एक दिवसाचे नाटक आहे का हो?
पाश्चात्यांचे अंधानुकरण करायचे ते किती?
आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीची परंपरा, वैशिष्ट्ये, संस्कृती, शैली अतिशय अभिमानास्पद आहे. देशात हिंदीसह मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, कोंकणी, तुळू अशा अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपट पडद्यावर येतात. बहुसांस्कृतिकता हे आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे वैशिष्ट्य. पॅन इंडिया चित्रपट संस्कृतीत एका भाषेतील चित्रपट अन्य भाषेत डब होऊन अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहेत. हिंदी चित्रपट ही तर जगासमोर आपल्या देशातील चित्रपटाची ओळख आणि आता तर जगातील अनेक देशात आपले चित्रपट प्रदर्शित होत आहेत. काही सबटायटल्स माध्यमातून तर काही डब होऊन अन्य देशात झळकत आहेत. तरी आपण हिंदी चित्रपटसृष्टीला ‘हाॅलीवूड’ च्या चालीवर ‘बाॅलीवूड’ म्हणतो. काही गरज आहे का सांगा? (Cinema Day)
नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात हे घडले. याच दशकात आपल्या देशात जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था यांचे वारे रुजत होते. विश्व सुंदरी, जगत सुंदरी या जागतिक पातळीवरील स्पर्धेत आपण मुकुट पटकावत होतो. उपग्रह वाहिन्या रुजत होत्या. माॅल संस्कृती येत होती आणि त्यातच हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बाॅलीवूड’ म्हटले जावू लागले. अभिनेता व दिग्दर्शक विजय आनंदला हे नामकरण अजिबात मंजूर नव्हते. तसे त्याने काही मुलाखतीत म्हटलेही. (Cinema Day)
याच पाश्चात्य संस्कृतीतून आपल्याकडे ‘सिनेमा डे’ (Cinema Day) हे फॅड आले. अगदी अलिकडे हे घडू लागले. त्याला ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ (Cinema Day) म्हणतात. खरं तर हे एकच दिवसाचे मल्टीप्लेक्सचे देणे आहे. या दिवशी कोणताही चित्रपट ९९ रुपये तिकीट दरात म्हणजेच नेहमी तीन आकडी ( काही मल्टीप्लेक्समध्ये मिडनाईट मॅटीनी शो चार आकडी) असणारे तिकीट या एकाच दिवशी दोन आकडी दरात. अर्थात उरलेला रुपया का घ्या? तसे तर आता ऑनलाईन तिकीट काढण्याचे दिवस.
प्रश्न असा, फक्त एकच दिवस ‘सिनेमा दिवस’ (Cinema Day) का? आपल्या देशातील चित्रपट व क्रिकेट यांची तळागाळातील अगदी खालच्या माणसापर्यंत पोहचलेली क्रेझ पाहता आपल्याकडे रोजच सिनेमाचे दिवस असतात. कुठे फार मोठी आवड म्हणून तर कुठे सर्वसाधारण कुतूहल म्हणून असते. कोणी अधेमधे कधी तरी चित्रपट एन्जाॅय करतो तर कोणी सातत्याने करतो. चित्रपट गीत संगीताचे शौकीन मात्र खूप. त्यात जुन्या गाण्याच्या आठवणीत रमणारे असंख्य. काहीच नाही तर, सेलिब्रिटीजच्या अफेअर्स, लग्न, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, दुसरं लग्न, पुन्हा घटस्फोट यातही रस असणारे. ( हे सगळे चित्रपट संस्कृती, कला व माध्यम यापासून केवढे तरी दूर नि अनावश्यक. पण हेच जास्त ‘फोकस’ मध्ये असते तो भाग वेगळा).
एक दिवसाच्या सिनेमा दिवसात तिकीट दर उतरलेले असल्याने दिवसभरातील उत्पन्नाचा आकडाही बातमी व्हावी अशा उंचीवर नसणार. कधी चित्रपट प्रदर्शित होतोय आणि पहिल्याच दिवशी इतके भारी भारी कोटी रुपये कमावले अशी ओरड करतोय याचीच अनेक सिनेमावाल्यांना घाई असते. त्या भारी आकडेवारीवरुन “हे पिक्चर साॅलीड असणार” असे चित्रपट रसिकांचे मत आणि मन तयार होईल असा भ्रम कसा? कुठून? का? नि कशाला? जन्माला आला काय माहित? कारण असे काहीही नसते. आपल्या देशातील चित्रपट रसिकांना कोणता चित्रपट चांगला, कोणता बरा आणि कोणता सामान्य हे चांगलेच समजते. कोणता डोक्यात ठेवायचा हे त्यांना समजते. जो चित्रपट समजतो तो चांगलाच ही सर्वसाधारण व्याख्या. उगाच ते वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करुन चित्रपट पाहायला येत नाहीत. (Cinema Day)
एका दिवसाचा सिनेमाचा विषय अशी आपली चित्रपट संस्कृती नाही. अर्थात समुद्राच्या लाटेप्रमाणे या प्रेमाची भरती ओहोटी सुरु असते. खास कमी केलेल्या दरात असा प्रकार पूर्वी मॅटीनी शोला होता. गिरगावात लहानाचा मोठा होताना सेन्ट्रल, इंपिरियल, स्वस्तिक, सुपर येथे नियमित खेळाला स्टाॅलचे तिकीट दर एक रुपया पासष्ट पैसे असे होते तेच मॅटीनी शोला एक रुपया पाच पैसे असत. त्यामुळेच मॅटीनी शोला अनेक जुने चित्रपट पाहत पाहत मी अगोदरच्या पिढीतील अनेक चित्रपट पाहिले. (Cinema Day)
==========
हे देखील वाचा : भारतमाता चित्रपटगृह पुन्हा सुरु होतेय, वाजवा टाळ्या आणि शिट्ट्या
==========
त्या काळात रिपीट रन आणि मॅटीनी शो याचे कल्चर कमालीचे रुजले होते. आताही पुन्हा थोडेफार जुने चित्रपट प्रदर्शित होत असतानाच त्यांचे मल्टीप्लेक्समधील तिकीट दर फक्त ९९ रुपये ठेवायला काय हो हरकत आहे? ते जास्त संयुक्तिक ठरेल नाही का? या ९९ रुपये तिकीट दराचा भरपूर फायदा अशोक सराफ व सचिन पिळगावकर जोडीचा “नवरा माझा नवसाचा २” आणि करिना कपूरच्या यशस्वी कारकीर्दीला यशस्वी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त मल्टीप्लेक्समध्ये तिचे अनेक चित्रपट दाखवले जात आहेत यांना नक्कीच व्हावा. विशेषत: प्रत्येक मराठी चित्रपटासाठी कायमच ९९ रुपये तिकीट दर असायला काय हरकत आहे? मराठी चित्रपट रसिक त्याला अतिशय उत्फूर्त प्रतिसाद नक्कीच देईल. बघा विचार करुन… (Cinema Day)