दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
भारतातील बहुतांश वेबसिरीज नेहमी या 3 ‘स’ वरच आधारित का असतात?
वेबसिरीज, ओटीटी प्लॅटफॉर्म हे शब्द गेल्या ५/६ वर्षातले. सुरुवातीला नेटलिक्स, टीव्हीएफ अशा ठरविक चॅनेलपुरतंच मर्यादित असणारं हे जग नंतर मात्र प्रचंड विस्तारलं आणि MX प्लेअर, Alt Balaji, हॉटस्टार, झी 5, सोनी liv, वूट असे एक ना अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म अस्तित्वात आले.
जे विषय चित्रपट अथवा मालिकांच्या माध्यमामधून दाखवणं शक्य नव्हतं ते सर्व विषय सेन्सॉरच्या निर्बंधांशिवाय लोकांसमोर येऊ लागले. ठराविक साच्यामधल्या सास-बहू टाईप मालिका आणि प्रेमकहाणीवर आधारित चित्रपट पाहून कंटाळलेला प्रेक्षक वर्ग नकळतच या प्लॅटफॉर्मकडे ओढला गेला. आणि आपल्या सोईनुसार केव्हाही अगदी सलग पाहता येणाऱ्या वेबसिरीज मनोरंजनाच्या दुनियेचा एक महत्वाचा भाग बनल्या. परंतु, तरीही वेबसिरीज बघणारा प्रेक्षकवर्ग काहीसा मर्यादितच होता. (Indian Web series)
मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरु झालं आणि त्यानंतर मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सुगीचे दिवस आले. याच काळात फार मोठ्या प्रमाणावर ओटीटी प्लॅटफॉर्मची सबस्क्रिप्शन्स घेण्यात आली. आणि त्यांनतर अनेक नवनवीन प्लॅटफॉर्म्स निर्माण झाले. अगदी अलीकडच्या काळात ‘प्लॅनेट मराठी’ हा मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु झाला आहे.
आपल्याकडे वेबसिरीज ही प्रामुख्याने ३ ‘स’ वर आधारित असते – सेक्स, सूड आणि सस्पेन्स. अर्थात याला अपवाद असतात. पण तुलनेने अगदी कमी.
बहुतांश वेबसिरीजमध्ये या वरील तीन ‘स’ पैकी किमान एक ‘स’ तरी असतोच! दुसरं म्हणजे ‘फक’ या शब्दाशिवाय जणू वेबसिरीज पूर्णच होऊ शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर हा शब्द यामध्ये वापरलेला असतो. काही वेबसिरीज मध्ये तर इतक्या प्रचंड शिव्या आणि इंटिमेट सीन्सचा भडीमार असतो की, मूळ कथा बाजूला राहून त्या केवळ सॉफ्ट पॉर्न म्हणून बघितल्या जातात. (Indian Web series)
मनोरंजनाचा एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणून सुजाण प्रेक्षक याचा विचार करत असताना खरंच अशा गोष्टींची गरज आहे का? गेल्या काही दिवसात वेबसिरिजना सेन्सॉर बोर्डाचे नियम लागू व्हायला हवेत, यावर उलट-सुलट चर्चा होत आहेत. पण प्रत्यक्षात विचार करता ही गोष्ट तशी सहजी शक्य नाही. (Indian Web series)
कथानकाची गरज (?) या कारणासाठी चित्रपटात दाखवण्यात येणारे बोल्ड सिन अनेकदा सेन्सॉरच्या कात्रीत सापडत असतात. अर्थात काही वेळा ही तथाकथित गरज असणारी दृश्ये न कापता चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र देऊन काम होते. पण वेबसिरिजच्या बाबतीत मात्र सेन्सॉरचा कुठलाही नियम लागू होत नसल्यामुळे हा प्रश्न येतच नाही. (Indian Web series)
वयोगट १३+ किंवा १६+ लिहिलेल्या वेबसिरीजमध्येही द्वयर्थी भाषा, गलिच्छ शिव्या, इंटिमेट सीन्स यांची खैरात असते आणि अशा वेबसिरीज विनातक्रार प्रदर्शित होत असतात आणि चालतही असतात. समजा तक्रार झालीच तर ती कशावरून होते, तर राजकीय आणि धार्मिक भावना दुखावल्या जाण्याच्या मुद्द्यावरून! बाकी गोष्टींचा आपला समाज एकतर विचार करत नाही किंवा कदाचित तो तितकासा महत्वाचा वाटत नाही. (Indian Web series)
अलीकडे काही ओटीटी प्लॅटफॉर्म काही सीरिजना ‘A’ सर्टिफिकेट देताना दिसत आहेत. शिवाय यावर चाईल्ड लॉकची सुविधाही उपलब्ध करून देत आहेत. पण मुळात मुद्दा हा नाही की, याचा लहान मुलांवर काय परिणाम होतोय किंवा ही वेबसिरीज कुठल्या वयोगटातील मुलं बघतात. मुद्दा हा आहे की, यामुळे एकूणच समाजावर नक्की काय परिणाम होतोय. (Indian Web series)
बहुतांश वेबसिरीजमधले व्हिलन किंवा नकारात्मक व्यक्तिरेखा जास्त फुटेज खातात. (उदा. मिर्झापूर मधला मुन्ना भाई). काहीवेळा इथे हिरो- व्हिलन असा फरकच नसतो. दारू, खून मारामारी करणाऱ्याबद्दल जर तरुणाईला इतकं आकर्षण वाटत असेल आणि सरळमार्गी प्रामाणिक माणूस ‘चमन’ वाटत असेल, किंवा अर्वाच्च भाषा, शिव्या देत बोलणं ही स्टाईल वाटत असेल तर, या गोष्टी नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत.
