आंतरराष्ट्रीय मिडियात मराठी चेहरा हवा(च)…
‘टाईम’ मॅगझिनच्या मुखपृष्ठावर मराठमोळ्या पारंपरिक रुपात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री…. लेखाच्या सुरुवातीलाच मी असं म्हटल्याने काही जण म्हणत असतील, तुमचे हे स्वप्न छानच आहे आणि मराठी माणसाने मोठी स्वप्ने पाहिले पाहिजेच. तर काही जण छान फॅण्टसी आहे असे म्हणतच ‘पुरे झाली कल्पनेची भरारी’ असा सल्ला द्याल. ते सोपे असते.
मला मात्र ‘हे घडायला काहीच हरकत नाही, असे वाटते. इतकेच नव्हे तर, असे भविष्यात घडेलही. अगदी महाराष्ट्रीय पारंपरिक संस्कृती, सभ्यता, मूल्ये यांची जपणूक करणारी अशीच मराठी अभिनेत्रीची छबी ‘टाईम’चे मुखपृष्ठ असू शकते. बरं, असा पारंपरिक लूकचा फोटो नको तर आजच्या जगभरातील माॅडर्न फॅशनचा स्वीकार करीत आपल्या फिटनेस आणि लूकचा ग्लॅमरस प्रत्यय देत असलेल्या अशाही एकाद्या फोटोत आपल्या महाराष्ट्रीय अभिनेत्री सरस आहेत. जराही कुठे ओंगळवाणेपणा, बिभत्सता अथवा अश्लीलपणा येऊ न देता त्यांची माॅडर्न फोटो पोझ असतेच. सोशल मिडियात तसा प्रत्यय येतोच.
‘टाईम ‘च्या कव्हरवर साठच्या दशकात परवीन बाबी झळकली तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज होती. आपल्या फिल्मी आणि जनरल अशा दोन्ही मिडियात याचे केवढे कव्हरेज काही विचारू नका. तेव्हा अमेरिका जाऊ दे, साधं काश्मीरला जाणे एक तर लांबचा प्रवास वाटे अथवा आल्यावर ‘माझा कश्मिर प्रवास’ असे पुस्तक लिहिण्याचा मोह होई. विदेश दौरा म्हणजे, निघताना बॅग कशी भरली याचे तपशील आणि आल्यावर सोसायटीच्या चौकात ‘फाॅरेन रिटर्न ‘ म्हणून सत्कार. आज हे सगळं मागे पडलयं. जगभरात कुठूनही कुठेही आपण मोबाईलवर बोलू शकतोय. स्काईपवर एकमेकांकडे पहात बोलू लागलोय.
जगात अनेक ठिकाणी मराठी माणूस आहे आणि त्याला सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा कोणत्याही गोष्टीत मराठीबद्दल काही घडलं की मनसोक्त आनंद होतोय. हा किती आणि कसा बहुपदरी विषय आहे ते एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.
टाईम तर झालेच, पण फोर्ब्ज, युएस टुडे पिपल, इस्टर्न आय, मॅक्सीम अशी अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरची नियतकालिके आहेत, प्रिन्ट आणि ऑनलाईन अशा दोन्ही रुपात ती आहेत. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोन, कैतरिना कैफ यांना त्यात कव्हरेज असते. प्रियांका चोप्राची तर मॅक्सीम हाॅट हन्ड्रेड यात २०१३, २०१६ आणि २०१८ अशी तीनदा निवड झाली. विदेशी चित्रपटात भूमिका साकारल्याने तिला त्यात संधी मिळाली असली तरी तिची खरी ओळख हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री अशीच आहे.
२०१८ च्या वेळेस तिने या यशाच्या सेलिब्रेशनमध्ये आम्हा काही सिनेपत्रकाराना आवर्जून सहभागी केले. तेव्हाचे तिचे एकूणच हसणे/ बोलणे/ पाहणे अतिशय उत्फूर्त होते. तेव्हा मॅक्सीमची प्रत डोळ्याखालून घालताना त्यात देशी विदेशी ॲक्ट्रेस, माॅडेल्स बघत असतानाच मला प्रश्न पडला, आजच्या ग्लोबल युगातील मराठी अभिनेत्रीही अशाच प्रेझेंटेबल आहेत. होय, निश्चितच आहेत. माॅडर्न लूकमध्ये काॅन्फीडन्ट असतात. कुठेही अशोभनीय अथवा वाह्यात नसतात. मग त्यातील कोणी एकादी यात का नको?
चित्रपटातील व्यक्तिरेखेनुसार ‘असणं’ आणि सोशल मिडियात आपल्या लाईक्स वाढाव्यात यासाठीचे फोटो सेशन या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आणि आजच्या मराठी अभिनेत्री मुंबई पुणे झालेच दुबई, सिंगापूर, माॅरीशस, लंडन येथील माॅलमध्ये त्या अनेक स्टाईलचा कलर्सचा ड्रेस खरेदी करतात. त्या ब्राॅड माईंडड आहेत आणि या सगळ्याचा प्रत्यय एकीकडे मल्टीप्लेक्सच्या स्क्रीनवर येतोय तर दुसरीकडे सोशल मिडियात फोटोरुपात येतोय. याची ‘नेक्स टेप्स’ हा आंतरराष्ट्रीय मिडिया हवा. त्या आंतरराष्ट्रीय मिडियाला बहुतेक जगभरात अनेक देशांत मराठी माणूस आहे याची कल्पना नसावी.
