Independence Day 2022 Special: सिनेमा एक श्वास ते सिनेमा कोटी कोटीची उड्डाणे…
काळासोबत बदल होतच असतात आणि ते अगदी स्वाभाविकही आहे. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या पंचाहत्तर वर्षाच्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षाच्या दीर्घ वाटचालीत भारतीय चित्रपटसृष्टीतही लहान मोठ्या स्तरांवर अगणित बदल होत राहीले आणि त्यात अनेक बदलांसह काही बिघाडही झाले आहेत, हे नाकारुन चालणार नाही. दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ (प्रदर्शन ३ मे १९१३) च्या निर्मितीने रुजवलेले चित्रपट हे दृश्य माध्यम व त्याचा व्यवसाय हा स्वरुप बदलत वाटचाल करतोय. (Independence Day 2022)
हिन्दुस्तान आणि पाकिस्तान (पूर्व आणि पश्चिम) अशी फाळणी होताना अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, गायक व संगीतकारां वगैरेंनीही त्यासह देशांतर केले (उदाहरणार्थ नूरजहा पाकिस्तानला गेली.). तसेच काही चित्रपटगृह मालकही पाकिस्तानला गेले. तर मुंबईतील अनेक जुन्या चित्रपटगृहांचे मूळ मालक एखादी त्या काळातील ब्रिटिश कंपनी, तसेच एखादी पारशी अथवा पारसी व्यक्ती असल्याचे लक्षात येईल.
फाळणीनंतर देशांत असलेल्या आशावादी, स्वप्नाळू वातावरणाचे प्रतिबिंब चित्रपटातही पडणे स्वाभाविक होतेच. सोळा अथवा पस्तीस एमएमच्या ‘कृष्ण धवल’ अर्थात ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपटांचा तो काळ होता. आणि हळूहळू तांत्रिक प्रगती होत गेली. त्या काळात चित्रपती व्ही. शांताराम, मेहबूब खान, राज कपूर हे प्रामुख्याने आपल्या चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जात. मराठीत भालजी पेंढारकर यांचे नाव आघाडीवर होते. (मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखीन नावे घेता येतील. पण ती सूची ठरेल.)
गुरुदत्त दिग्दर्शित आणि अभिनित गुरुदत्त फिल्मचा ‘कागज के फूल’ (१९६४) हा आपल्याकडचा पहिला सिनेमास्कोप चित्रपट निर्माण झाला. राज कपूर दिग्दर्शित आणि अभिनित आर. के. फिल्मचा ‘संगम’ (१९६४) हा आपल्याकडचा पहिला दोन मध्यंतरचा चित्रपट निर्माण झाला. आर. के. फिल्मचा हा पहिला रंगीत चित्रपट होय. एव्हाना हिंदीत रंगीत चित्रपटाचे युग रुजण्यास वेग आला होता. तरीदेखील आणखीन काही वर्षे ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपट निर्माण होत होते. (Independence Day 2022)
चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित राजकमल कलामंदिरचा ‘इये मराठीचेही नगरी’ (१९६५) हा मराठीतील पहिला रंगीत चित्रपट निर्माण झाला. पांछी दिग्दर्शित ‘अराऊंड द वर्ल्ड’ ( १९६७) हा आपल्याकडचा पहिला सत्तर एमएमचा चित्रपट निर्माण झाला. चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ (१९७२) हा रंगीत चित्रपट यशस्वी ठरल्यावर मराठीत रंगीत चित्रपटाचे युग. हळूहळू रुजायला लागले तरी मराठी चित्रपट पूर्ण रंगीत व्हायला आणखीन आठ दहा वर्षे जावी लागली.
त्या काळात अनेक चित्रपट निर्मिती संस्थांचा दबदबा निर्माण झाला होता. (उदाहरणार्थ राजकमल कलामंदिर, आर. के. फिल्म, नवकेतन, बी. आर. फिल्म इत्यादी). रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’च्या (१९७५) सत्तर एमएम आणि ‘स्टीरीओफोनिक साऊंड सिस्टीम’ याला रसिकांचा तडाखेबाज प्रतिसाद मिळाल्यावर हिंदीत एकीकडे ॲक्शनपॅक्ड मसालेदार मनोरंजक चित्रपटांची, तर दुसरीकडे मल्टीस्टार कास्ट चित्रपटाचे युग आले.
हिंदी चित्रपटाच्या वाटचालीचा वेध घेताना ‘शोले’पूर्वीचा आणि नंतरचा अशी मांडणी केली जाते. ‘शोले’नंतर आम्ही चित्रपट पाहणे कमी केले, असे सांगणारे चित्रपट रसिक अनेक आहेत. आणि मग ‘शोले’ ते सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (१९९४) असा एक टप्पा आहे. हम आपके…. नंतरचा काळ आता सुरु आहे. जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था यानंतरचा तो काळ आहे आणि त्याचा चित्रपटसृष्टीवर प्रभाव पडला आहे. या एकूणच प्रवासात बरेच लहान मोठे प्रवाह आहेत.
