बायस्कोप (Bioscope Memories) – सत्तरच्या दशकातील गल्ली चित्रपटाच्या धमाल आठवणी
“देखो देखो देखो…बायस्कोप देखो…दिल्ली का कुतुब मिनार देखो…” दुलाल गुहा दिग्दर्शित ‘दुश्मन’ (१९७२) मध्ये मुमताजने अतिशय नटखटपणे साकारलेले गाणे म्हणजे चित्रपट पाहण्याच्या एका संस्कृतीची ती विशेष ओळख आहे. दिसायला छोटी गोष्ट पण कायमच आठवणीत राहणारी. (Indian Bioscope Memories)
पन्नाशी ओलांडलेले फिल्म दीवाने तर एव्हाना आपल्या लहानपणीच्या आठवणीत रमून गेले असतील आणि आपल्या गल्लीत डोक्यावर ‘बायस्कोप’ घेऊन फिरणारा ‘सिनेमावाला’ आठवला असेल. काही बायस्कोपना छोटासा ग्रामोफोन असे आणि छोटी तबकडी लावून मोठ्या आवाजात गाणे ऐकावे लागे. असे एकादे गाणे लांबून जवळ जवळ येऊ लागले की समजावे बायस्कोपवाला आला, आता स्लाईडस पाह्यला मिळणार. (त्या काळात पाच पैसेही उपयुक्त होते, कारण एक पैसा, दोन पैसे अशी नाणी वापरात होती.)
छोट्या शहरात अथवा ग्रामीण भागात एखादी महिला असा बायस्कोप घेऊन फिरायची. मला आजही आठवतेय आमच्या गल्लीत असा ‘फिरता सिनेमावाला’ आला रे आला की वडीलांकडून पाच पैसे घेऊन कधी एकदा त्या छोट्या ‘विंडो’त डोकावतोय असे व्हायचे. त्यात काय पाहायला मिळे, तर मोजून पाच स्लाईडस. स्थिर चित्र. फिल्मचा एक तुकडा. अगदी लहान वयात त्या स्लाईडसवरचे चेहरे ओळखता येत नसत. फक्त समाधान इतकंच की, ‘एक प्रकारचा चित्रपट पहिला’. चेहरा खुलून जायचा आणि पोराच्या आनंदात पिताही हरखून जायचा. (Indian Bioscope Memories)
मला वाटतं, त्या काळात मुलं वयात येताना चित्रपटाची ओळख होण्यातील एक महत्त्वाचा फंडा म्हणजे हा असा ‘फिरता शो’. महालक्ष्मी जत्रेत अथवा गावी चौलला (अलिबाग) मामाच्या गावाला गेल्यावर भोवाळे येथील दत्ताच्या यात्रेत या ‘बायस्कोप ‘चा ‘राउंड शो ‘ कायमच हाऊसफुल्ल असे. पण त्या पाच स्लाईडस एक प्रकारची एनर्जी देत. बराच काळ डोळ्यासमोर राहत.
लहानपण मागे सरताना हा ‘स्लाईडस दाखवणारा’ मनात राहिलेला असे. ‘वयपरत्वे चित्रपट कसा पहावा’ असा फोकस टाकताना ही पहिली पायरी ठरते. त्याच काळातील असाच एक चित्रपट एन्जाॅय करण्याचा एक छान फंडा म्हणजे ‘गल्ली चित्रपट’. (Indian Bioscope Memories)
आजच्या डिजिटल पिढीला जर सांगितलं की, गल्लीत, मैदानात, चाळीत, हाॅलमध्ये, पटांगणात, रस्त्यावर अगदी कुठे मजल्यावरही रात्री पडदा लावला जाऊन चित्रपट पाहण्याची मजा काही औरच होती, तर त्यांना ती दंतकथा वाटेल, भंकसगिरी वाटेल. असं कोणी मैदानात वगैरे जाऊन चित्रपट पाहतो का, असाच त्यांचा प्रश्न असेल. पण माझी पिढी अगदी लहानपणापासून असे ‘गल्ली चित्रपट’ पाहून चक्क समृद्ध झाली. बरं यासाठी वर्षभर काही ना काही निमित्त असेच.