याबाबत अनेक मराठी सेलिब्रेटिजची आवर्जून नावे घेता येतील. सोनाली कुलकर्णी (सिनियर), अमृता खानविलकर, पूजा सावंत, श्रृती मराठे, सोनाली कुलकर्णी ( ज्युनिअर), सई ताह्मणकर, स्मिता गोंदकर, स्पृहा जोशी, प्रिया बापट, मिथिला पालकर, रसिका सुनील, तृप्ती तोरडमल, प्राजक्ता माळी….. या प्रत्येक यशस्वी सेलिब्रेटिजची सिनेमा (कधी एकादा रिॲलिटी शो) आणि सोशल मिडिया अशी अतिशय छान दुतर्फा वाटचाल सुरु आहे. प्रत्येकीचे मोठ्या प्रमाणावर फॅन्स आणि फाॅलोअर्सकडून आहेत. काहींचे तर वाढताहेत. आंतरराष्ट्रीय मिडियात त्यांना ‘स्कोप’ मिळाल्याने त्या लेव्हलच्या ॲडव्हटाईज मिळतील ( किमान प्रिन्ट ॲड) आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एकादा चित्रपट वा वेबसिरिजमध्ये भूमिका नक्कीच मिळेल. तेवढे टॅलेंट, ग्लॅमर, व्यावसायिकता त्यांच्यात आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांनी किती काळ ‘लोकल’ राह्यचे, त्या ‘ग्लोबल’ कधी होणार? महत्वाचे म्हणजे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्वाचे शहर आहे आणि येथील बाॅलीवूडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीची या ग्लोबल मिडियाला माहिती हवीच.
सोनाली कुलकर्णी (सिनियर) ने विदेशी चित्रपटात भूमिका साकारलीय, रसिका सुनीलनेही आपल्या अमेरिका मुक्कामात विदेशी वेबसिरिजमध्ये भूमिका साकारलीय. आजच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या काळात जगभरातील अनेक कलाकृती एक प्रकारे एकाच प्लॅटफॉर्मवर आल्यात. याच ओटीटीवर एकादा मराठी चित्रपट काही विदेशी भाषेतील सबटायटल्सने आला तर तो जगभरातील अन्यभाषिक रसिकांपर्यंत पोहचताना त्यातील परफार्मने एकाद्या कलाकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट अथवा वेबसिरिजमध्ये एकादी भूमिका मिळेल, चित्रपटाची रिमेक/ डब/ सबटायटल्स यातून एका भाषेतील चित्रपट अन्यभाषिक रसिकांपर्यंत पोहचतात आणि त्यातून काही चांगलेच निष्पन्न होईल. अशा गोष्टी काही प्रमाणात होतच असतात.
आंतरराष्ट्रीय मिडियात मराठी चेहरा दिसू लागल्याने एकीकडे या सेलिब्रेटिजचा सर्वच बाबतीत हुरुप वाढेल, त्या अपमार्केट गणल्या जातील, त्यांची मराठीतील मूळे कायम घट्ट राहूनच हे होईल. आणि त्याच वेळेस ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देता येईल. काहीही वेगळे आणि हटके केले तरी या ट्रोलर्सना प्रोब्लेमच असतो. त्यांना कृतीतून उत्तर देण्याचा सही फंडा म्हणजे, अशी मोठी झेप घेता येणे आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काही मराठी चित्रपट दाखल होत आहेत, त्यातील काही चित्रपट पुरस्कार पटकावत आहेत, अशा वेळी मराठी सेलिब्रेटिजचाही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव पडायला हवा. त्याचाच एक मार्ग आंतरराष्ट्रीय मॅगझिनमधून जातो. ही गुळगुळीत कागदावर छापली जाणारी आणि काही तर मोठी पृष्ठसंख्या असलेली मॅगझिन आपल्या देशात मोठ्या पेपर स्टाॅलवर मिळताहेत.
अशाच एकाद्या दिवशी टाईम अथवा मॅक्सीमच्या कव्हरवर अमृता खानविलकर , श्रृती मराठे, मिथिला पालकर, तृप्ती तोरडमल अथवा रसिका सुनीलचा बोल्ड बट ब्युटीफूल लूकचा म्हणा अथवा पारंपरिक रुपातील गोडवा जपलेला म्हणा फोटो आला रे आला तर ती ब्रेकिंग न्यूज तर असेलच, त्यासह आजच्या ग्लोबल युगातील रसिकांना ते भरभरून आनंद देणारे असेल. तो दिवस फार दूर नाही हेही खरेच.
याला कोणी कल्पनेची भरारी म्हटले तरी चालेल अथवा यासाठी शुभेच्छा दिल्या तरी चालेल. अगदी कालपरवापर्यंत मराठी अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस फोटो सेशनबाबत इतके सातत्य ठेवतील असे तरी वाटले होते का? त्यासाठी लागणारा उत्साह आणि सातत्य त्यांच्याकडे आहे ना? महत्वाचे म्हणजे, जे चाललेले असते त्यात साचलेपण येऊ नये. त्याला मोठा छेद मिळावा आणि तो जर असा वेगळा असेल तर, हवाच आहे.