त्यात १९६५ पर्यंतचा काळ हा चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ मानला जातो. तेव्हाची अगणित गाणी आजही ऐकली आणि पाहिली जातात. या श्रवणीय गाण्यामुळे तेव्हाचे अनेक चित्रपट रसिकांच्या अनेक पिढ्या ओलांडूनही लोकप्रिय आहेत. अथवा या गाण्यांनी ते चित्रपट पुढील पिढीत आले वा पोहचले.
यातच १९७५ पर्यंतचा काळ हा चित्रपट म्हणजे श्वास, चित्रपट म्हणजे सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी, चित्रपट म्हणजे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन, चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा, चित्रपट म्हणजे तहान भूक विसरुन निर्मिती असे मानले जात होते. (Independence Day 2022)
एकीकडे असा प्रवास तर दुसरीकडे दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद यांचा पन्नासच्या दशकापासूनच समाजावर विलक्षण प्रभाव होता. शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना’ (१९६९) राजेश खन्नाचा झंझावात सुरु झाला. वय वर्ष सात ते सत्तर असा त्याचा विलक्षण चाहतावर्ग निर्माण झाला. त्याची जबरा क्रेझ म्हणजे एक प्रकारचा हिस्टेरियाच होता.
प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३) च्या यशाने अमिताभ बच्चनच्या ‘सूडनायक ‘ प्रतिमेचे वादळ आले. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ (१९७५) च्या यशाने अमिताभ बच्चनचे पर्व सुरु झाले. याच दशकात स्टार सिस्टीम आणि त्यांचे महागडे मानधन ही गोष्ट रुजली. (फार पूर्वी मोठे अनेक स्टार एकाद्या ‘स्टुडिओत मासिक पगारा’वर नोकरी करत. अशोककुमार, दिलीपकुमार हे बाॅम्बे टाॅकीजमध्ये नोकरी म्हणून त्यांच्या चित्रपटात भूमिका साकारत.) कोण किती मानधन घेतो याला महत्त्व येत गेले. आता त्याच्या बातम्या होऊ लागल्या. पंचाहत्तर वर्षांत चित्रपट मिडियाही खूपच बदलला हा वेगळा विषय आहे. विश्लेषणाची जागा गाॅसिप्स, ग्लॅमर यांनी घेतली.
मुंबईत २ ऑक्टोबर १९७२ रोजी दूरदर्शन माध्यमाचे आगमन होताच प्रत्येक शनिवारी जुना मराठी व प्रत्येक रविवारी जुना हिंदी चित्रपट प्रक्षेपित होऊ लागताच थिएटरच्या पडद्यावरचा पिक्चर घरात आला. हळूहळू हा छोटा पडदा हातपाय पसरु लागला. दशकभरात म्हणजे १९८२ साली देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ यांचे आगमन होताच चित्रपट आता आणखीन जवळ आला. घरबसल्या जुने आणि नवे चित्रपट पाहता येऊ लागले. याच काळात चोरट्या मार्गाने व्हिडिओ कॅसेट येऊ लागली. व्हिडिओ थिएटर ही संस्कृती आली. याच काळात ‘रिपिट रन’ आणि ‘मॅटीनी शो’ हे कल्चर मागे पडत गेले.
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधाची चर्चा सुरु झाली. दशकभराने म्हणजे १९९२ साली देशात उपग्रह वाहिन्यांचे आगमन झाले आणि काही वर्षांतच चौवीस तासांची चित्रपट वाहिनी सुरु झाली. १९९७ साली गुजरातमध्ये मल्टीप्लेक्स आले आणि नवीन संस्कृती उदयास आली. या संस्कृतीने देशभरात लहान मोठ्या शहरात वाटचाल करताना जुन्या एकपडदा चित्रपटगृहांना बाजूला अथवा मागे सारले. दरम्यान लॅपटॉप, कॅम्युटर, पेन ड्राईव्ह असे करता करता ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत आपण येऊन पोहचलो. आपल्यापर्यंत चित्रपट पोहचण्याची ही तांत्रिक प्रगती थक्क करणारी आहे. (Independence Day 2022)
अमृत महोत्सवापर्यंतचा चित्रपटसृष्टीचा प्रवास बहुस्तरीय आहे. या काळात मुंबईतील अनेक जुने चित्रपट स्टुडिओ काळाच्या पडद्याआड गेले (काही नावे सांगायची तर, बाॅम्बे टाॅकीज, रणजीत, कारदार, रुपतारा, वसंत, आशा, ज्योती, प्रकाश, फिल्मालय, नटराज, आर. के. वगैरे), तर काही अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त नवीन स्टुडिओही कार्यरत झाले. (ओशिवरातील यशराज, कर्जतचा एन. डी.वगैरे). त्याचबरोबर काशिमीरा, ठाणे – घोडबंदर रोड ते सफाळे असे अनेक छोटे मोठे स्टुडिओ कार्यरत झाले. या वाटचालीत चित्रपटांसह मालिका, वेबसिरिज, रिॲलिटी शो, म्युझिक अल्बम, रिल्स अशी निर्मिती वाढली.
