाठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर नॉमिनेशन मिळाले होते परंतु पारितोषिक लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनाच मिळाले पण ‘कर्ज’ या चित्रपटासाठी. ‘आशा’ चित्रपट त्यावर्षीच्या बॉक्स ऑफिस वरील दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला पहिला चित्रपट अर्थातच फिरोज खानचा ‘कुर्बानी’. पण ‘आशा’ने अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटांना त्या वर्षी मागे टाकले होते हे नक्की. हा चित्रपट पुढे तमिळ आणि तेलुगु मध्ये रिमेक झाला.