मोठ्या प्रमाणावर ‘गल्ली चित्रपट’ श्रीगणेशोत्सवात दाखवले जात आणि हे सगळे गणेशमूर्तीच्या समोर चाले हेही एक विशेषच. अनेक राष्ट्रीय सण आणि महाराष्ट्र दिन (या दिवशी मराठी चित्रपटच हवाच) या दिवशीही गल्ली चित्रपट दाखवले जात. राष्ट्रीय सणांच्या दिवशी रात्री मनोजकुमारचा ‘उपकार’ हुकमी एक्का. ‘मेरे देश की धरती’ हे गाणं ‘ऑन पब्लिक डिमांड’ दोनदा दाखवणार आणि देशप्रेम जागं राहणार. तो दाखवून झाला असेल तर, व्ही शांताराम यांचा ‘दो ऑखे बारह हाथ’ अथवा मनोजकुमारचाच ‘पूरब और पश्चिम’ अथवा ‘शोर’. मराठी चित्रपट दाखवायचा ठरला तर, ‘छोटा जवान’ छत्रपती शिवाजी, मराठा तितुका मेळवावा अथवा जगाच्या पाठीवर. (Indian Bioscope Memories)
दिवाळीत (धमाकेदार मसाला मिक्स असा कोणताही चित्रपट दाखवला जात असे. यामध्ये छलिया, ब्लफमास्टर, तिसरी मंझिल, पारसमणी, सच्चा झूठा, कारवा, प्यार का मौसम, वारीस, सावन भादो, मेरा गाव मेरा देश असे चित्रपट, तर, गल्लीतील सत्यनारायणाची पूजा असेल तेव्हा थोरांताची कमळा, मुंबईचा जावई, दाम करी काम, अन्नपूर्णा असा एकादा मराठी अथवा कश्मिर की कली, गाईड, आराधना, दो रास्ते असा एकादा हिंदी चित्रपट दाखवला जाई. एकूणच ‘गल्ली चित्रपट ‘ हा खरोखरच समाजात रुजलेला भारी असा आणि आजूबाजूच्यांशी भांडण असलेच तर ते यानिमित्ताने मिटवणारा असा रियालिटी शो होता. (Indian Bioscope Memories)
मी शाळेपासून ते अगदी काॅलेजमध्येही असताना जमिनीवर ताडपत्रीवर जमेल तसे बसून अथवा वृत्तपत्राच्या कागदावर बसून ही ‘पिक्चर’ एन्जाॅय केली. पडद्यावर चालती बोलती फिरती दृश्ये दिसताहेत हे महत्त्वाचे होते. मग साऊंड सिस्टीम कशी का असेना? त्या दिवसांत अनेक ‘फिल्म दीवाने’ खिशात वृत्तपत्राचा कागद घेऊनच फिरत. आपल्या गल्लीत पाहण्यासारखा चित्रपट नसेल, तर आजूबाजूच्या गल्लीत फिरायचे आणि एका चित्रपटाला पसंती द्यायची असा अफलातून पॅटर्न होता. एक शोधकार्यच चालत असे.
आपल्या गॅलरीतून पडदा दिसत असेल, तर घरातील खुर्ची घेऊन बसताना एका खुर्ची अथवा टेबलावर दोघांनी बसायचे अशी पध्दत. अगदी खुर्ची मोडण्याची भीती असली तरी पडद्यावरची नजर कायम. याच ध्यासाने अथवा वृत्तीने आपल्या देशात चित्रपट रुजवला.
गंमत म्हणजे, पडद्याच्या एका बाजूला म्हणजे जिथे प्रोजेक्शन असेल तिथे समोरच्या बाजूने पिक्चर दिसे आणि उलट्या बाजूला बसलेल्या गर्दीला दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, सुनील दत्त, शम्मी कपूर, मनोजकुमार, राजेश खन्ना डावरे दिसत, तर अमिताभ बच्चन उजव्या हाताने कारागिरी करताना दिसे. या वर्गवारीत प्रोजेक्शनच्या बाजूला महिलांना (आणि कुठे ओळखीच्या पाळखीच्यांना स्थान), तर पडद्याच्या पलिकडे पुरुष वर्ग आणि गल्लीबाहेरच्या पब्लिकला स्थान. ही दीर्घकालीन आणि सगळ्यांनी स्वीकारलेली परंपरा. (Indian Bioscope Memories)
‘उलट्या बाजूने बसल्याने’ पडद्यावर दृश्ये उलटी दिसताहेत म्हणून कोणाचीही तक्रार नसे. पिक्चर दिसतोय, आवडतोय आणि समजतोय ना? पुरे झाले ही भावना. ‘स्टोरी समजली ना? बस्स’, असा थेट बाणा.
