भारतातील पहिला एक कोटी रुपये बजेट असलेला सिनेमा
बॉलीवूड आणि काळा पैसा यांचं नातं खूप जुनं आहे अगदी सिनेमाच्या सुरुवातीपासून ! सत्तरच्या दशकात तर अनेक अंडरवर्ल्डचे डॉन चित्रपटात पैसा गुंतवत होते. नव्वदच्या दशकात त्याचा कहर झाला होता. तेच लोक बॉलीवूड चालवत होते. कुणीही निर्माता ऑफिशिअल चित्रपटाचे बजेट कधीही सांगत नव्हते. अंडरवर्ल्ड, भ्रष्टाचारी लोकांना काळा पैसा पांढरा करण्याचा एक गोरख धंदा एक राजमार्ग म्हणजे चित्रपट तयार करणे असे सूत्र बनले होते. असं असतानाही अगदी साठच्या दशकाच्या शेवटी एका निर्मात्याने आपल्या चित्रपटाचा एकूण खर्च एक कोटी झाला आहे असे जाहीर रित्या सांगितले होते. (Indian Cinema Budget)
खरंतर त्याच्यासाठी ही एक मोठी रिस्क होती कारण हा एवढा पैसा तुझ्याकडे आला कुठून असे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याला विचारू शकत होते. पण त्याने ही हिम्मत दाखवली. अर्थात त्या काळात अनेक चित्रपटांची निर्मिती ही करोडो रुपयांची होत होतीच. पण हे निर्माते कधीही आपल्या चित्रपटाला एवढा खर्च झाला असे दाखवत नव्हते. ते कायम आपला चित्रपटाचा खर्च लाखांमध्ये दाखवत होते. असे असताना या निर्मात्याने मात्र धाडसाने आपल्या चित्रपटाला एक कोटी रुपये खर्च झाले आहेत असे सांगितलेच आणि त्याचे जाहीर प्रकटन त्याने आपल्या सिनेमाच्या पोस्टवरच केले ! त्यामुळे हा भारतातील पहिला ऑफिशियल एक कोटी रुपयांचा चित्रपट ठरला! हा चित्रपट कोणता होता? आणि कोणत्या निर्मात्याने हे धाडस दाखवले ? त्याचाच हा भन्नाट किस्सा.
खरंतर साठच्या दशकामध्ये कितीतरी बिग बजेट सिनेमा बनत होते. उदाहरणार्थ मुघल ए आजम, गंगा जमुना, संगम…. परंतु याच्या निर्मात्याने कधीही आपल्या सिनेमाचे खरे बजेट सांगितलेच नाही. पण १९६९ साली प्रदर्शित झालेल्या यांच्या ‘तलाश’ या चित्रपटाचे बजेट एक कोटी आहे आणि तो पैसा सिनेमा निर्मितीसाठी खर्च झाला आहे असे सांगितले गेले. या सिनेमाचे निर्माते होते ओ पी रल्हन. त्यांनी तर या सिनेमाच्या पोस्टरवरच एक कोटी रुपये खर्च असे जाहीर केले होते. त्यामुळे ही भारतातील पहिली ऑफिशियल एक कोटी रुपयांची मूवी होती.
या सिनेमांमध्ये राजेंद्रकुमार, शर्मिला टागोर, बलराज सहानी, ओ पी रल्हन, हेलन, जीवन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शर्मिलाचा या सिनेमात डबल रोल होता. या चित्रपटातील गाणी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती तर संगीत सचिन देव बर्मन यांनी दिले होते. या सिनेमाची गाणी अतिशय अप्रतिम बनली होती. पलको के पीछे से क्या तुमने फरमाया फिर से तो फरमाना, आज तो जुनली रात मा धरती पार है आतमा, खाई है रे हमने कसम संग रहने की, उसको नही देखा हमने कभी पर उसकी जरूरत क्या होगी वो मा तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी…. ही आणि अशी अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. (Indian Cinema Budget)
त्या काळात राजेंद्र कुमारचा प्रत्येक सिनेमा हा सिल्वर जुबली होत असल्यामुळे त्याला जुबली कुमार असेच नाव पडले होते. परंतु एवढा खर्च करून देखील हा चित्रपट मात्र सुपरफ्लॉप झाला. त्या काळात तरी या सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. नंतर सत्तरच्या दशकात मात्र मॉर्निंग मॅटीनी शोमध्ये हा संपूर्ण देशात अनेक ठिकाणी पुन्हा रिपीट रनला सिनेमा येत होता. त्या काळात याची गाणी देखील खूप गाजली गेल्यामुळे या सिनेमाला नंतर चांगले यश मिळत गेले. पण ज्यावेळी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता त्यावेळी मात्र या सिनेमाने अगदी आठवड्याभरातच मान टाकली होती. या सिनेमाचं एक मराठी कनेक्शन म्हणजे यातील आईची भूमिका सुलोचना लाटकर यांनी केली होती आणि त्यांच्यावर ‘मेरी दुनिया है मां तेरे आंचल में.. हे अप्रतिम गीत जे सचिन ते बर्मन यांनी स्वतःच्या स्वरात गायलं होतं, चित्रित झालं होतं. तसेच या चित्रपटातील एका शास्त्रीय गाण्यांमध्ये शाहू मोडक यांचे दर्शन झाले होते. हे गाणं त्यांच्यावर चित्रित होतं. गाण्याचे बोल होते ‘ तेरे नैना तलाश कर….’
============
हे देखील वाचा : मनोज कुमारमुळे बदललं प्रेम चोप्रा यांचं आयुष्य
============
शर्मिला टागोर ची चांगली अदाकारी देखील चित्रपटाला त्या काळात यश मिळवून देऊ शकली नाही ! एक कोटी रुपये बजेट असलेला आणि ऑफिशिअल तसे डिक्लेअर करून बनवलेला ‘तलाश’ मात्र सुरुवातीला सुपर फ्लॉप झाला होता.