आज अगदी दहावी बारावी मधली मुलं (आणि मुलीही) ‘फक ऑफ’ हा शब्द अगदी सहज बोलताना दिसत आहेत. अजूनही काही शिव्या आहेत ज्यांचा उल्लेख मी इथे करू शकत नाही, पण ही मुलं या शिव्या अगदी सहज गप्पांमध्येही देत असतात.
आजच्या तरुणाईचं विश्वच बदलतंय. गर्लफ्रेंड /बॉयफ्रेंडची आवक-जावक, ड्रिंक्स, स्मोकिंग, सेक्स, शिव्यांचा अतिरेकी वापर, ओपन रिलेशनशिप, डेटिंग – मग त्या मध्येही कॅज्युअल डेटिंग, प्रॉपर डेटिंग, वन नाईट स्टॅन्ड, या साऱ्यासोबत करिअरमध्ये यशस्वी होण्याचं टेन्शन. या साऱ्या गोष्टीभोवतीच आजची तरुणाई गुरफटत चालली आहे. अशा परिस्थितीत मनातील दुःख, नैराश्य, चिडचिड, राग व्यक्त करण्यासाठी वेळआणि जागा कोणाकडे आहे?
=====
हे देखील वाचा: म्हणून झुंड चालायला हवा!
=====
मनात या साऱ्या भावना साठलेल्या असताना एखादा ‘मुन्नाभाई’ आवडला तर नवल ते काय? पण ही आवड जेव्हा पराकोटीच्या आकर्षणात बदलते तेव्हा तरुणांची मानसिकताही बदलत जाते. याच कारणामुळे नैराश्य, आत्महत्या हे प्रकारही वाढीस लागले आहेत आणि कुठेतरी समाजाचा समतोल बिघडत चालला आहे. आणि हे जे दिसतंय तो हिमनगाचा फक्त एक तृतीयांश भाग आहे. अर्थात या साऱ्याला फक्त वेबसिरीजच कारणीभूत आहे, असं माझं अजिबातच म्हणत नाहीये, पण कुठेतरी या साऱ्याला वेबसिरीज हातभार लावतायत, हे मात्र नक्की.
=====
हे देखील वाचा: मार्चमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ 4 बहुचर्चित चित्रपट!
=====
राजकारण, दहशतवाद, हिंसा हा मुख्य मसाला वापरून त्याला बोल्ड सीन्सची फोडणी देऊन तयार केलेली वेबसिरीज हीच भारतीय वेबसिरिजच्या दुनियेची ओळख बनू पाहतेय आणि हेच जास्त धोकादायक आहे. अर्थात या प्रकारच्या वेबसिरीज फुटेज खात असतानाच फीचर्स, रॉकेट बॉईज, स्कॅम ९२ अशा वेगळ्या विषयांवरच्या सिरीजही चांगलं मार्केट खेचत आहेत, ते ही शिवराळ भाषा आणि बोल्ड सीन्स यांचा वापर न करता! आणि हे चित्र जास्त आशादायी आहे. पण असा कंटेंट मात्र कमी प्रमाणावर तयार होतोय. हे प्रमाण वाढायला हवं. तरच ओटीटी प्लॅटफॉर्मची आकर्षण कायम राहील. अन्यथा त्यांचीही अवस्था ‘डेली सोप’ सारखी होऊ शकते.