मध्यरात्री ‘या’ अप्रतिम भक्तीगीताची चाल सुचली!
संगीतकार वसंत प्रभू यांचे हे शताब्दी वर्ष चालू आहे. अतिशय प्रतिभावान, गुणी परंतु तितकेच कम नशिबी असे या संगीतकाराचे वर्णन करावे लागेल. कारण कला कारकीर्द ऐन बहरात असतानाच त्यांनी या दुनियेतून वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी एक्झिट घेतली. आज वसंत प्रभूना आपल्यातून जाऊन देखील पन्नास वर्षाचा कालावधी लोटला असला तरी त्यांच्या भावगीतांची, भक्ती गीतांची जादू रसिकांवर कायम आहे. त्याकाळी एकीकडे आशा भोसले-गदिमा-सुधीर फडके ही त्रयी रसिकांवर छाप टाकत होती तर त्याचवेळी दुसरीकडे लता मंगेशकर-पी सावळाराम आणि वसंत प्रभू ही दुसरी त्रयी देखील रसिकांच्या मनात घर करत होती. वसंत प्रभू यांच्याकडे जास्तीत जास्त गाणी लता मंगेशकर यांनी गायली असली तरी देखील आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांना देखील काही गाणी त्यांच्या संगीत नियोजनात गायला मिळाली आणि ती गाणी देखील तितकीच कर्ण मधुर आणि मधाळ बनली. काही गीतांच्या सुरावटी बनण्यासाठी काही क्षणांचा कालावधी देखील पुरेसा असतो. तो एक दैवी क्षण असतो ज्यावेळी अचूकपणे सर्व भाव त्या गीतात उतरतात आणि एक स्वर्गीय स्वर सुरांचे अप्रतिम गीत जन्माला येते. असेच एक गीत आशा भोसले यांनी वसंत प्रभू यांच्याकडे गायले होते. या गीताचे गीतकार होते रमेश आणावकर. ही गीत निर्मिती ज्यांच्या समोर झाली होती त्या दस्तुरखुद्द संगीतकार बाळ चावरे यांनीच हा किस्सा मला सांगितला.(Song Story)
संगीतकार वसंत प्रभू दादर परिसरात असलेल्या पोर्तुगीज चर्चला राहत होते. आजही त्यांचे कुटुंबीय तिथेच राहतात. दरवर्षी गणपती उत्सवात वसंत प्रभूंच्या घरी शास्त्रीय संगीताच्या मैफिली होत असत. देशातील अनेक मोठे कलाकार या मैफलीमध्ये गाण्यासाठी येत. १९६३ साली वसंत प्रभू यांच्याकडे अब्दुल रहमान खान साहेब हे गायला आले होते. त्यांनी त्या रात्री केलेल्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमात त्यांनी कौशि कानडा हा दुर्मिळ राग गाऊन रसिकांची मने जिंकली. मैफल संपली पण डोक्यातून कौशि कानडाचे सूर काही जात नव्हते. संगीतकार वसंत प्रभूंना त्या सुरांनी अक्षरशः वेड लावले. त्याच रात्री दोन वाजता ते या सुरांच्या धुंदीतच त्यांच्या शेजारी राहत असणाऱ्या संगीतकार बाळ चावरे यांच्या घरी गेले आणि या मैफिली बद्दल आणि या रागाबद्दल बोलू लागले. लगेच बाळ चावरे यांना त्यांनी हार्मोनियम काढायला सांगितले आणि हार्मोनियम वर ते कौशिकानडा रागाच्या सुरावटी वाजवू लागले. ते इतके बेभान होऊन या सुरांना आळवू लागले की, त्यातून एक सुंदर सुरावट जन्माला आली. (Song Story)
संगीतकार बाळ चावरे यांनी त्याचे नोटेशन्स लगेच लिहून ठेवले! आणि नंतर काही दिवसांनी आशा भोसले यांच्या स्वरात या चालीवर एक अप्रतिम भक्ती गीत तयार झाले. रमेश अणावकर लिखित या गीताचे बोल होते ‘नाम घेता तुझे गोविंद मनी वाहे भरुनी आनंद…’ त्या भारावलेल्या क्षणी मध्यरात्री दोन वाजता सुचलेली ही चाल आणि त्यावर आधारित हे गीत आज साठ वर्षानंतर देखील रसिकांना लख्ख आठवते हेच या गाण्याचा वैशिष्ट्य आहे. संगीतकार बाळ चावरे यांनी ही आठवण स्वतः मला सांगितले होती. आज संगीतकार बाळ चावरे ९० वर्षाचा टप्पा ओलांडून शतकाकडे जात आहेत. पण त्यांच्या स्मृती अजूनही शाबूत आहेत. पोर्तुगीज चर्च जवळील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी गप्पा मारणे हा एक अतिशय संस्मरणीय असा अनुभव आहे. वसंत प्रभूंच्या सोबत काम केलेला कदाचित हा शेवटचा मालुसरा असावा!(Song Story)
======
हे देखील वाचा : शाहीर उमप यांनी गायलेले ‘हे’ भारुड साठ वर्षाचे झाले
======
जाता जाता थोडंसं संगीतकार वसंत प्रभू यांच्या बाबतीत संगीतकार वसंत प्रभू यांचा जन्म 19 जानेवारी 1924 या दिवशी झाला त्यांचा जन्म नाव व्यंकटेश प्रभू होता त्यांनी सुरुवातीला काही चित्रपटातून बालकलाकार म्हणून भूमिका देखील केल्या. काही वर्ष एचएमव्ही मध्ये ते संगीतकार म्हणून देखील कार्यरत होते. उणी पुरी बारा पंधरा वर्षाची त्यांची संगीत कारकीर्द. पण या छोट्याशा कालखंडात त्यांनी अतिशय अप्रतिम आणि मधाळ अशी गाणी रसिकांसाठी सादर केली. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का, कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला, घट डोईवर घट कमरेवर, रघुपती राघव गजरी गजरी,राधा कृष्णावरी भाळली,राधा गौळण करिते,रिमझिम पाऊस पडे सारखा, सप्तपदी हि रोज चालते,प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला,मधु मागसी माझ्या सख्या परी, हसले आधी कुणी…अशी अप्रतिम गाणी वसंत प्रभू यांनी दिली पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटाला संगीत दिले होते. १३ ऑक्टोबर १९६७ रोजी वसंत प्रभू यांचे निधन झाले.