मराठी चित्रपटाचा पंचाहत्तर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास असाच मोठा विषय आहे. साठच्या दशकात वसंत पेंटर, राजा परांजपे, अनंत माने, दिनकर द. पाटील, राजा ठाकूर अशा अनेक दिग्दर्शकांची सद्दी होती. सत्तरच्या दशकात दादा कोंडके यांचे प्राबल्य होते. त्यातच रंजनाने आपल्या अष्टपैलू अभिनयाने आणि सुषमा शिरोमणीने आपल्या निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय यांच्या डॅशिंगपणाने आपला ठसा उमटवला. (Independence Day 2022)
ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या काॅमेडी चित्रपटाचे युग आले. दिग्दर्शनात राजदत्त, स्मिता तळवलकर यांचे स्थान होते. विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ (१९९१) चित्रपटाने सामाजिक, कौटुंबिक चित्रपटांची लाट आणली. अलका आठल्येला सोशिक नायिका म्हणून ग्रामीण भागात भरपूर लोकप्रियता प्राप्त झाली.
संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ (२००३) चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सुवर्ण पदक आणि भारताची ऑस्करसाठीची प्रवेशिका म्हणून निवड होताच मराठी साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व माध्यम क्षेत्रात अतिशय उत्स्फूर्त अशी सकारात्मक प्रतिक्रिया उमटली. मराठी चित्रपट निर्मितीमधील उत्साह वाढला, तो आजही तसाच कायम राहिलाय.
२०२२ च्या पहिल्या दशकाच्या उत्तरार्धात चित्रपटाची प्रिन्ट ही पारंपारिक पध्दत मागे पडून डिजिटल युगात प्रवेश झाला आणि एकाच वेळेस अनेक ठिकाणी चित्रपट प्रदर्शित होऊ लागला. हिंदी चित्रपट देशविदेशातील अनेक मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित होत होतेच, त्यात अनेक मराठी चित्रपटही एकाच वेळेस मोठ्याच प्रमाणात प्रदर्शित होऊ लागले.
दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट मोठ्याच प्रमाणावर तिकडील तेलगू, मल्याळम, कन्नड व तमिळ भाषेसह हिंदीत डब होत प्रदर्शित होऊ लागलेत आणि या सगळ्यात चित्रपटाच्या गुणवत्तेची चर्चा मागे पडून तो किती कोटीत निर्माण झाला आणि त्याने किती कोटींची अवाढव्य कमाई केली या आकड्यांना महत्त्व आले. त्यामुळेच चित्रपटसृष्टीबद्लचा जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यांचे प्रेम आणि सहानुभूती याला ओहोटी लागली.
आजची मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे मौज, मजा, मस्ती, गुलछबूपणा, अफाट अमर्याद पैसे अशी तर प्रतिमा (मेज) एस्टॅब्लिज झालेली नाही ना? साधारण चाळीस वर्षापूर्वीपर्यंत, “पिक्चर दिलसे बनती है, पैसे से नही”, असे म्हटले जाई आणि त्यात तथ्य होते. त्याच भावनेवर ही चित्रपटसृष्टी जगली, वाढली, रुजली आणि अनेक प्रकारची आव्हाने, संकटे पचवू शकली.
========
हे देखील वाचा – इंग्रजी चित्रपटांच्या विचित्र हिंदी नावांचे अलेक्झांड्रा थिएटर
=========
या अमृत महोत्सवी वाटचालीत रेडिओ, ग्रामोफोन (तबकडी), इराणी हाॅटेलमधील ज्यूक्स बाॅक्सपासून गाण्याचा प्रवास सुरु झाला आणि ध्वनीफित, चित्रफित, उपग्रह वाहिनी, यू ट्यूब असा विस्तारला. चित्रपटात गीत, संगीत व नृत्य हे आपल्या देशातील हिंदी आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपट यांचे खास वैशिष्ट्य आहे.
आपल्या देशात मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश, तुळू, सिंहली, बंगाली, राजस्थानी, भोजपुरी, तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, कोंकणी, नेपाळी वगैरे अनेक भाषांतील चित्रपटाची निर्मिती होते. वर्षभरात या सगळ्या भाषेतील मिळून साधारण बाराशे चित्रपट निर्माण होतात. राष्ट्रीय चित्रपट महोत्सव, भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पॅनोरमा विभाग, थर्ड आय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मामी चित्रपट महोत्सव, कोलकत्ता आणि केरळ चित्रपट महोत्सव यातून यातील अनेक चित्रपट दाखल होतात.
काही राज्यांचे चित्रपट महोत्सव तसेच अनेक लहान मोठ्या शहरातील चित्रपट महोत्सव, कान्स चित्रपट महोत्सवातील मार्केट विभागासाठी तीन मराठी चित्रपट, जगविख्यात ऑस्कर पुरस्कारासाठी दरवर्षी एखाद्या भारतीय भाषेतील चित्रपटाची प्रवेशिका असा हा खूपच मोठा असा विस्तारलेला आणि बहुरंगी, बहुढंगी असा अमृत महोत्सवी वर्षापर्यंतचा चौफेर आणि सखोल प्रवास आहे. हा सगळाच ट्रेलर वाटावा अशीच ही वाटचाल आहे.