“चित्रपटाची स्टोरी काय होती?” हा त्या काळातील हुकमी प्रश्न. विशेष म्हणजे, बरेचसे रंगीत चित्रपट गल्लीत ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्ण धवल दाखवले जात. कारण तशीच प्रिन्ट उपलब्ध असे आणि रंगीतपेक्षा पैसेही कमी. हे अर्थकारण काही वेगळेच.
सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात ‘दोनशे’ रुपयात गल्लीत जंजीर अथवा रोटी दाखवण्यात येई. वारणेचा वाघ अथवा वाट चुकलेले नवरे असा मराठी चित्रपट त्याहीपेक्षा कमी पैशात मिळे. आज ही किंमत अगदीच किरकोळ वाटत असेल, पण जवळपास पन्नास वर्षांपूर्वी ही रक्कम बरीच मोठी होती. मा. भगवानदादा यांचा ‘अलबेला’ तर जवळपास सर्वच गल्लीत आला आणि पडद्यावर ‘भोली सुरत दिल के खोटे’ हे गाणं आलं रे आलं की, आम्ही सगळे पडद्यासमोर नाचायला लागायचो. मग वन्स मोअर घेऊन पुन्हा गाणं लावलं जाई. गल्ली चित्रपट म्हणजे एक प्रकारचे मोकळेढाकळे सेलिब्रेशन असायचं. (Indian Bioscope Memories)
मला रामपूर का लक्ष्मण, सावन की घटापासून परवाना, भाई हो तो ऐसा, मेरा गाव मेरा देश, द ट्रेनपर्यंत अनेक चित्रपट गणपतीत गल्लीतच पाहिल्याचे आठवतेय. एका बाजूला मनोमन वाटत होतं थिएटरचे पैसे वाचताहेत, तर तेव्हाच मनात येई, हे फक्त चित्रपट उरकणं होतंय, पाहून होत नाही. ‘इथे दिग्दर्शक दिसतो’ असं कौतुकाने म्हणायची संधीच मिळत नव्हती. श्री ४२०, जिस देश मे गंगा बहती है अशा चित्रपटातील ‘डायरेक्टर टच’ महत्वाचा फंडा होता, पण तेवढ्या बारकाईने लक्ष देता येत नव्हतं. चित्रपट किती पाहिले याचे वाढते ‘संख्याबळ’ महत्त्वाचे होते.
या संस्कृतीची सुरुवात साठच्या दशकात चित्रपटाच्या सोळा एमएमच्या प्रिन्ट आणि मोठ्या टेबलाचा प्रोजेक्शनने झाली. यात एका अधिकृत मध्यंतरसह आणखीन दोन मध्यंतरे असत. कारण रिळे बदलावी लागत. त्याकडेही कौतुकाने पाहणं होई, तर कधी फिल्मच तुटायची. म्हणजे चित्रपट संपायला आणखीन उशीर होणार हे अगदी स्पष्ट असे. पण ते गृहीत धरले जाई. मूळात रात्री दहानंतरच हे पिक्चर सुरु होत त्या काळात वक्त, फूल और पत्थर, नील कमल, हाथी मेरे साथी, जाॅनी मेरा नाम असे चित्रपट तब्बल तीन तासांचे असत. (Indian Bioscope Memories)
तेव्हा समाजात ‘सातच्या आत घरात’ ही संस्कृती कमालीची रुजली होती, वडिलधारे बजावून सांगत, सात वाजता घरी यायलाच हवं. विशेषतः मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात तर कडक शिस्त असे. अनेक घरात एक छडी असे. या सगळ्याला गल्ली चित्रपट संस्कृती अपवाद होती. तो जणू सार्वजनिक सण होता. टाळ्या शिट्ट्यानी चित्रपट डोक्यावर घेतले जात आणि पिक्चर न पाहणारे आपली यामुळे झोपमोड होते, असं अजिबात म्हणत नसत. एक सर्वमान्य अशीच ही ‘गल्ली चित्रपटा’ची रंजक परंपरा रुजली होती. माझ्या एकूणच जडणघडणीत हा एक महत्त्वाचा भाग होता. पब्लिक नेमकं काय डोक्यावर घेते, हे तेव्हा अनुभवलं.
आमच्या गिरगावातील तेव्हाची या दिवसातील गल्ली चित्रपटांची काही वैशिष्ट्ये सांगायची, तर आंबेवाडीत अनंत चतुर्थीच्या दिवशी आवर्जून आर. के. फिल्म बॅनरचा चित्रपट दाखवत. मी स्वतः घरच्या गणपतीची आरती झाली रे झाली की, शाॅर्टकटने आंबेवाडीत जायचो आणि शाळेतील मित्राच्या कृपेने प्रोजेक्शनच्या बाजूला बसायचो. त्या काळातील मैत्री अशीही उपयोगी पडे. आज हे सगळे आश्चर्याचे वाटणारे आहे. (Indian Bioscope Memories)
गल्ली चित्रपट संस्कृतीने अनेकांना गिरगावातील एका वाडीतून दुसरी वाडी असे अनेक शाॅर्टकट दाखवले आणि सिनेमाच्या वेडापायी नवीन शाॅर्टकट तयार केले. एक प्रकारची शोध मोहिमच असे. सिनेमा संस्कृतीचे असे अगणित रंग आहेत.
गिरगाव चर्चलगतच्या श्याम सदनमध्ये (पूर्वीचे सुंदर भवन, त्याही पूर्वीची रामचंद्र बिल्डींग) फार पूर्वी जितेंद्र राहायचा (पूर्वीचा रवि कपूर) स्टार झाल्यावर त्याने गिरगाव सोडले तरी आजही तो गणेश चतुर्थीच्या दिवशी आवर्जून पूजा करायला येतो. पण पूर्वी त्याच्याकडून येथे त्याची भूमिका असलेला एक हिंदी चित्रपट आवर्जून दाखवला जाई. आणखीन एक विशेष म्हणजे राजेश खन्ना आणि जितेंद्र हे दोघेही मूळचे गिरगावकर (राजेश खन्ना ठाकूरद्वार नाक्यावरील सरस्वती निवासमध्ये राहायचा) असल्याने जवळपास प्रत्येक गल्लीत दरवर्षी त्यांची भूमिका असलेला एक तरी चित्रपट दाखवावा, असे अनेक मंडळांचे जणू धोरण होते. ते मूळचे गिरगावकर असल्याचा अभिमान. (Indian Bioscope Memories)
दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या या चित्रपटाने सामाजिक सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्र ढवळून काढले. ‘सोंगाड्या’ला गल्लीत मागणी वाढली. ‘सोंगाड्या’ न दाखवणारी गल्ली दाखवा व बक्षीस मिळवा अशी एकादी स्पर्धा लावायला काहीच हरकत नव्हती, असे वातावरण होते. दादा कोंडके इतर चित्रपटांनाही गल्ली चित्रपटात भरपूर मागणी असे.
गल्लीत शक्यतो थिएटरमध्ये सुपर हिट झालेलेच चित्रपट दाखवत, त्यामुळे ते चित्रपट न पाहिलेल्या प्रेक्षकांची संख्या तशी कमीच. (महत्वाचे म्हणजे, ‘फक्त प्रौढांसाठी’ वाले चित्रपट चुकूनही कोणत्याही गल्लीत दाखवले गेले नाहीत. केवढे समाजभान होते बघा. )
गल्लीत चित्रपट पाहण्याचे वातावरण वेगळे असे. मूड वेगळा असे. आनंदही वेगळाच असे. ‘वक्त ‘मध्ये पडद्यावर राजकुमार रेहमानला ‘शीसे के घर मे रहनेवाले लोग…. ‘ सुनावत असतानाच पब्लिकमधील एकादा जणू त्याला प्राॅम्टींग करे आणि त्याचा इतरांना फारसा त्रास होत नसे. गंमत म्हणजे, प्रोजेक्शनच्या बाजूला ताडपत्रीने सगळे कव्हर केले असल्याने मध्येच पाऊस आला तरी पंचाईत होत नसे, पण उलट्या बाजूच्या प्रेक्षकांची प्रचंड तारांबळ उडे, कारण तेथे ताडपत्री नसत आणि पाऊस कधी येईल, केवढा येईल याचा नेम नसतोच. मग आडोशाला जमेल तसे उभे राहून का होईना पण चित्रपट पाहायलाच असे सिनेमावर बेहद्द प्रेम असे. काही ठिकाणी चक्क मजल्यावर गॅलरीत पडदा लावला जाई आणि तेव्हा दृश्य पडद्याबाहेर गेले तरी काहीच गैर वाटत नसे. (Indian Bioscope Memories)
गिरगावात पेंडसे वाडी, अमृत वाडी, सदाशिव लेन, मुगभाट, काॅन्ट्रॅक्टर बिल्डींग , गोरेगावकर लेन, मोहन बिल्डींग वगैरे वगैरे सगळ्या वाड्या, गल्ल्या, चाळी अगदी जवळ जवळ, त्यामुळे माझ्यासारख्या फिरत्या चित्रपट रसिकाला आज कोणत्या गल्लीत चित्रपट पाहायचा याचा निर्णय घेणे सोपे गेले आणि किती चित्रपट एन्जाॅय केले याची गणतीच नाही. त्याची मोजणी करण्याची प्रथा नव्हती म्हणा!
एप्रिल – मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर सार्वजनिक पूजेच्या निमित्ताने हमखास एक मराठी चित्रपट पाहणे होई. तेथील या संस्कृतीचे रंगढंग आणखीन वेगळे आणि लाईव्ह . पण गावी हमखास मराठी चित्रपट दाखवत. तो पाहायला अख्खे गाव येई. आजूबाजूला तेव्हा चणे शेंगदाणे आणि बटाटा वडा यांचे स्टाॅल लावलेले असत आणि त्यांना मागणीही भन्नाट असे. पडद्याभोवतीचे जग महत्वाचे असते म्हणतो ते हे असे. (Indian Bioscope Memories)
===========
हे देखील वाचा – राॅक्सी: आठवण मध्यंतरामधल्या २५ पैशांच्या वडापावची…
===========
कालांतराने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस ‘ या चित्रपटात ग्रामीण भागातील गल्ली चित्रपटाचे दर्शन झाले तेव्हा मी समिक्षक म्हणून हा चित्रपट पाहत होतो. पण हे दृश्य पाहताना लहानपणीचे दिवस आठवले. जणू एक फ्लॅशबॅक डोळ्यासमोर आला.
मी मात्र या गल्ली चित्रपट संस्कृतीचा भरपूर फायदा उठवला नसता, तर आश्चर्य होते. दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर अशा माझ्या अगोदरच्या पिढीच्या हीरोंचे चित्रपट अशाच कोणत्या ना कोणत्या गल्लीत एन्जाॅय केले. तात्पर्य, गल्लीत फक्त आणि फक्त पिक्चर दाखवणे होत नव्हते, तर मागील पिढीतील अनेक लोकप्रिय चित्रपट माझ्या पुढील पिढीला पाह्यची मोठीच संधी मिळाली. ज्या नव्या जुन्या चित्रपटाबाबत घरी, चाळीत मागील पिढीकडून ऐकत होतो आणि मार्मिक, रसरंग, चित्रानंद, झूम, लोकप्रभा यासारख्या साप्ताहिकातून वाचत होतो अशा अनेक चित्रपटांचे दालन या गल्ली चित्रपट संस्कृतीने प्राप्त केले. (Indian Bioscope Memories)
गल्ली चित्रपट! एक वेगळी संस्कृती. एक वेगळा सामुहिक सोहळा. एक उत्फूर्त आनंद, जल्लोष वगैरे वगैरे. आजच्या काळात गल्ली चित्रपट संस्कृती असती, तर व्हाॅटसअप ग्रुपवर ‘आजचा चित्रपट’ असा मेसेज आला असता आणि हाच का, अमकातमका का नको असा वादही झाला असता आणि एका महाचर्चेला सुरुवात झाली असती व त्यातून वादविवादही रंगले असते. चित्रपट असे बरेच काही ना काही देत असतोच, ते पडद्यावरुन जसे असते तसेच ते आजूबाजूच्या गोष्टीतूनही असतेच असते.
2 Comments
मला पुन्ह:प्रत्ययाचा आनंद दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद
नक्कीच, मी पण सोलापुरात गल्ली सिनेमे खूप पाहिलेत.